मुंबई, नवीन मुंबई व ठाणे इथल्या विविध विभागात औद्योगिक विभाग सोडून अन्य बहुतेक ठिकाणी डेसिबल्सचं उल्लंघन होतं. ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी नॉइज बॅरिअर्स बसवायला हवेत. तसंच रस्त्यांवरच्या उत्सवांपाठोपाठ डीजेवरही बंदी घालायला हवी.
मुंबईत प्रदूषणाची एक मालिकाच बनली आहे. वायू-जल-प्रकाश-भूमी आणि ध्वनिप्रदूषण. वाहनांच्या एक्झॉस्ट्मधून कमी जळलेल्या इंधनामधून ओझोन व इतर विषारी वायू आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या भ्रमणध्वनी माध्यमातून हवेत आणखी विषारी उत्सर्जन होत असतं. अशा बाबींमुळे मुंबईकरांना अनेक आजाराना तोंड द्यावं लागतं. पण ध्वनीचा सकारात्मक वापरही करता येतो.
ध्वनीची ताकद डेसिबलमध्ये (डीबी) मोजतात. डेसिबल हे लोगॅरिथमवर रचलेले आहेत. १० डेसिबल ताकद वाढली तर प्रत्यक्ष आवाज दुपटीने वाढलेला असतो.
ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून महाराष्ट्र व केंद्रीय प्रदूषण नियमन मंडळाने (MPCB & CPCB) डेसिबल-प्रमाणित बंधनं आणि मर्यादा आखून दिल्या आहेत. परंतु मुंबईत व इतर मोठ्या शहरात या प्रमाणांचं उल्लंघन केलं जातं आणि याला सर्वस्वी नागरिकच जबाबदार आहेत. महापालिका आणि पोलिस खातं अशा नियम-उल्लंघन करणाऱ्यांवर व्यवस्थित लक्ष देत नसल्याने आणि कडक कारवाई करत नसल्याने ही मंडळंही तितकीच अविश्वसनीय ठरतात.
'सीपीसीबी'ने ध्वनिप्रदूषणाचं गेल्या काही वर्षांत(२०११-१४) ९ मोठ्या (१० लाख लोकसंख्याहून जास्तीच्या) शहरांतल्या ३५ ठिकाणी सर्व्हेक्षण केलं होतं. त्यात मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्य़ाच्या सर्व ठिकाणांवर प्रमाणित बंधनापेक्षा अधिक ध्वनिप्रदूषण झालेलं आढळून आलं. मुंबईत सर्वात जास्त प्रदूषण आढळलं. दिल्लीचा क्रमांक लखनऊ व हैदराबाद पाठोपाठ चौथा आला तर बंगळुरू व कोलकाता शहरांमध्ये प्रदूषण मर्यादेचं कमी उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं.
सीपीसीबीने सरकारला वसाहतींच्या ठिकाणांबाबत काही मार्गदर्शक तत्व सांगितलेली असून ती खालीलप्रमाणे आहेत.
घरं औद्योगिक ठिकाणाहून जवळ बांधू नयेत. घरांभोवती वृक्षांची लागवड करावी आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडांच्या रांगा लावाव्यात. म्हणजे रस्त्यावरील कर्कश आवाजापासून रहिवाशांचा बचाव होईल.
नेहमीच्या वाहतुकीमुळे आजूबाजूच्या घरांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. कारखान्यातील मशिनरीचा, विमानांच्या आवाजाचा, कार्यालयातल्या विविध मशिनरी व सायरनसारख्या साधनांकडून प्रदूषण होतं.
वाहतुकीच्या गजबजाटामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होतं. याचं कारण चुकीचं नगरनियोजन वा नगर नियोजनाचाच अभाव.
विशेष सामाजिक घटना ध्वनिक्षेपण यंत्रं बसवून साजऱ्या करण्यात येतात, त्यामुळेही या प्रदूषणात भर पडते.
बांधकाम उद्योगधंदा, घरातली टीव्ही, भ्रमणध्वनी वा इतर ध्वनी उत्पन्न करणारी साधनं वापरल्यामुळेही ध्वनिप्रदूषण होतं.
मुंबई, नवीन मुंबई व ठाणे इथल्या विविध विभागात औद्योगिक विभाग सोडून अन्य बहुतेक ठिकाणी डेसिबल्सचं उल्लंघन होतं. त्याची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
वडाळा (७०.९५, ७३.२)
वाशी (६८.५, ५७)
अॅम्बेसेडर हॉटेल (७३.२, ६६.३)
एमपीसीबी ऑफीस, शीव (६८.७, ६६.९)
वांद्रे (६७.९, ६२.२)
ठाणे (६१.६, ५४.५)
बिसलेरी, अंधेरी (६८.९, ६६.५)
एलअॅण्डटी (६३, ५५.८५)
कांदिवली (६३.२, ५३.४)
चेंबूर (६२.७, ५६.८)
मुंबईतली महापालिकेची शांतता क्षेत्रं आणि तिथं किती डेसिबलची मर्यादा घालून दिलेली आहे, ते पाहू या.
ध्वनिप्रदूषणासंदर्भातल्या निरीक्षणासाठी दिवसाची वेळ सकाळी ६ ते रात्री १० तर रात्रीची वेळ रात्री १० ते सकाळी ६ अशी असते.
२००९ मध्ये मुंबईत ११७७ शांतता क्षेत्रं (सायलेन्स झोन) होती, ती २०१५ मध्ये १५३७ झाली आहेत. बेटावर ४५३, पश्चिम उपनगरात ५२४ आणि पूर्व उपनगरात ५४० अशी त्यांची संख्या आहे.
कुर्ल्यात सर्वात जास्त २६८ आणि सी प्रभागात सर्वात कमी १२ शांतता क्षेत्रं आहेत.
शांतता क्षेत्रापासून १०० मीटर अंतरापर्यंत परिसर हिशोबात घेऊन १७ प्रभागांचे नकाशे पुरे झाले आहेत. इतर प्रभागांतली शांतता क्षेत्रं नकाशावर दाखवण्याचं काम सुरू आहे.
मुंबईतल्या वायू प्रदूषणाची आकडेवारी रोजच्या रोज बघायला मिळते. तशी अन्य १२०० ठिकाणच्या ध्वनिप्रदूषणाचे आकडे समजण्यासाठी करण्यात येणारं काम ३५ टक्के पूर्ण झालं आहे. या वेगाने सर्व कामं पूर्ण व्हायला आणखी २ वर्षं लागतील.
ध्वनिप्रदूषणाने बाधित व्यक्तीवर आजाराचे काय परिणाम आढळतात ?
अनेक साधनांच्या सततच्या मोठ्या आवाजामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. एक तर ध्वनिप्रदूषणाचा कानावर परिणाम होतो आणि कमी ऐकू येतं. तसंच शरीरावर दबाव येणं, काळजी व भीती वाटणं, उच्च रक्तदाब वा हृदयाचे ठोके वाढणं, निद्रानाशाचा त्रास होणं, डोकं दुखणं, एकाग्रता भंग होणं, कामातला शीघ्रपणा कमी होणं आदी समस्यांना तोंड द्यावं लागतं.
प्रचंड ध्वनी निर्माण करणारी कारणं कोणती?
मोठे फटाके (१४० डीबी)
ध्वनिक्षेपण (१२७ डीबी)
वाहतुकीतले वाहनांचे भोंगे वा सायरन (११० डीबी)
बांधकाम उद्योग (१०७ डीबी)
विमानतळ/हेलिपॅड (९० डीबी)
रेल्वे शीळ (८५ डीबी)
बाहेरील जनरेटर वा एक्झॉस्ट (८५ डीबी)
घरातला पंखा वा वातायन (७५ डीबी)
विमान चालू होणं (१५० डीबी)
ढगांचं गडगडणं (१३० डीबी)
पोलाद कारखाना (१२० डीबी)
घड्याळाचा गजर (८० डीबी)
वातायन (६० डीबी)
फ्रीज (४९ डीबी)
पोलिस खात्याला न्यायालयाची सूचना
महाराष्ट्रातल्या ४६ महापालिका हद्दीतल्या १३८८ पोलिस केंद्रांसाठी फक्त ४९४ डेसीबल मापन यंत्रांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. या केंद्रांनी लवकरच म्हणजे ३ महिन्यांच्या आत १८४३ डेसिबल मापन यंत्रं बसवावीत, अशा सूचना उच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी धार्मिक उत्सव होतात आणि आवाजाची मर्यादा वाढते, तिथे ध्वनिमापन व्हायला हवं. मुंबईतल्या प्रत्येक पोलिस केंद्रावर ऑगस्ट २०१६ च्या शेवटापर्यंत ध्वनीमापन यंत्रं बसवली जाणार आहेत.
महापालिका किंवा पोलिस विभागाने खालील गोष्टी तपासाव्यात
ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने घरांजवळच्या सर्व उड्डाणपुलांवर नॉइज बॅरिअर्स बसवायला हवेत.
रस्त्यांवरील उत्सवापाठोपाठ डीजेवरही बंदी घालायला हवी. अलिकडे मुंबईच्या विमानतळावर नॉइज बॉक्स बसवण्यात आला आहे.
दुःश्राव्य (ultra) ध्वनी आणि ध्वनिशक्ती
ध्वनिप्रदूषणामुळे कोणाचंही नुकसान होतं आणि ते अहितकारी ध्वनीमुळे होतं. पण उपयुक्त अशा ध्वनीकडून अनेक गोष्टी मानवाना हितकारकरित्या मिळू शकतात.
समुद्राच्या लाटांचा आवाज, बाळांचं बडबडणं, ओढ्याचं खळखळणं हे गोड आवाज मानवाला मोहवून टाकतात. अशा आवाजाने शांत झोपही येऊ शकते.
भारतीय व परदेशी शास्त्रीय संगीत हे तर अनेकाना गुंगवून टाकतं आणि बेभान करतं. काही आजारांवर संगीतोपचार म्हणूनही याचा वापर होऊ शकतो. त्यातून आजार कमी वा बरे होण्यास मदत होते.
प्राचीन भारतात विकसित झालेल्या अनेक मंत्रसिद्धी या तर ध्वनीवर अवलंबित अशा शास्त्रशुद्ध आहेत. या मंत्रातला ॐकार हा तर सर्वमान्य असा शक्तिशाली मंत्र आहे. याच्या उच्चाराने आध्यात्मिक बळ मिळतं आणि त्यात वातावरण पवित्र करण्याची शक्तिही आहे.
दु:श्राव्य ध्वनी (Ultra sound) हा २०००० हर्ट्झपेक्षा अधिक फ्रिक्वेन्सीत असतो आणि तो मानवाला ऐकू येऊ शकत नाही. पण तो मानवाच्या हिताचा आहे.
मानवाला श्राव्य ध्वनी २० ते २०००० हर्ट्झ इतक्या मर्यादेतच असतो. बालकं हा दु:श्राव्य ध्वनी थोड्या-अधिक प्रमाणात ऐकू शकतात. अनेक कीटक, व्हेल, डॉल्फिन मासे व कुत्रा यांना हा आवाज ऐकू येतो. वस्तू आणि वेल्डिंगमधला दोष ओळखण्यासाठी या दु:श्राव्य ध्वनीचा अविध्वंसक चाचणीतून (NDT) वापर करतात. हा ध्वनी वैद्यकशास्त्रात इको-कार्डिओग्रॅमसारख्या अनेक प्रांतात उपयुक्त ठरला आहे.
ध्वनिप्रदूषणापासून घराचा बचाव कसा करायचा?
ध्वनिप्रदूषणापासून घराचा बचाव करायचा असेल तर घराच्या भिंतीना ग्लासवूल व फोमची प्रक्रिया करावी लागते. तसंच खिडक्यांची तावदानं जाड दुहेरी ग्लास सॅण्डविचची बसवून घ्यावी लागतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषणापासून घराचं संरक्षण होतं.
(लेखक ज्येष्ठ अभियंते असून त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जलविभागात काम केलेलं आहे.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट