Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

मुंबईची जडण-घडण करणारे थोर नायक

$
0
0

- अच्युत राईलकर

मुंबईला एक सुसज्ज शहर बनवण्यासाठी ज्यांनी आजन्म धडपड केली, पदरचे पैसे खर्च केले त्यात जगन्नाथ शंकरशेट यांचं मोलाचं योगदान होतं. कायम मुंबईच्या विकासाचा ध्यास बाळगणाऱ्या नानांना ३१ जुलै १८६५ रोजी मुंबईतच देवाज्ञा झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची ही ओळख.

नानांचे आजोबा गणबाशेट कोकणातून मुंबईला आले आणि तेव्हापासून मुंबईने त्यांना व त्यांच्या नाना शंकरने मुंबईला आपलंसं केलं. नाना म्हणजे जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे. त्यांची कर्मभूमी म्हणजे गिरगाव अर्थात मरिन लाइन्सपासून मुंबई सेंट्रलपर्यंतचा विभाग. हा भाग त्यांनी आपला मानला आणि त्याच्या विकासासाठी ते आजन्म झटत राहिले. १९ फेब्रुवारी १८०३ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला आणि ३१ जुलै १८६५ रोजी मुंबईतच त्यांना देवाज्ञा झाली.

नानांचे शिक्षणक्षेत्रातले कार्य, अनेक ठिकाणी केलेले परोपकार, सामाजिक कार्य तसेच मुंबईला घडवण्यासाठी त्यांनी जो पुढाकार घेतला तो सर्व मुंबईकरांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल. नाना शंकरशेट यांचे योगदान जमशेटजी जीजीभाय, कावसजी जहांगीर, दादाभाई नवरोजी, फिरोजशहा मेहता तसेच डेव्हिड ससून यांच्या तोडीचेच मानले पाहिजे. नानांनी १८५७ च्या उठावात भाग घेतल्याचा संशय ब्रिटिशांना होता पण पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली.

नानांचा जन्म एका पिढीजात धनिक कुटुंबात झाला. त्यांनी सचोटीने उद्योग-व्यवसाय केल्यामुळे व्यापारात पत कमावली. त्यांना व्यवसायात कायम यश व मान मिळाला. त्यांनी खूप धनसंचय केला पण समाजसेवाही केली. अशा सांगितलं जातं की, अरब आणि अफगाण व्यापारी आपले पैसे बँकेत न ठेवता नानांकडे ठेवत. नानांचे वडीलसुद्धा सावकारी पेढी चालवत. तेव्हा ब्रिटिश व ईस्ट इंडियाचे प्रतिनिधीही त्यांच्याकडे आर्थिक व्यवहार करत. असं म्हणतात की १८०० मध्ये नानांकडे १८ लाखाची संपत्ती होती. नाना गिरगावच्या एका वाड्यात राहत. तो वाडा पाडून तिथे आता एक उंच इमारत बनणार आहे.

नानांनी आपल्या मालकीची सर्व जमीन सार्वजनिक कामासाठी दान म्हणून देऊन टाकली. त्यांनी अनेक सोसायट्या व संस्था काढल्या त्याची यादी खूप लांब होईल. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांनी खूप मदत केली. व्यावसायिक व व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी एक सहकारी संस्था काढली. वस्तू संग्रहालयं व उद्यान बनवण्यासाठी त्यांनी निधी पुरवला. जीजीभाय यांच्याबरोबर भागीदारीमध्ये इंडियन रेल्वे असोसिएशन काढली. तिचेच रूपांतर पुढे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेमध्ये झालं. ती म्हणजे सध्याची मध्य रेल्वे. मुंबईतल्या मरिन लाइन्स इथली सोनापूरची स्मशानभूमी त्यांच्या मदतीतूनच तयार झाली.

नानांनी सर जॉर्ज बर्डवूड व डॉ. भाऊ दाजींबरोबर मुंबईत इमारतींचे, रस्त्यांचे आणि दुतर्फा झाडी लावण्याचे नियोजन व बांधकाम केले. नानांनी सार्वजनिक विकासासाठी स्वतःचे पैसे खर्च केले. सध्याच्या धनिकांना यामधून धडा घेता येईल. नाना शंकरशेट यांनी केलेले काम व दान याला तोड नाही. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात नाना शंकरशेट यांचे मोलाचे योगदान आहे.

मुंबई म्हटली म्हणजे आपल्यापुढे तिची जीवनवाहिनी असणारी रेल्वे यंत्रणा येते. दरदिवशी ७० लाखाहून अधिक प्रवाशांना वाहतूक करणारी उपनगरी रेल्वे सुरू होण्यास परत नाना शंकरशेटच मदत धावले. जीआयपीमध्ये दहा डायरेक्टर होते. त्यात ज्या दोन भारतीयांचा समावेश होता त्यापैकी एक नाना होते.

मुंबईतल्या सार्वजनिक व खासगी दिमाखदार इमारती, राजाबाई टॉवर, नियोजित रस्ते व दुतर्फा वृक्षारोपण, डेव्हिड ससून वाचनालय, एशियाटिक सोसायटी, एल्फिन्स्टन कॉलेज, संस्कृत शाळा व वाचनालय, मुलींकरता शाळा, ग्रँट मेडिकल व नायर महाविद्यालय, जेजे स्कूल ऑफ आर्टस, पाणीपुरवठा, आरोग्य यंत्रणा, रस्त्यावरचे दिवे, पालिका स्थापणे, भाऊचा धक्का, म्युझियम, राणीचा बाग इत्यादी अनेक सुविधा नानांच्या प्रेरणेतून स्थापल्या गेल्या. त्यांच्या कर्तृत्वामुळे मराठी, गुजराथी व देवनागरीत प्रथमच क्रमिक पाठ्यपुस्तकं छापली गेली. त्यामुळे सर्वांच्या शिक्षणाची सोय झाली.

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राइतकंच प्रचंड कार्य नानांनी आर्थिक व मूलभूत क्षेत्रातही केलं. १८४५मध्ये एतद्देशियांच्या भागीदारीने पश्चिम भारतात वाफेच्या बोटींचा पाया घालणारी बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी काढली. मराठी हिंदी, गुजराथी व्यावसायिक रंगभूमीचा पाया घालणारे बादशाही नाट्यगृह काढले. १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे मार्गावर आशिया खंडात प्रथमच धावलेल्या रेल्वेमध्ये बसून प्रवास केला. अर्थात ती रेल्वेगाडी धावण्यामागे नानांचेच प्रयत्न होते. शासकीय मध्यवर्ती वस्तूसंग्रहालय, मर्कण्टाइल बँक, सेंट्रल बँक आदी बँकाचीही स्थापना त्यांनी केली.

मुंबईकरानी एवढ्या मोठ्या मनाच्या नायकाचे कौतुक केले पाहिजे. सध्याचा जवळ जवळ सगळ्याच प्रांतात त्यानी आपली छटा उमटवली आहे.

(लेखक ज्येष्ठ अभियंते असून त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जलविभागात काम केलेलं आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles