सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) आधारे म्युच्युअल फंडांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण सतत वाढतेच आहे. एसआयपीद्वारे दरमहा सरासरी आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. मात्र ही गुंतवणूक विनाउद्देश न करता आपल्या आर्थिक उद्दिष्टांशी तिची सांगड घालावी असा सल्ला अर्थ नियोजक देतात. आर्थिक उद्दिष्टपूर्तीसाठी म्युच्युअल फंड कसे परिणामकारक ठरतात ते पाहू या.
उद्दिष्ट आधारित फंड गुंतवणूक म्हणजे काय?
प्रत्येक व्यक्तीला अल्पकालीन अथवा दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे असतातच. विशिष्ट कालावधीत आपल्याला किती निधीची गरज आहे व त्यासाठी किती काळ गुंतवणूक करणे आवश्यक आहे हे निश्चित करणे म्हणजे उद्दिष्ट आधारित गुंतवणूक होय. उदा. तुम्हाला २०२१मध्ये सहकुटुंब विदेशवारी करायची असल्यास अद्याप दीड वर्षांचा कालावधी तुमच्या हातात आहे. याला अल्पकालीन आर्थिक उद्दिष्ट म्हणता येईल. तसेच, आत्ता दोन वर्षे वय असणाऱ्या तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही आर्थिक तरतूद करू इच्छित असाल तर ते दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट ठरेल. एखाद्याने वयाच्या २५व्या वर्षापासून अर्थार्जनास सुरुवात केली व त्याला वयाच्या ५५व्या वर्षी निवृत्त व्हायचे असेल तर त्यानंतरची आर्थिक तरतूददेखील दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट मानली जाईल.
याचे नियोजन कसे करावे?
सर्वप्रथम आर्थिक उद्दिष्ट निश्चित करावे. यासाठी तुमच्या हातात किती कालावधी आहे व तुम्ही किती प्रमाणात गुंतवणूक करू शकाल याचा विचार करावा. यातून जो आकडा समोर येईल तो तुमच्या आर्थिक उद्दिष्टासाठी होणारा आजच्या घडीचा खर्च असेल. यामध्ये भावी महागाईचा विचार करून भर घातल्यास दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टासाठी नेमका किती निधी आवश्यक आहे हे स्पष्ट होईल. यानंतर अर्थ नियोजकाच्या साह्याने एसआयपीचा प्रकार व रक्कम निश्चित करा. यासाठी तुम्ही एकरकमी गुंतवणूकही करू शकता. तसेच, शक्य असल्यास एकरकमी व एसआयपी अशी एकत्रित गुंतवणूक करण्याचा पर्यायही आहे.
यासाठी म्युच्युअल फंड कसे उपयोगी पडतात?
यासाठी योग्य अर्थ नियोजकाची निवड करणे आवश्यक आहे. तुमचे आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणती फंड योजना परिणामकारक ठरेल ते हा नियोजक सांगू शकेल. यात तुमची जोखीमक्षमता हा महत्त्वाचा घटक आहे. उदा. आजपासून १८ महिन्यांनी तुम्हाला एखाद्या सहलीला जायचे आहे व त्यासाठी पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असल्यास डेट किंवा आर्ब्रिट्रेज फंड योग्य ठरतील. या फंडांतून ६ ते ८ टक्के परतावा मिळतो. ही गुंतवणूक करताना संभाव्य करआकारणीचाही विचार करा. तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या डेट फंड गुंतवणुकीस अल्पकालीन भांडवली नफा कर लागू होतो. तुम्ही मुलाच्या उच्च शिक्षणासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल व त्यासाठी तुमच्या हातात १० वर्षांपेक्षा अधिक कालावधी असेल तर तुम्ही लार्ज कॅप, मल्टि कॅप आणि मिड कॅप अशा विविध प्रकारांत गुंतवणूक करणे योग्य ठरेल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट