- श्री. मांजरेकर, माहीम
वास्तविक या सदरात पुनर्विकासासंबंधात ज्या अडचणी आहेत, त्या मांडणे अपेक्षित आहे. आपला प्रश्न पुनर्विकासापेक्षा व्यक्तिगत जास्त आहे. तरीही आपले वय लक्षात घेता, तसेच या प्रकारची समस्या अनेकांबाबत उपस्थित होण्याची शक्यता असल्याने त्याचे उत्तर देत आहे. म्हाडा कायद्याप्रमाणे भोगवटादारालाच मान्यता मिळाली आहे. भाडेकरू व भोगवटादार हा एकच असेल, तर उत्तम पण अनेक वेळेस भाड्याची चिठ्ठी वेगळ्या नावाने व रहिवासी वेगळा असे घडते. म्हाडा कायदा जो रहिवासी आहे, त्यालाच अधिकार देतो. या कायद्याप्रमाणे आपला अधिकार कमी होत नाही हे आपण लक्षात घ्यावे. आपण जागेत राहत असाल, तर आपण भोगवटादार आहात व म्हणून सदर जागेत आपले नाव क्रमांक एकवर येणार. आपला मुलगाही याच जागेत राहत असल्याने त्याचे नाव क्रमांक दोनवर राहील. नवीन घर मिळाल्यानंतर आपल्या इमारतीची को ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन होईल व त्याचे सभासद आपणच असाल व क्रमांक दोनवर आपला मुलगा असेल. एकदा का आपण सोसायटीचे सभासद झालात, तर या वास्तूचे काय करावे याचा निर्णय आपणच घेऊ शकता. त्यासाठी कायदेशीर कारवाई करावी लागेल. भोगवटादार म्हणून मुलाचाही तितकाच अधिकार आहे. पण तो आपल्यापेक्षा जास्त मात्र नाही. आपले नाव क्रमांक एकवरच नोंदवण्यात येईल. आपण म्हणता त्याप्रमाणे दुसऱ्या मुलाच्या नावे काही करायचे तर त्यालाही भोगवटादाराचे अधिकार आहेत. कोऑपरेटिव्ह सोसायटी झाल्यानंतर जागा आपल्या मालकीहक्काची होईल, त्याचे वारस कोणाला करायचे, हे तुमचे वैयक्तिक मत आहे. मात्र तरीही याबाबत कायदेशीर सल्ला घ्या व पुढील वाटचाल करा. हे हिताचे ठरेल.
‘पुनर्विकास’ सदरासाठी प्रश्न
‘पुनर्विकास’ सदरासाठी प्रश्न पाठविताना पुढील तपशील देणे अत्यावश्यक आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ, रस्त्याला लागू आहे किंवा कसे, रस्ता किती रुंद आहे, रहिवासी किती, प्रत्येकाच्या सदनिकेचे चटईक्षेत्र किती, दुकाने वा गाळे किती, अधिकृत की अनधिकृत याबाबत स्पष्टता, मुंबई बेट किंवा उपनगर, जमिनीची मूळ मालकी कोणाची, भाडेपट्टा कोणाच्या नावे, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा कसे, हे स्पष्ट असावे. तरच अचूक मार्गदर्शन मिळू शकेल. अन्य अनावश्यक तपशील मात्र कटाक्षाने वगळावा. प्रश्न शक्य तो टाइप केलेले, किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावेत. पाकिटावर ‘पुनर्विकास सदरासाठी’ असा स्पष्ट उल्लेख न चुकता करावा. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स टॉवर, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाउन्ड, लोअर परळ, मुंबई- ४०० ०१३. आपण आपले प्रश्न mtaskquestions@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट