केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाच्या कार्यालयामधल्या साहित्यिक घडामोडींपासून जॉर्ज फर्नांडिस यांच्या युनियन कार्यालयातल्या राजकीय घडामोडींपर्यंत अनेक प्रकारच्या घटनांची साक्षीदार असणारी गिरगावातली अत्यंत गजबजलेली लेन म्हणजे बनाम हॉल लेन. सकाळी दहा वाजल्यापासूनच गिरगावातली एक लेन खूप गजबजलेली असते आणि ती गजबज अगदी संध्याकाळपर्यंत असते. ती लेन म्हणजे बनाम हॉल लेन. चर्नीरोड स्टेशनला उतरून पाच ते सात मिनिटं चालल्यावर आपण या लेनपर्यंत येऊन पोहोचतो.
हा या लेनचा एक प्रवेश, तर दुसरा प्रवेश गिरगावातल्या प्रार्थना समाज मार्गावरून आहे. त्यामुळे ही एक भलीमोठी लेन आहे हे समजतं. १०० वर्षांची साक्ष देणाऱ्या अनेक इमारती इथे आहेत. या लेनला आता डॉक्टर डी.डी.साठे मार्ग अशा नावानेसुद्धा ओळखलं जातं. या लेनमधल्या आनंदजी रामजी बिल्डिंगला १०० वर्षं झाली आहेत. ही इमारत तीन
मजली असून त्यात तीन कुटुंबं राहतात. या लेनमध्ये नानक निवास, आठवले भवन, गिरगाव टेरेस, वसंत विला, श्री समर्थ सदन अशा कित्येक इमारती आहेत. बऱ्याचशा इमारतींमध्ये आता व्यावसायिकांची दुकानं दिसतात. ऑटोमोबाइल मार्केट अशी या लेनची नवी ओळख सांगता येईल. या लेनमध्ये गाड्यांचे सर्व सुटे भाग मिळतात. या लेनमधल्या प्रत्येक इमारतीचा मालक मात्र वेगवेगळा आहे. पण इथल्या जागांचं क्षेत्रफळ साधारण २५० ते ३०० चौरस फूट आहे. बाहेरची खोली मोठी आणि आत स्वयंपाकघर अशी इथल्या घरांची सर्वसाधारण रचना आहे.
गिरगाव टेरेस ही इथली इमारत चार मजली आहे. मात्र तिला लिफ्टची सोय नाही. सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचं बालपण याच इमारतीत गेल्याचं इथले लोक सांगतात. भारताचा जलदगती गोलंदाज दत्तू फडकर आणि सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अधिक शिरोडकर हेदेखील इथले रहिवासी होते.
श्री समर्थ सदन या इमारतीची रचना तीन मजले अधिक गच्ची अशी आहे आणि इथे प्रामुख्याने मराठी कुटुंबं राहतात. धार्मिक ग्रंथ आणि संस्कारक्षम पुस्तकांसाठी प्रसिद्ध असणारी केशव भिकाजी ढवळे ही प्रकाशन संस्था याच लेनमध्ये आहे. या प्रकाशन संस्थेनेसुद्धा शतक पूर्ण केलं आहे.
वसंत विलास ही इमारत पूर्णतः गुजराती वस्ती असणारी आहे. इथल्या श्री कृष्णपंत निवास या इमारतीत जॉर्ज फर्नांडिस यांच्या युनियनचं कार्यालय होतं. या लेनमध्ये महानगर पालिकेची शाळा होती. तसंच महानगरपालिकेची मंडईसुद्धा होती. आता इथे शाळा नाही. आता इथे फिनिक्स मार्केट झालं आहे.
ब्राह्मण सभा हॉस्पिटल आणि साळेकर व्यायामशाळा याच लेनमध्ये आहे. बनाम हॉल क्रॉस लेन हा मुख्य बनाम हॉल लेनचा एक भाग म्हणता येईल. इथे एक खांडके बिल्डिंग असून त्यात प्रामुख्याने मराठी वस्ती आहे. या लेनमध्ये दहा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. या लेनमधल्या अनेक इमारतींमध्ये लाकडी जिने आहेत. काही इमारतींचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. मात्र बऱ्याच इमारती या व्यावसायिकांच्या दुकानांनी व्यापल्या आहेत. या लेनमध्ये मराठी आणि गुजराती संस्कृती एकत्र नांदत आहे असं म्हणावं लागेल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट