लाखो रुपये खर्च करून ग्राहक प्रॉपर्टी घेत असतील आणि ती प्रॉपर्टी किती मजबूत आहे, याबाबत खात्री नसेल तर तसा व्यवहार करण्यात फार मोठी जोखीम असते. अशा परिस्थितीत काही गोष्टींचं परीक्षण करून त्या प्रॉपर्टीची बलस्थानं जाणून घ्याव्यात.
एखाद्या चांगल्या गृहप्रकल्पातलं अपेक्षित घर मिळालं आहे. सर्व गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे इमारत बाहेरून चकचकीत आहे. तसंच आतूनही रंगरंगोटी केलेली आहे. त्यामुळे आता ते घर घेण्याचा विचार तुम्ही पक्का केला असेल. पण थोडं थांबा आणि आणखी थोडा विचार करा की बाहेरून दिसणारी ती इमारत आतून खरोखरच मजबूत आहे, याची तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे का? नसेल तर बुकिंग करण्यापूर्वी त्या घराचा बळकटपणा तपासून घ्या.
बांधकाम नवं असतं तेव्हा त्या इमारतीची मजबूती किती काळ टिकेल, याचा अंदाज लावणं फार अवघड असतं. सर्वसामान्यांसाठी तर ते अशक्यच असतं. लाखो रुपये खर्च करून ग्राहक घर घेत असतील आणि ते घर किती मजबूत आहे, याबाबत खात्री नसेल तर तसा व्यवहार करण्यात फार मोठी जोखीम असते. अशा परिस्थितीत काही गोष्टींचं परीक्षण करून त्या प्रॉपर्टीची बळकटी जाणून घेता येते, असं बांधकाम क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात.
तज्ज्ञांच्या मते, इमारतीची मजबूती माहिती करून घेण्याची काही परिमाणं आहेत. त्यात आर्किटेक्चरल डिझाइन, अंतर्गत आणि बाहेरच्या बांधकामाचा दर्जा, इलेक्ट्रिकल आणि बाथरूम फिटिंग्जमध्ये वापरण्यात आलेले ब्रॅण्ड्स, खिडक्यांचं फिनिशिंग आदींचा समावेश आहे.
वेगवेगळ्या विकासकांच्या बांधकामांचा दर्जा वेगवेगळा असतो. एकाच विकासकाच्या दोन वेगळ्या बांधकामांच्या दर्जांमध्येही तफावत असू शकते. त्यामुळे ग्राहकाने बांधकामाचा दर्जा फार काळजीपूर्वक तपासला पाहिजे. इमारतीची अशी तपासणी करताना ती दोन भागांमध्ये करावी. एकतर इमारतीची मुख्य बांधणी (पाया, पिलर्स, स्लॅब) आणि दुसरा म्हणजे भिंती आणि अन्य बांधकाम. ज्या इमारतीचं स्ट्रक्चर चांगलं आहे, त्या इमारतीत बांधकामाचा भार सर्व पिलर्सवर समान विभागला जातो.
इमारतीचा पाया किती मजबूत आहे, हे सर्वसामान्यांना समजू शकत नाही. त्यासाठी स्ट्रक्चरल इंजिनिअरचीच मदत घ्यावी लागते. कारण स्ट्रक्चरल इंजिनिअर हा संबंधित इमारतीच्या बांधकामातल्या अनेक तांत्रिक बाबी तपासतो. उदा. सॉइल कॉम्पॅक्टनेस, सिमेंट-वाळूचं प्रमाण, स्लम्प टेस्टिंग, सांडपाणी व्यवस्थापन, भूकंपरोधक तंत्रज्ञान आदी. ही सर्व परीक्षणं केल्यानंतर त्याचा लिखित अहवाल देऊन ती इमारत किती मजबूत आहे हे सांगतो.
चांगले विकासक नेहमीच स्वतःची आणि स्वतःच्या कंपनीची प्रतिमा खराब होणार नाही, याची काळजीही घेतात. म्हणूनच ते सर्व बाबींमध्ये चांगला दर्जा राखला जाईल याची दक्षता घेतात. केवळ कॉण्ट्रॅक्टरवर अवलंबून न राहता, स्वतः बांधकामाशी संबंधित सर्व कामं अधिकाधिक दर्जेदार होतील, यासाठी ते प्रयत्न करतात.
बांधकामाचा योग्य दर्जा राखला जाईल, यासाठी चांगले विकासक नेहमीच आग्रही असतात. त्यासाठी साहित्यासाठी थोडा अधिक खर्च आला तरी त्याची काही हरकत नसते. कारण बांधकामाचा दर्जा राखला तर त्या विकासकाची बाजारातली प्रतिष्ठा वाढण्यास मदत होते आणि त्याच्या बळावरच भविष्यात त्याला अधिक ग्राहक मिळतात.
ज्यांना आपली प्रतिष्ठा आणि प्रतिमेची फार काळजी नाही, असे विकासक बांधकामाच्या दर्जात तडजोड करतात. पण ग्राहकांनी घर खरेदी करण्यापूर्वी संबंधित इमारतीतल्या अन्य पाच-सहा घरांचीही तपासणी करायला हवी. त्यात घरं एकाच आकाराची आहेत का, कुठे गळती होत आहे का आणि भिंतीवरील तडे आदींची पाहणी करायला हवी. यापैकी कुठल्याही बाबतीत विसंगती आढळून आली तर याचा अर्थ हा आहे की सुमार दर्जाचं बांधकाम साहित्य वापरण्यात आलेलं आहे.
नामांकित विकासकांबद्दल एक विश्वासार्हता असते. ती विश्वासर्हता त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते आणि तिच्यामुळेच त्या विकासकांचा ब्रॅण्ड तयार झालेला असतो. बांधकामाचा दर्जा चांगला असेल तर विश्वासार्हता निर्माण होते म्हणूनच नामांकित विकासक चांगल्या दर्जाचं बांधकाम करण्यावर भर देतात.
इमारतीच्या बांधकामाची मजबूती किती आहे, हे बघण्याचं काम स्ट्रक्चरल इंजिनिअरचं आहे. पण ग्राहकानेही काही गोष्टी बघण्याची गरज असते. दरवाज्याची उघडझाप करताना आवाज येतोय का, खिडक्या समान रेषेत बसवलेल्या आहेत का, किचन आणि बाथरूमच्या टाइल्स व्यवस्थित बसवलेल्या आहेत का, अशा छोट्या-छोट्या गोष्टी तपासायला हव्यात.
बांधकामाच्या दर्जामध्येही वेगवेगळे वर्ग असतात. सिमेंट आणि वाळूचं प्रमाण किती आहे तसंच त्यापासून काँक्रीट बनवण्यासाठी किती वेळ लागलेला आहे, यावर त्याचे वर्ग ठरतात. चांगल्या दर्जाच्या बांधकामात खिळासुद्धा मारता येत नाही. म्हणूनच काही विकासक बांधकाम सुरू असतानाच ग्राहकांना कुठल्या भिंतीवर कुठे खिळे मारायचे आहेत, याबाबत विचारणा करतात.
नळ, डोअर हँण्डल्स, लॉक्स, विंडो फ्रेम्स कोणत्या दर्जाचे आणि ब्रॅण्डचे आहेत, यावरूनही बांधकामाच्या दर्जाचा अंदाज येतो. इमारतीतल्या लिफ्टही कोणत्या कंपनीच्या आहेत, यावरून अंदाज बांधता येतो. कारण चांगले विकासक बांधकामाशिवाय इतर साहित्यांच्या दर्जातही तडजोड करत नाहीत.
चांगल्या विकासकांच्या गृहप्रकल्पांमध्ये आवश्यक तेवढी मोकळी जागा सोडलेली असते. लॉबी, पार्किंग, प्ले एरिया, वॉकिंग किंवा जॉगिंग ट्रॅक, गार्डन आदींसाठी ही मोकळी जागा वापरलेली असते. चांगल्या प्रकल्पांमध्ये जेवढा प्लॉट आहे तेवढ्या सर्व जागेवर बांधकाम केल्याचं कधीच पाहायला मिळत नाही. याचाच अर्थ हा आहे की ज्या प्रकल्पामध्ये योग्य प्रमाणात मोकळी जागा सोडलेली असते, त्या प्रकल्पातल्या इमारतींच्या बांधकामांमध्येही दर्जा राखलेला असतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट