- अच्युत राईलकर
एखाद्या शहरात फेरफटका मारल्यानंतर रस्ते आणि झाडांकडे दृष्टी गेल्यावर याचा अंदाज येतो म्हणजे ते शहर किती स्वच्छ आणि स्मार्ट आहे. मुंबई शहरात काय दिसतं?
मुंबई शहरची लोकसंख्या आणि झाडांचं गुणोत्तर काय? मुंबई शहराची लोकसंख्या तब्बल १४० लाख. पण झाडांची संख्या केवळ सुमारे २४ लाखच. गुणोत्तरानुसार ती फारच कमी आहेत. म्हणजे एका झाडाने दिलेल्या प्राणवायूवर जवळपास ६ नागरिक अवलंबून आहेत. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर सरासरी पाच झाडं २८ माणसांना प्राणवायू पुरवतात. मुंबईची तुलना आपण नेहमीच न्यूयॉर्क शहराशी करतो. न्यूयॉर्कमध्ये एका माणसामागे सरासरी पाच झाडं आहेत. म्हणजे मुंबई आणि न्यूयॉर्कचं वृक्ष संख्येचं गुणोत्तर १:२८ असं आहे. तसं बघितलं तर न्यूयॉर्कमध्ये उंच, गगनभेदी इमारतींची संख्या मुंबईपेक्षा जास्त. तरीही तिथे झाडांची संख्या जास्त. मुंबईबद्दल बोलायचं तर हरित दर्जाचं संवर्धन करणाऱ्या वृक्षराजींकडे सरकारचं आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेचं आवश्यक असणारं लक्ष नाही, हेच खरं.
महाराष्ट्र राज्यातलं हे खालच्या दर्जाचं गुणोत्तर फक्त मुंबई शहरातच नाही, तर ते संबंध राज्यातच आहे. २००७ ते २००९ या काळात महाराष्ट्रात कित्येक लाख झाडं कापली गेली. ती कदाचित विकास कामांसाठी असतील. पण त्यामुळे गुणोत्तरातली तफावत मात्र वाढली.
विविध कारणांनी वृक्षतोड
गृहनिर्माण वा रस्तारुंदीकरणासारख्या विकासकामांसाठी वृक्ष विभागाकडून परवानगी घेऊन कंत्राटदारांकडून झाडं तोडणं, रस्ता बांधताना डांबरीकरण वा काँक्रिटीकरण करताना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या बुंध्यांना अपाय करणं, गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबईतल्या झाडाना फंगस आणि पर्जन्यवृक्षांना मिली बग किडींची बाधा होऊन ती मरणं, अशा अनेक घटना घडत आहेत. त्यासंदर्भात खाली दिलेली माहिती बोलकी आहे.
जानेवारी २०१५ : जानेवारी ते जून २०१४ मध्ये महापालिकेच्या वृक्षतोड विभागाला महापालिकेने ८२९१ झाडं तोडण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु त्या झाडांच्या पुनर्वसनाची झाडं कुठे लावल्याचं कळत नाही.
जानेवारी २०१५ : ग्रीन ट्रिब्युनलने ३ महिन्यांत भायखळा ते दहिसर दरम्यानच्या १९६५ झाडांच्या भोवतीचं काँक्रिट काढण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत.
मे २०१५ : वांद्र्याच्या स्थानिक कार्यशील लोकांनी वांद्रे तलावाजवळच्या काँक्रिटने वेढलेल्या झाडांबद्दल मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार करताना कंत्राटदार आणि त्यांचं काम बघणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.
सप्टेंबर २०१५ : वनशक्ती संस्थेने तक्रार केल्यावर उघड झालं की, मुंबईतल्या देवनार व इतर ७ ठिकाणांवरील ११,९७० झाडांभोवती टाकलेलं काँक्रिट काढलं गेलं नाही. फक्त पेव्हर फरशाच काढल्या गेल्या. थोडक्यात उद्यान विभागाने झाडांकडे योग्य लक्ष दिलं नाही. वास्तविक पाहता जुलै २०१५ मध्ये वनशक्ती संस्थेनी तक्रार केली होती की, जुहू तारा रस्त्यावरच्या झाडांचं काँक्रिट काढावं.
जून २०१६ : आठवडाभरातल्या पावसामुळे ३८० झाडं पडल्याच्या तक्रारी अग्निशमन खात्याकडे पोहोचल्या होत्या.
जुलै २०१६ : मालाडच्या सुंदर नगर इथल्या रस्त्यावरच्या काँक्रिटीकरणांमुळे झाडांच्या मुळाभोवती जागा न ठेवल्यामुळे काही झाडं कोसळून अपघात घडलेले आहेत. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे झाडांवर आपत्ती आली.
५ जून रोजी पर्यावरण दिनी महापालिकेने १० लाख झाडं लावणार अशी घोषणा केलेली आहे. पण ही झाडं महापालिकेनी कुठे लावल्याचं आढळत नाही.
महापालिकेने ठरवलं आहे की जेवढी झाडं तोडली जातील तेवढ्याच झाडांचं पुनर्रोपण झालं पाहिजे. न्यायालयाने मात्र १ झाड तोडलं तर ३ झाडांचं पुनर्रोपण करा असे आदेश दिलेले आहेत.
बांधकाम आणि पर्यावरण हे बरेचदा एकमेकांच्या विरोधात जातात. वृक्षांच्या वा वन्यप्रदेशांच्या मोठ्या प्रमाणावरच्या कत्तलीने आपल्याला कायम पाणीपुरवठा करणारा मोसमी पाऊस अशक्त बनू शकतो.
गेल्या दोन वर्षांहून अधिक काळात मिली बग किड्यांची बाधेमुळे मुंबईतली हजारो झाडं मेली आहेत. त्यावर महापालिकेला अजूनही खात्रीचा उपाय सापडला नाही. कारण ही किडीची बाधा अजून पर्जन्यवृक्षांना होत आहे.
वृक्ष गणती
महापालिकेने २००७-०८ मध्ये केलेल्या गणतीत मुंबईत एकूण १९ लाख झाडं आढळली होती. २०१४ मध्ये नवीन पद्धतीच्या गणतीचं काम सुरू झालं आणि १८ प्रभागांमध्ये एकूण २४ लाख झाडं उभी असल्याचं निदर्शनास आलं. ही पद्धत जीपीएस यंत्रणेची मदत घेऊन करण्यात आलेली आहे. प्रत्येक झाडाला युनिक आयडेंटीटी क्रमांक देण्यात आला आहे. झाडांचा प्रकार, उपप्रकार, वय, उंची, आजार, सद्यस्थिती इत्यादी २५ बाबींची यात नोंद केली जाणार आहे. जीपीएस पद्धतीमुळे बेकायदेशीर वृक्षतोडीवर लगाम बसेल, असा दावा महापालिकेने केला आहे.
वृक्षसंवर्धनाचे फायदे
शहरात शास्त्रीय पद्धतीने वृक्ष लागवड वा रोपण करून त्यांची देखभाल करून संरक्षण केलं तर शहरवासियांना असंख्य प्रकारचे फायदे होतात. ते खालीलप्रमाणे आहेतः
वृक्ष संवर्धनामुळे सामाजिक फायदे होतात. शहरवासियांना सुख, शांती, समाधान मिळतं. पानं, फुलं, फळं मिळतात आणि शहराचं सौंदर्य खुलतं.
पर्यावरणीय फायदे मिळतात. वातावरणातली कर्ब द्रव्यं शोषली जातात आणि आपल्याला प्राणवायू मिळतो. वायू-प्रदूषण, जलप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषण कमी होतं.
डोंगरं वा उतरंडीवरच्या मातीची झीज होत नाही.
हरितद्रव्यात वाढ होते.
लहान मुलांचा अतीनील किरणांपासून बचाव होतो.
ऊर्जेची बचत होते.
हवामान बदलावर अटकाव पडतो.
वृक्षांमुळे थंड वारे वाहतात जे सर्वाना आनंद देतात.
प्राणी, पक्षी, पाखरं, सूक्ष्म-अतीसूक्ष्म जीव झाडांमुळे जिवंत राहतात.
वृक्षसंवर्धनात अर्थशास्त्रीय फायदेसुद्धा आहेत. झाडांपासून फळं, पानं, मुळांचा वापर खाण्यासाठी होतो. त्यातून शरीराला औषधी घटक मिळतात.
इमारतींसाठी शोभिवंत लाकूड मिळतं.
काही ठिकाणी इंधन म्हणून झाडांच्या फांद्या वा लाकडांचा वापर होतो.
कोणती झाडं लावाल?
कुणी म्हणतं देशी झाडं लावा, तर कुणी परदेशी. परंतु मुंबईत रस्ता व्यापून टाकणारी बहुतांश झाडं ही विदेशी आहेत. पिवळ्या रंगीत फुलांचा सडा पाडणारा सोनमोहोर, कीड लागणारे मोठे पर्जन्यवृक्ष आणि सगळ्यांचा आवडता गुलमोहोर ही सगळी झाडं परदेशी आहेत.
पण आता महापालिकेने स्थानिक वा देशी झाडं लावण्याला प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. तरी काहीजण म्हणतात धार्मिक वा औषधी झाडं लावा. रूद्राक्ष, बेलपत्र, चिंच, चंदन, देवदार, कदंब, बकुळ, पळस, अर्जुन, वड, समुद्रफुल, पुत्रंजीव, कडुनिंब, उंबर, पिंपळ, बहावा, तामण, करंज, नागचाफा, सातवीण, वावळ, शिसवा, बेहडा, कांचन, जांभूळ, साग, अंबाडा इत्यादी.
वृक्षशास्त्राप्रमाणे (arboriculture) काही तत्त्वं आहेत आणि ती पाळली पाहिजेत. पादचाऱ्यांना वा वाहतुकीला अडथळा येणार नाही, ती पथदिव्यांना अडचण ठरणार नाहीत आणि ती एका ओळीत लावताना त्यांच्यात योग्य अंतर राहिल, हे मुद्दे विचारात घेतलं पाहिजे. झाडांच्या फांद्या वा मुळं बाहेर आली तर ती विचार करून छाटावीत जेणेकरून वृक्षांना इजा पोहोचणार नाही.
मुंबईकरांनी वृक्षवाढीसाठी काय करावं?
१५ वर्षांपूर्वीपासून महापालिकेचा महाकाली केव्हज मार्गाचा एक अडीच एकराचा भूखंड कचरा क्षेत्र बनला होता. स्थानिक लोकांनी या भूखंडावर २५० झाडांचं उद्यान बनवलं आहे. आता तिथे १८ प्रकारचे पक्षी आणि १२ प्रकारची फुलपाखरं येऊ लागली आहेत. अशाप्रकारे मुंबईत राहणाऱ्या लोकांनीच आता पुढाकार घेतला पाहिजे आणि आपल्या परिसरातल्या जागांवर झाडं लावली पाहिजेत. केवळ झाडं लावून न थांबता त्यांचं संवर्धन आणि संरक्षण केलं पाहिजे. तरच मुंबईतला हरित पट्टा वाढेल.
झाडांविषयी थोडंसं रोचक
पर्जन्यवृक्षांचं मूळ स्थान ब्राझील, पेरू, मेक्सिको, अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडात आहे. या भागांमध्ये या वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. वर्षभर हे झाड हिरवेगार दिसतं. या झाडाची उंची २०-२५ मीटर होते. भारतीय शिरीष वृक्षाशी याचं साम्य आहे. या झाडाला दाट गर्द हिरव्या पानांमधून गुलाबी फुलं येतात.a
होकायंत्राचं काम करणारा वृक्ष अमेरिकेत आढळतो. या वृक्षाच्या पानांची टोकं नेहमी उत्तर दिशा दाखवतात.
मधुर संगीत ऐकवणारा वृक्ष पॅरिसध्ये बघायला मिळतो. या झाडांच्या पानांना छिद्रं असतात. त्यातून हवा आरपार गेल्याने बासरीचा ध्वनी निर्माण होतो.
कॅलिफोर्नियात क्रोधी वृक्ष आढळतो. हा वृक्ष कुणी डिवचल्यामुळे रागावला तर पानांच्या खडखडाट करून आपला क्रोध व्यक्त करतो.
मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या अंबेसावळी गावात आंब्याचं झाड लावलं की दृष्टी जाते अशी लोकांची शेकडो वर्षांपासून अंधश्रद्धा आहे. म्हणून तिथे कैक वर्षं आंब्याची लागवड होत नाही.
चिनी सदाहरित वा अँग्लोनेमा कम्युटॅटम वनस्पती वायूप्रदूषण कमी करते. घरातलं प्रदूषण रोखण्यासाठी कमी प्रकाशात वाढणाऱ्या या वनस्पतीचा उपयोग करण्यात येतो. १०० चौ.फू. घराला दोन-तीन झाडं अर्धा फूट व्यासाच्या कुंडीत लावली तरी परिणामकारक ठरतात.
'य़ेल'च्या अभ्यासानुसार सध्या विश्वात ३,००० अब्जापेक्षा जास्त झाडं आहेत.(म्हणजे माणसी ४२२ झाडं). मानवाकडून वा नैसर्गिकरित्या दरवर्षी अंदाजे १५ अब्ज झाडं नष्ट होतात.
(लेखक ज्येष्ठ अभियंते असून त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जलविभागात काम केलेलं आहे.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट