उजेड ही अशी एक गोष्ट आहे जी पुरेशा प्रमाणात असेल तर लक्षात येत नाही, परंतु अपुरी असेल तर मात्र लगेच जाणवतं. उजेडाची खरी गरज असते ती घरातली कामं व्यवस्थितपणे करता येण्यासाठी आणि अंधारातही सगळं स्पष्ट दिसावं यासाठी. पण आजकाल मात्र लाइट्स हा होम डेकोरेशनमधला एक महत्त्वाचा घटक बनला आहे. लिव्हिंग रूम, किचन, बेडरूम, डायनिंग रूम, मुलांची बेडरूम, बाथरूम यासाठी वेगवेगळे लाइट्स वापरले जातात.
लिव्हिंग रूम म्हणजे घराचा आत्मा असतो. कारण घरात येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला सर्वप्रथम दिसते ती हीच रूम. त्यामुळे साधारणपणे लिव्हिंग रूमसाठी दिवसा उजळ प्रकाश देणारे आणि संध्याकाळी सॉफ्ट लाइट देणारे दिवे वापरले जातात. बऱ्याच ठिकाणी लिव्हिंग रूममध्ये मल्टिपल लाइट्सही वापरले जातात. स्टॅण्डिंग लाइट्स, झुंबर, सस्पेन्शन लाइट, एलइडी लाइट यांना आजकाल अधिक प्राधान्य दिलं जातं.
बेडरूम केवळ झोपण्यासाठी नव्हे तर रिलॅक्स होण्यासाठी, टीव्ही पाहण्यासाठी किंवा वाचन करण्यासाठी वापरण्याचा ट्रेण्ड रूजत आहे. त्यामुळे बेडरूममध्ये आल्हाददायक आणि सॉफ्ट लाइटचा फील देणारे टेबल लॅम्प वापरले जातात. तसंच रात्री कोणालाही डिस्टर्ब न करता बाहेर जाण्यासाठी फूट लाइट वापरले जातात. हे लाइट्स रूममधल्या स्कर्टिंग टाइल्सवर लावले जातात जेणेकरून तुम्हाला अंधारातही व्यवस्थित रस्ता दिसावा.
किचनमध्ये मात्र जास्त प्रकाश देणारे लाइट्स वापरले जातात जेणेकरून स्वयंपाक करणं सोपं होईल. याउलट डायनिंग रूमसाठी डीमर अर्थात डीम करता येणाऱ्या लाइट्सना प्राधान्य दिलं जातं. हँगिंग लाइट्सचा उपयोग किचन किंवा डायनिंग रूम्समध्ये अधिक प्रमाणावर केला जातो. मुलांच्या रूमसाठी सॉफ्ट लाइट्स वापरले जातात. याशिवाय मुलांना अंधाराची भीती वाटू नये म्हणून डीम लाइट्सही वापरले जातात. बाथरूममध्ये मात्र स्पॉट किंवा सिलिंग लाइट वापरले जातात. भिंतीवर लावले जाणारे वॉल लाइट्स विविध आकारात आणि प्रकारात पाहायला मिळतात. तसंच डेकोरेटिव्ह लाइट्स हे उजेड देण्यापेक्षा त्या रूमचा लूक खुलवण्याचं काम करतात. यामध्ये असंख्य प्रकार आणि डिझाइन्स उपलब्ध आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट