मध्यंतरी 'ही चाल तुरुतुरु' हे एव्हरग्रीन मराठी गीत एका तरुणीने नव्या ढंगात सादर केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले. देवदत्त साबळे यांचं संगीत असलेल्या या गाण्याची जादू आजही कायम आहे, असंच म्हणावं लागेल. वडील शाहीर साबळे यांच्याकडून संगीताचा वारसा मिळालेले देवदत्त साबळे आपल्या घराबद्दल खूप आत्मियतेने बोलतात.
एकेकाळी गिरणीच्या भोंग्याने ज्या परिसरावर राज्य केलं त्या परळ-लालबागमधल्या गिरण्यांच्या उंच चिमण्या जाऊन तिथे आता टोलेजंग निवासी टॉवर उभे राहू लागले आहेत. या भागाची ओळख झपाट्याने बदलत असली तरी इथे चाळी, बैठी-कौलारू घरं, सुस्थापित मध्यमवर्गीयांच्या हाऊसिंग कॉलन्याही अद्याप आपलं अस्तित्व राखून आहेत. अशीच एक हाऊसिंग कॉलनी म्हणजे परळमधलं 'आंबेकर नगर'. या कॉलनीमध्ये मराठी सिने-नाट्यसृष्टीतले काही नामवंत कलाकार राहतात; पण इथलं एक घर असं आहे ज्याने या सिने-नाट्यसृष्टीचा लौकिक वाढवणारे अनेक कलाकार घडवले. ते घर म्हणजे शाहीर साबळे यांचं घर!
शाहीर साबळे यांचा कलेचा वारसा त्यांचे सुपुत्र देवदत्त साबळे यांच्याकडे आला. 'ही चाल तुरुतुरु' आणि 'मनाच्या धुंदीत' या गाजलेल्या गाण्यांना संगीताचा साज चढवणारे आणि गायक म्हणूनही प्रसिद्ध असणारे देवदत्त साबळे आपल्या घराबद्दलच्या अनेक आठवणी आणि किस्से खूप आत्मियतेने सांगतात. आई राधाबाई, पत्नी वैजयंती, थोरला मुलगा शिवदर्शन, सून अमृता, नात आध्या आणि धाकटा मुलगा हेमराज असं मोठं कुटुंब या घरात सध्या नांदतंय.
'१९६१ मध्ये आम्ही कॉलनीत राहायला आलो. त्यावेळी मी ९-१० वर्षांचा होतो. त्याआधी आम्ही काळाचौकीच्या अभ्युदय नगरमध्ये राहायचो. तिथलं घर लहान होतं आणि आजूबाजूला सतत गडबड-गोंधळ, कोलाहल असायचा. याचा परिणाम बाबांच्या म्हणजेच शाहीर साबळेंच्या निर्मितीक्षमतेवर पडायचा. त्यामुळे बाबांना असं घर हवं होतं जिथे शांतता असेल. शिवाय त्यांना भेटायला येणाऱ्या माणसांनाही येणं-जाणं सोपं जाईल. त्या निकषांमध्ये बसणाऱ्या आंबेकर नगरमधल्या या घराची त्यांनी निवड केली.
कॉलेज संपेपर्यंत मी मुंबईबाहेरच होतो. मुंबईतल्या या घरी आलो की चित्त थाऱ्यावर राहत नसे. कारण या घरात त्याकाळी इतक्या दिग्गज मंडळींचा राबता असायचा मी भारावून जायचो आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचं. त्यामुळेच कदाचित बाबांनी मला शिक्षणासाठी मुंबईबाहेर पाठवलं असावं.
या घराने बाबांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ अनुभवला आहे. त्यांच्या कामाच्या व्याप्तीमुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, नाटककार विजय तेंडुलकर, लेखक/कवी चिं.त्र्यं. खानोलकर, दिग्दर्शिका सई परांजपे, संगीतकार श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर अशा अनेक बड्या व्यक्तींचे पाय या घराला लागले आहेत. याच घरात बाबांना मी त्यांच्याबरोबर चर्चा, सल्ला-मसलत करताना पाहिलं आहे, अनुभवलं आहे.
आत्ताच्या नामवंत कलाकारांपैकी अनेकांना त्यांच्या उमेदीच्या काळात या घराने आसरा दिला होता. काहींचा या घरात दोनेक महिने मुक्कामही
होता. अनेकजण मायेच्या हक्काने इथे राहिले आहेत. त्यामुळे हे निव्वळ घर
नाही, तर कलावंत घडवणारी एक कार्यशाळा आहे.
'महाराष्ट्राची लोकधारा' या गाजलेल्या कार्यक्रमाची संकल्पना याच घरात जन्माला आली आणि ती वाढली, बहरलीही इथेच. बाबा कामानिमित्त रशियाला गेले होते. तिथे वेगवेगळ्या प्रांतातल्या कलाकारांना त्यांनी एकत्रितपणे आपली लोककला सादर करताना पाहिलं. तेव्हा त्यांना उमगलं की आपल्या महाराष्ट्राची लोककलेची दौलत तर याहून मोठी आहे. त्यांनी ही कल्पना बोलून दाखवल्यानंतर माझ्या बहिणी चारूशीला साबळे-वाच्छानी आणि चैत्राली मंगेश दत्त यांनी ती उचलून धरली आणि त्या कामाला लागल्या. या कार्यक्रमाचे सुरुवातीचे सर्व पदन्यास याच घरात झाले. पुढे या कार्यक्रमाने इतिहास घडवला जो सर्वांनाच ज्ञात आहे.'
मोठमोठे टॉवर उभारले जात असल्याने सध्या परळमधल्या जागांना सोन्याचे भाव आले आहेत. पण साठ-सत्तरच्या दशकातलं चित्र वेगळं होतं.
'हे घर बाबांनी १६,००० रुपयांना विकत घेतलं होतं. त्यानंतर साधारणतः ७७-७८ दरम्यान आम्ही शेजारचं घर विकत घेतलं. तेव्हा या बाजूच्या घरासाठी आम्ही ४५,००० रुपये एवढी किंमत मोजली होती. परळ सोडून दुसरीकडे मोठं, प्रशस्त घर घ्यावं असा विचार मुलांच्या मनात येतो कधीकधी. पण त्यासाठी माझा कायम नकार होता आणि राहिल. हे घर सोडून दुसरीकडे राहायला जाण्याची कल्पनाही मला सहन होत नाही. 'झुलवा', 'संगीत बया दार उघड' अशा कलाकृतींना मी संगीत दिलं ज्याच्या तालमी याच घरात झाल्या. या घराशी असलेले माझे ऋणानुबंध खूप घट्ट, कधीही न तुटणारे आहेत.
आता कामातून निवृत्त झालो आहे. पण मला चालण्याचं व्यसन आहे. कधी लालबाग, कधी परळ, कधी दादर अशी माझी रपेट चालूच असते. खूप पाऊस पडत असेल आणि बाहेर जाणं शक्य नसेल तेव्हा आमच्या लांबलचक गॅलरीत ६०-७० फेऱ्या मारतो.
आत्तापर्यंत कामाच्या निमित्ताने मी देशभर खूप फिरलो, खूप पायपीट केली. आता मात्र घर आणि कुटुंबियांशिवाय दुसरं काहीही नको वाटतं. या साऱ्यांशीच मी एकरूप झालो आहे.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट