Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

दोघांवरही कारवाई करावी

$
0
0

अॅड. राजीव वाघ, ज्येष्ठ वकील

प्रश्नः मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या एका सदस्याने १५ वर्षांपूर्वी संस्थेला न कळविता वा परवानगी न घेता आपली सदनिका परस्पर एका व्यक्तीला विकली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी सदर सदनिका खरेदीदाराला संस्थेचे सभासद होण्यास सांगितले असता तो सदस्यत्वासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता तर करीत करीत नाहीच, एवढेच नव्हे तर मासिक देखभाल शुल्कही 'सोसायटी'कडे भरत नाही. 'सोसायटी'ला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १०१ प्रमाणे कारवाई करावयाची असेल तर ती कोणावर करावी? सदनिका विकणाऱ्यावर की विकत घेणाऱ्यावर? सदनिका विकत घेणारा 'सोसायटी'चा सभासद नाही आणि विकून गेलेल्या आधीच्या सभासदाचा ठावठिकाणा 'सोसायटी'कडे नाही. व्यवस्थापकीय समितीने नेमके काय करावे?
— रा. स. सा., मुंबई.

उत्तरः तुमची 'सोसायटी' एकाच वेळी दोन कृतींचा अवलंब करू शकते. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह 'सोसायटी'ज अॅक्ट, १९६० च्या कलम १०१ अंतर्गत 'सोसायटी' मूळ सदस्याविरुद्ध कारवाईला सुरूवात करू शकते, जो अजूनही 'सोसायटी'च्या नोंदीमध्ये सदस्य आहे. दुसरी कारवाई, ही सदनिका खरेदी करणाऱ्याला 'सोसायटी'बाहेर काढण्यासाठी योग्य त्या न्यायालयात प्रकरण दाखल करण्याची. सदस्य बनल्याशिवाय कोणीही अशा प्रकारे 'सोसायटी'मध्ये राहू शकत नाही. तुम्ही या कृतींची पावले उचलली तर 'सोसायटी'ला समस्येची सोडवणूक सापडण्याची शक्यता आहे.

प्रश्नः मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या एका सदस्याचे २५ वर्षांपूर्वी निधन झालेले असून त्याच्या मुलाने सदर सदनिका त्याच्या नावे करण्याबाबत संस्थेला पत्र दिले आहे. दिवंगत सदस्याचे कोणकोण वारसदार अगर कायदेशीर प्रतिनिधी आहेत याबाबत संस्थेची व्यवस्थापकीय समिती निर्णय घेऊ शकत नसल्यामुळे, तसेच वारसांमध्ये वाद असल्याचे समजल्यामुळे समितीने त्याला सक्षम न्यायालयाकडून वारसाहक्क दाखला सादर करण्यास सांगितले. परंतु, दिवंगत सदस्याच्या मुलाने वारस दाखला न आणता आम्हाला 'लेटर ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन' सादर केले. प्रश्न असाः 'लेटर ऑफ सक्सेशन' आणि 'लेटर ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन' यामध्ये फरक आहे किंवा कसे? सोसायटी 'लेटर ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन'च्या आधारे सदनिकेचे हस्तांतर करू शकते का? सदनिकेचे हस्तांतर करतेवेळी 'हानीरक्षण बंधपत्र' (इन्डेन्मिटी बॉण्ड) लिहून घ्यावा किंवा कसे? या परिस्थितीतून 'सोसायटी'ने कसा मार्ग काढावा?
— एका 'सोसायटी'चा सचिव, मुंबई.

उत्तरः 'सोसायटी'च्या दिवंगत सदस्याच्या वारसाने सक्षम न्यायालयाकडून 'लेटर ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन' मिळवलेले असेल तर 'सोसायटी' त्याच्या नावावर सदनिकेचे हस्तांतर करू शकते. निर्विवाद सुरक्षितता हवी असेल तर 'सोसायटी' न्यायालयात चालू असलेल्या प्रकरणात हस्तक्षेप करू शकते आणि सदर वारसाला सदनिकेचे हस्तांतर करण्याकरिता परवानगी मिळण्यासाठी विनंती करू शकते. किंवा 'सोसायटी' एखाद्या तज्ज्ञाचा सक्षम कायदेशीर सल्ला घेऊ शकेल जो संबंधित 'लेटर ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन' वाचून त्याचा तपशील समजू शकेल. साधारणतः न्यायालय हे चल मालमत्तेसाठी ('मुव्हेबल प्रॉपर्टी') 'लेटर ऑफ सक्सेशन') देते. सदनिकेसारख्या अचल (स्थावर) मालमत्तेसाठी न्यायालय 'प्रोबेट' किंवा 'लेटर्स ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन' देतात.

'हाउसिंग 'सोसायटी' सदरासाठी प्रश्न
'हाउसिंग सोसायटी' सदरासाठी प्रश्न पाठविताना आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील इमारतींची संख्या, मजले, सदनिकांची संख्या, सदनिकांचे चटईक्षेत्र, प्रश्नाचे नेमके स्वरूप इत्यादी आवश्यक तो तपशील न चुकता नमूद करावा. मजकूर शक्य तो टाइप केलेला, अन्यथा किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावा. पाकिटावर 'हाउसिंग सोसायटी' सदरासाठी' असे स्पष्ट लिहावे. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स टॉवर, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाउन्ड, लोअर परळ, मुंबई- ४०० ०१३.
— — —

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>