किल्ले रायगड म्हणजे सह्याद्रीचा अनभिषिक्त राजा. मराठी कर्तृत्वाची सर्वश्रेष्ठ पेठ. यादवांच्या पाडावानंतर साकारलेली मराठ्यांची राजधानी. मराठी मनाने जिथे कायम नतमस्तक व्हावं अशी सगळ्यात पवित्र जागा.
रायरीचा डोंगर अत्यंत दुर्गम आणि प्रबळ जागा. अत्यंत सुरक्षित, दशगुणी! एकतर अतिशय उंचावर व चारही बाजूंनी सह्याद्रीचे थरकाप उडवणारे कडे. मधल्या खोऱ्यातली घनदाट जंगलं. आता वाहनं पाचाडपर्यंत जात असल्याने आपल्याला जाणवत नाही; पण त्यावेळी गडापर्यंत पोहोचणं अजिबात सोपं नव्हतं. देशावरून आणि कोकणातूनही. सामर्थ्यवान पंचमहाभूतांचं अभेद्य कडं होतं त्याच्या सगळ्या बाजूंना.
महाराजांनी १५ जानेवारी १६५६ रोजी जावळी काबीज केली. जावळीचा अधिपती चंद्रराव मोरे त्याच्या ताब्यातल्या रायरी या अत्यंत दुर्गम किल्ल्यावर जाऊन बसला होता. काही महिन्यांतच म्हणजे ६ एप्रिल १६५६ रोजी महाराजांनी रायरीवर चाल केली आणि रायरी ताब्यात घेतला. बहुतेक त्याच वेळी त्यांनी मनात ठरवलं असावं की सह्याद्रीच्या गाभ्यात वसलेला 'रायरी'चा डोंगर राजधानी करावा. त्यांनी हा डोंगर ताब्यात घेतल्यावर त्याचं नाव ठेवलं रायगड.
रायरी ताब्यात आल्यावर महाराजांनी संरक्षणाच्या दृष्टीने गडाचे नव्याने बांधकाम केलं. कल्याणचा आदिलशाही सुभेदार मुल्ला अहमद याचा खजिना लुटून त्यांनी तो रायगडावर आणला. जानेवारी १६६४ मध्ये सुरत लुटल्यावर ती प्रचंड लूटही लगेच रायगडावर आणली. यातलं बरंचसं द्रव्य महाराजांनी रायगडाच्या बांधकामासाठी वापरलं. इमारती बांधण्याची आज्ञा त्यांनी कल्याणचे सुभेदार आबाजी सोनदेव यांना केली. त्यांनी प्रथम गडावर शिरकाईचं छोटंसंच देऊळ बांधलं. ही गडावरची मुख्य देवता. देवळात अष्टभुजा महिषासूरमार्दिनीची मूर्ती आहे. नंतर त्यांनी गडावर साधारण ३०० इमारती बांधल्या. राजवाडा, कचेऱ्या, धान्य/ दारूगोळ्याची कोठारं, अधिकाऱ्यांच्या/शिबंदीच्या राहण्याच्या जागा, व्यापारी बाजारपेठ, पाण्याचे तलाव/टाक्या, राण्यांचे महाल इत्यादी.
टॉमस निकल्सने रायगड भेटीनंतर लिहिलंय की 'वाटेत पायऱ्या खोदल्या आहेत. जिथे टेकडीला नैसर्गिक अभेद्यता नाही तिथे २४ फूट उंचीचे तट आहेत. ४० फुटांवर दुसरी तटबंदी बांधून किल्ला इतका अभेद्य बनवला की, अन्नपुरवठा पुरेसा असल्यास थोड्या शिबंदीच्या सहाय्याने तो सर्व जगाविरुद्ध लढू शकेल. अगोदरच गडावर खूप बांधकाम झालं होतं. आता राजसभा आणि त्याचबरोबर जगदीश्वराचं मंदिर बांधायचं ठरलं. त्यावेळी इमारत खातं हिरोजी इंदुलकरांकडे होतं. इंदुलकरांनी गंगासागराच्या दक्षिण काठावर सुंदर सुंदर मनोरे बांधले. मनोऱ्यांमध्ये कारंजीदेखील तयार केली. हे मनोरे पाच मजली होते. आज डावीकडच्या मनोऱ्याचे दोन मजले शिल्लक आहेत व त्यांची उंची १३ मीटर आहे. मनोऱ्यांचा पाया द्वादशकोनी असून प्रत्येक बाजूला खिडक्या आहेत. मनोऱ्यात ४.२ मीटर व्यासाच्या खोल्या आहेत. मनोऱ्याच्या पाचव्या मजल्यावर पाण्याची टाकी असावी. कारण त्याच्या मध्यभागी कारंजे आहेत. मनोऱ्याच्या बाराही कोपऱ्यांना तांब्याच्या नळ्या आहेत. या नळ्या बहुतेक वरच्या टाकीला जोडलेल्या असाव्यात.
भव्य राजसभा बांधण्यात आली. प्रवेशद्वारं इतकी विशाल आणि भव्य ठेवली की फडकत्या जरीपटक्यासह हत्ती या प्रवेशद्वारातून सहज येऊ शकेल. या प्रवेशद्वारावर नगारखाना उभारण्यात आला. नगारखान्याची इमारत चौकोनी आणि भव्य आहे. प्रवेशद्वार पूर्वेकडे असून ही इमारत १६.५ मीटर उंच आहे. वरती काही उंचीवर नगारखाना असून तिथे जाण्यासाठी जिना असून त्याला २९ पायऱ्या आहेत.
गडावर 'कुशार्त' आणि 'गंगासागर' हे दोन मोठे तलाव बांधण्यात आले. सर्व भागात पाण्याच्या टाक्या, छोटे तलाव बांधण्यात आले. महादरवाजा अधिक मजबूत बांधण्यात आला. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना सिंह हत्तींना मारीत असल्याची शिल्पं कोरली गेली. गडावर दरबारात सिंहासनासाठी ४ X ३.२ मीटर चौथरा बांधण्यात आला. याच ठिकाणी ३२ मण वजनाच्या सुवर्णसिंहासनावर महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. राज्याभिषेकासाठीचं सिंहासन ३२ मण वजनाचं होतं. त्यावेळी महाराजांच्या रत्नशाळेचे रामाजी दत्तो चित्रे हे मुख्य अधिकारी होते. त्यांनी हे सिंहासन करवून घेतलं.
सिंहासन आणि नगारखाना यामध्ये ७० मीटर अंतर असूनही सिंहासनाजवळ बोलल्यास नगारखान्यात ते स्पष्ट ऐकू येत असे. ध्वनीची ही नैसर्गिक योजना साध्य करण्यासाठी त्यावेळच्या कसबी स्थापत्यशास्त्रज्ञांनी वास्तूशिल्पीय कौशल्याचा असामान्य उपयोग केला होता.
बाजारपेठ इतकी सुंदर आणि देखणी बांधण्यात आली की बघतच राहावं. दुतर्फा घाटदार जोती उभारून त्यावर दुकानं बांधण्यात आली. मधला रस्तासुद्धा चांगलाच रूंद आणि ऐसपैस होता. त्या रस्त्याची रूंदी होती १३ मीटर! ही जोती उंच बांधण्यामागच उद्देश असा की घोड्यावरून किंवा पालखीत बसून खरेदी करता यावी. प्रत्येक बाजूला २२ अशी दोन्ही बाजूंना मिळून ४४ दुकानं बांधली. प्रत्येक दुकान १३ X ९. ५ मी. इतकं चांगलंच ऐसपैस. प्रत्येक दुकानात दोन खोल्या. मागची खोली गोदामाची. काही अभ्यासकांचं असंही मत आहे की दुकानांखाली सामान ठेवायला तळघरदेखील असावं.
गडावर सात महालांचा राणीवसा आहे. ही वास्तू प्रशस्त असून महाराजांनी राण्यांसाठी हे महाल बांधले होते. या वास्तूचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातली नमुनेदार शौचकुपं. असं म्हणतात की दिल्ली-आग्र्याच्या लाल किल्ल्यात अतिशय अलिशान संगमरवरी शयनगृहं, स्नानागारं आहेत पण शौचकुपं नाहीत. रायगडावरच्या राण्यांच्या महालात एकांत ठेऊनही त्यांनी अशी रचना केली की या महालातून सभोवतालचा सगळा निसर्ग व्यवस्थित बघता येईल. तसंच भरपूर सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा सतत खेळत राहिल याचीही काळजी घेण्यात आली होती.
याबरोबरच गडावर राजप्रासाद, अष्टप्रधानांचे महाल, श्रीजगदीश्वराचं देखणं मंदिर, अश्वशाळा, गजशाळा, गोशाळा, १८ कारखाने, १२ महाल, त्यामधली अधिकाऱ्यांची घरं, शिबंदीसाठी घरं, तीन अंधार कोठड्या अशी कितीतरी बांधकामं झाली. त्या काळात जेव्हा गड गाठणं अत्यंत बिकट होतं. आजच्या इंजिनीअर्स/आर्किटेक्टसना तोंडात बोटं घालायला लावेल असा हा वास्तूकलेचा भव्य आविष्कार गेली ५००-६०० वर्षं बेभान वारा आणि मुसळधार पावसाच्या नाकावर टिच्चून मोठ्या अभिमानाने उभा आहे. रायगड आपली प्रेरकशक्ती आहे. किल्ले रायगड सह्याद्रीचा राजा आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट