पावसाळा म्हणजे मेण्टेनन्सचा ऋतू, असं म्हटलं जातं त्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. त्यातही लाकडी फर्निचरसारख्या महागड्या गोष्टींबाबत तर जास्तच काळजी घ्यावी लागते. अन्यथा पावसामुळे त्याची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही.
मुंबईतच नव्हे तर राज्यभर पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. असं असलं तरी पावसाळ्यात अनेक समस्यांनाही सामोरं जावं लागतं हे विसरून चालणार नाही. पावसाळ्यात घराची जेवढी काळजी घेतो तेवढीच किंबहुना त्याहून थोडी जास्त काळजी घरातल्या लाकडी फर्निचरची घेणं आवश्यक आहे.
पावसाळ्यात ज्या काही समस्यांना सामोरं जावं लागतं त्यातली एक ठरलेली समस्या म्हणजे पावसाळ्यात लाकडी फर्निचरचं फुगणं. त्यात दरवाजे, कपाटं, फ्लोअर्स या सगळ्यांचाच समावेश होतो. फर्निचर सोबतच अजून एका समस्येला सामोरं जावं लागतं ते म्हणजे गळती आणि दमटपणा, ज्यामुळे लाकडी फर्निचरला वाळवी लागण्याची शक्यता बळावते. हा ऋतू वाळवी, लहान कीटक, सिल्व्हर फिश आणि बुरशी यांच्या पैदाशीसाठी अनुकूल काळ आहे. आपलं आपल्या घरातल्या लाकडी फर्निचरवर नितांत प्रेम असतं. त्यामुळे या फर्निचरला अशी अपायकारक लागण आणि दमटपणाचा
शाप लागू नये असं वाटत असेल तर फर्निचरला पावसाळा-सज्ज बनवण्याखेरीज दुसरा उपाय नाही.
उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा, या विचाराप्रमाणे दैनंदिन जीवनात काही गोष्टी अवलंबल्या तर पावसाळ्यातही लाकडी फर्निचर सुरक्षित राहू शकेल.
फर्निचर आणि तत्सम लाकडी वस्तूंची घ्यायची काळजीः
पावसाळ्यात फर्निचरची देखभाल करताना या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेतः सीलिंग, व्हेण्टिलेशन आणि कव्हरिंग. आणखी एक लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत घराचं कोणत्याही प्रकारे नूतनीकरण किंवा रंगकाम करू नये, विशेषतः लाकडी फर्निचर तर अशा कामांपासून दूरच ठेवावं.
पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत पॉलिशिंग आणि रंगकाम करू नये. कारण त्यामुळे लाकडाच्या बाह्यभागावर वाईट परिणाम होतो. पॉलिशिंग नेहमी पावसाळ्यानंतर करावं.
कॅनेडियन वूडचं फर्निचर वाळवी, किडे आणि बुरशीला प्रतिबंध करतं.
लाकडी वस्तू शक्यतो दमट किंवा ओल्या जागी असू नये. घरात जिथे सर्वाधिक आर्द्रता असेल ती जागा लाकडी फर्निचरसाठी अत्यंत धोकादायक असते. अशा ठिकाणाहून लाकडी फर्निचर त्वरित हलवावे.
खिडक्यांच्या बाजूलाही लाकडी फर्निचर ठेऊ नये. कारण खिडक्यांमधून पावसाचं पाणी घरात येत असेल तर त्यामुळे लाकडी फर्निचर खराब होऊ शकतं. खेळत्या हवेमुळे लाकूड सुकतं. त्यामुळे मोठ्या आणि खुल्या खिडक्यांसह क्रॉस व्हेण्टिलेशन असलेली खोली लाकडी फर्निचरसाठी केव्हाही चांगली.
लाकडी फर्निचर बनवताना पाण्याला प्रतिबंध करणाऱ्या अॅडेसिव्हचा वापर करावा. हे फर्निचर पाण्याच्या संपर्कात आल्यास हे अॅडेसिव्ह त्याचं लॅमिनेट निघू देत नाही.
फर्निचर साफ करतानाही ओल्या कपड्याएवजी मऊ कापडाचा वापर करावा. धूळ आर्द्रता खेचून घेते. ही आर्द्रता वाढल्यास फर्निचरची लकाकी कमी होऊ शकते.
अति दमटपणामुळे फर्निचरवर बुरशीचा थर जमण्यास सुरुवात होते. घरात डी-ह्युमिडिफायरचा वापर करून घरातल्या आर्द्रतेवर नियंत्रण ठेवता येतं. डी-ह्युमिडिफायर खोलीतली आर्द्रता
काढून टाकतो ज्यामुळे तुमच्या फर्निचरचं सौंदर्य दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. फर्निचरला भेगा गेल्या असतील किंवा ते नेहमीपेक्षा जास्त जड वाटत असेल किंवा त्याची चमक कमी झाल्यासारखी
वाटत असेल तर असं फर्निचर व्यवस्थित गुंडाळून ते दोनेक महिन्यांसाठी तसंच झाकलेलं ठेवावं.
कपाट किंवा वॉर्डरोब भिंतीपासून किमान सहा इंच दूर ठेवावा कारण ते ओलावा खेचतात. वॉर्डरोबमध्ये आर्द्रता शोषून घेणाऱ्या कापूर किंवा डांबराच्या गोळ्यांसारख्या
गोष्टी ठेवाव्यात. तसंच वॉर्डरोबमध्ये कडुनिंबाचा पाला ठेवल्यास कृमी-कीटक चार हात लांब राहतात.
फर्निचरने आर्द्रता शोषून घेऊ नये यासाठी त्याला ऑइलिंग किंवा वॅक्सिंग करावं.
फर्निचरसाठी सूर्यप्रकाश फार चांगला हा गैरसमज अनेकांना असतो. त्यामुळे सूर्यप्रकाश थेट लाकडी फर्निचरवर येऊ देऊ नका. सूर्यप्रकाशामुळे
लाकडी फर्निचरची लकाकी, रंग आणि लाकूडही खराब होत असल्याने त्याचं एकंदकीत सौंदर्य काही आठवड्यांतच कमी होऊ शकतं. सूर्यप्रकाशापासून लाकडी फर्निचरची सुरक्षा करण्यासाठी ब्लाइण्डस, शेड किंवा यूव्ही विण्डो प्रोटेक्शनचा वापर करा.
फर्निचरसाठी कॅनेडियन वूडचाही वापर केला जाऊ शकतो. हे लाकूड वाळवी, बुरशी, किडे यांना प्रतिबंध करत असल्याचं सिद्ध झालं आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट