Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

पुनर्विकास प्रकल्पाची विश्वासार्हता महत्वाची

$
0
0

दक्षिण मुंबईतील आमच्या चार उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचे काम खासगी विकासकामार्फत सुरू झाले आहे. आमच्या इमारतींना मुख्य रस्त्यापासून पुरेसा प्रवेश (access) नसल्यामुळे विकासकाने शेजारची छोटी चाळ, जी मुख्य रस्त्याला लागून आहे, ती विकत घेऊन एकत्रितपणे (amalgamation) पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू केली आहे. दोन्ही प्लॉटचे एकत्रित क्षेत्रफळ १,७४९ चौरस मीटर असून एकूण ११५ भाडेकरू आहेत. म्हाडाची एनओसी, महापालिका इमारत प्रस्ताव खात्याची आयओडी, या प्रक्रिया पूर्ण होऊन भाडेकरूंनी आपल्या जागा खाली करून इमारती पाडण्याचे काम सुरू झाले आहे. प्रश्न असा आहे, की वरील छोट्या चाळीच्या बाजूलाच आणखी एक मोडकळीला आलेली इमारत रस्त्याला लागूनच आहे. या इमारतीला सुद्धा पुनर्विकासामध्ये सामील करून मुख्य रस्त्यापासून व्यवस्थित प्रवेश (access) मिळावा, तसेच आमच्या पुनर्विकासासाठी एक सलग प्लॉट तयार व्हावा यासाठी विकासक प्रयत्नशील आहे. या इमारतीचे क्षेत्रफळ १३५ चौरस मीटर असून फक्त १३ भाडेकरू आहेत. या इमारतीचा मूळ घरमालक हयात नसून गेल्या कित्येक वर्षांपासून इमारतीचा सर्व व्यवहार रेंट कलेक्टर पाहत आहे. विकासकाने भाडेकरूंना समाधानकारक देकार (offer) देऊनही इमारतीमधील तीनचार भाडेकरू जाणीवपूर्वक पुनर्विकासाला विरोध करत आाहेत. सदर इमारतीचे स्वतंत्रपणे पुनर्विकासाचे काम कदापिही होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. तरी या इमारतीला आमच्यामध्ये सामीलकरून घेण्यासाठी म्हाडातर्फे काही कारवाई करता येईल का याबाबत मार्गदर्शन करावे.

- अवधूत बहाडकर

उत्तर

म्हाडा कायद्यांतर्गत कोणत्याही इमारतीला एखाद्या योजनेत जबरदस्तीने सामील करता येत नाही. तसे करणे हे अयोग्यच नव्हे, तर नियमबाह्यही आहे. याला अपवाद केवळ एकच, तो म्हणजे म्हाडा स्वतःच जर पुनर्विकास करत असेल आणि अशा प्रकारचा प्रश्न अथवा परिस्थिती उद्भवली, तर पुनर्विकासासाठी भाडेकरूंच्या संमतीची गरज नाही. मात्र विकासकामार्फत जर पुनर्विकास केला जात असेल, तर किमान ७० टक्के भाडेकरूंची या प्रकल्पास मंजुरी असणे गरजेचे आहे. आपल्या इमारतीचा पुनर्विकास योग्य व्हावा म्हणून एखाद्या छोट्या चाळीतील भाडेकरूंवर त्यांना मंजूर नसलेल्या अटी/शर्ती लादू पाहणे हे कुठेही आणि कुठल्याही कायद्यात बसत नाही. सबब आपण उल्लेख केलेल्या रस्त्याला लागून असलेल्या मोडकळीला आलेल्या इमारतीतील भाडेकरूंशी संवाद साधणे गरजेचे आहे. त्यांच्याशी सकारात्मक सूर ठेवून बोलणी करणे व पुनर्विकास फायद्याचा असल्याबद्दल त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणे हाच योग्य मार्ग ठरू शकतो. आपल्याला कल्पना असेल, की मुंबईत पाच हजारांहून अधिक इमारती विकासकाशी करार करून बसल्या आहेत आणि कित्येक वर्षे त्यांचे काम रेंगाळून अपुऱ्या अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी तर काम बंदच पडले आहे आणि भाडेकरू बेघर झाले आहेत. विकासकांनी भाडे देणेही बंद केले आहे. या सर्व परिस्थितीत या पाच हजारांहून अधिक इमारतींतल्या पाच लाखांहून अधिक रहिवाशांवर कोणते संकट आले असेल, याची आपण कल्पना करू शकता. अशा स्थितीत अडकलेल्या भाडेकरूंच्या असंख्य बातम्या रोज आपण वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांवर पाहत असालच. म्हणूनच विकासक करत असलेल्या पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात सामान्य माणसांच्या मनांत अनेक शंका येत असतात व ते रास्तही आहे. या भीतीपोटी भाडेकरू पुनर्विकासाच्या कोणत्याही प्रस्तावास संमती देत नाहीत. अशा भाडेकरूंवर बळजबरी करणे अयोग्य व कायद्याने तो गुन्हा आहे. आपण जरी त्यांची समजूत घातली आणि उद्या जर बाजार पडला, तर आपण नेमलेला बिल्डरही हेच करणार नाही, याची काय खात्री आपण देऊ शकतो, हाच खरा प्रश्न आहे. बिल्डरांची विश्वासार्हता सध्या जवळपास रसातळाला गेलेली आहे. जवळपास सर्वच बिल्डर कर्जबाजारी झालेले असून अनेकांची कर्जफेडीची क्षमताही क्षीण झालेली आहे. अशा परिस्थितीत पुनर्विकासासाठी कशा प्रकारच्या उपाययोजना करावयाच्या याचा विचार आपण व आपला बिल्डर यांनी मिळून करणे गरजेचे आहे. संवाद आणि पुनर्विकास प्रकल्पाची व बिल्डरची विश्वासार्हता हाच आपली समस्या मार्गी लागण्यास उपयुक्त ठरू शकतो.

‘पुनर्विकास’ सदरासाठी प्रश्न

‘पुनर्विकास’ सदरासाठी प्रश्न पाठवताना पुढील तपशील देणे अत्यावश्यक आहे ः भूखंडाचे क्षेत्रफळ, रस्त्याला लागू आहे किंवा कसे, रस्ता किती रुंद आहे, रहिवासी किती, प्रत्येकाच्या सदनिकेचे चटईक्षेत्र किती, दुकाने वा गाळे किती, अधिकृत की अनधिकृत याबाबत स्पष्टता, मुंबई बेट किंवा उपनगर, जमिनीची मूळ मालकी कोणाची, भाडेपट्टा कोणाच्या नावे, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा कसे, हे स्पष्ट असावे. तरच अचूक मार्गदर्शन मिळू शकेल. अन्य अनावश्यक तपशील मात्र कटाक्षाने वगळावा. प्रश्न शक्य तो टाइप केलेले, किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावेत. पाकिटावर ‘पुनर्विकास सदरासाठी’ असा स्पष्ट उल्लेख न चुकता करावा. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स टॉवर, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाउन्ड, लोअर परळ, मुंबई- ४०० ०१३.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>