Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

गिरगावची शान

$
0
0

- गणेश आचवल

परंपरा जपत असतानाच सामाजिक बांधिलकीलासुद्धा महत्त्व देणारी लेन हे आपल्या कार्यातून सिद्ध करणारी निकद्वारी लेन म्हणजे गिरगावाची शानच आहे.

गिरगाव आणि गिरगावचा राजा अर्थात गणपती यांचं अतूट नातं आहे. तो गणपती जिथे स्थापित केला जातो, ती लेन म्हणजे गिरगावातली निकद्वारी लेन. याच लेनला एस.व्ही.सोवनी पथ असंही म्हटलं जातं. या लेनमध्ये काही इमारती तर काही चाळी आहेत. या चाळींना १०० वर्षांची परंपरा आहे.

दामोदर बिल्डिंग, महावीर बिल्डिंग, आशा गेस्ट हाऊस, वाझ मॅन्शन, डिमेलो हाऊस अशा अनेक इमारती याच लेनमधल्या. त्यापैकी दामोदर बिल्डिंग ही ११० वर्षं जुनी आहे. तळमजला व वर तीन मजले अशी या इमारतीची रचना आहे. इथे एकूण २८ कुटुंबं राहतात. इथल्या घरांचं क्षेत्रफळ साधारणतः १५० चौ.फूट आहे. महावीर हाऊस हीसुद्धा अशीच एक जुनी इमारत. तळमजला आणि वर तीन मजले अशी इथली रचना आहे. या दोन्ही इमारतीत सर्व मराठी कुटुंबियांची वस्ती आहे. वाझ मॅन्शन ही इमारत तळमजला अधिक एक मजला अशा रचनेची आहे आणि इथे ख्रिश्चनधर्मीयांची वस्ती आहे. डिमेलो हाऊसमध्येसुद्धा तळमजला व वर दोन मजले अशी रचना असून इथेही ख्रिश्चनधर्मीय कुटुंबं राहतात.

निकद्वारी लेनमधलं चंपेश्वर महादेव मंदिर तब्बल १२० वर्षं जुनं आहे. दूधवाला बिल्डिंग नावाची एक जुनी चाळ या लेनमध्ये होती. तिचा पुनर्विकास होऊन तिथे श्रीजी सदन हा दहा मजल्यांचा टॉवर उभा राहिला आहे. याच लेनमध्ये खटावकर भुवन, जीवनदीप, नारायण निवास अशा इमारतीसुद्धा आहेत. तसंच ८० वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असणाऱ्या चित्तपावन ब्राह्मण संघाची इमारत याच लेनमध्ये आहे. सारस्वत बँकदेखील इथे आहे.

१९२८ पासून इथे सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाला सुरुवात झाली. इथली गणपतीची मूर्ती ही 'पर्यावरणाचा राजा' अशी ओळखली जाते. १९८३ मध्ये 'महाराष्ट्र टाइम्स'नेच या मूर्तीचं नामकरण 'गिरगावचा राजा' असं केलं. गणपतीची मूर्ती संपूर्णपणे पर्यावरणस्नेही असते. मूर्ती शाडूची असते आणि तिचं वजन तीन टन असतं. पाटकर कुटुंबियांची चौथी पिढी ही मूर्ती घडवत आहे.

बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीची स्थापना झाली ती याच निकद्वारी लेनमध्ये ! 'गिरगावचा राजा' या मंडळातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. नेत्रचिकित्सा शिबीर आयोजित केलं जातं. १९९० मध्ये इथे 'आधार' नावाची संस्था स्थापन होऊन या संस्थेने २५० मुलांना दत्तक घेतलं आहे. मंडळातर्फे 'गिरगाव सुंदरी' स्पर्धेचंसुद्धा आयोजन केलं जात होतं. निकद्वारी लेनमध्ये राहणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता अतुल काळे, मंगला संझगिरी, चित्रपट निर्माते अश्विन वर्दे, सिनेमटोग्राफर जयंत पाठारे.

गेल्या वर्षी 'गिरगावचा राजा'च्या वतीने दानपेटीत जमलेले अडीच लाख रुपये 'नाम फाऊंडेशन'ला देण्यात आले. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 'गिरगावच्या राजा'चा अभिमानाने उल्लेख केला. गिरगावातल्या या लेनमध्ये मराठी संस्कृती टिकून आहे. शिवजयंती उत्सव, हनुमान जयंती, होलिकोत्सव, दहीहंडी असे सर्व पारंपरिक सण इथे मोठ्या उतसाहाने साजरे होतात. परंपरा जपत असतानाच सामाजिक बांधिलकीलासुद्धा महत्त्व देणारी लेन म्हणून 'निकद्वारी लेन'चा उल्लेख करावा लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>