मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
— 'सोसायटी' सदस्य.
उत्तरः बिल्डरने ताब्यात ठेवलेल्या फ्लॅटमध्ये तुम्हाला इतका अतिरेकी रस का आहे हे मला समजू शकत नाही. तुम्हाला जर त्याबाबत इतकीच चिंता असेल , तर तुम्ही त्याबाबत सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित करू शकता किंवा 'सोसायटी'ला या विषयाबद्दल पत्र लिहून आपले मत व्यक्त करू शकता. तुम्हाला कायद्यातील तरतूद निदर्शनास आणून द्यावी लागेल ज्यामुळे बिल्डरला शेअर सर्टिफिकेट दिले जाऊ शकत नाही, जर त्याने नोंदणी केलेली नसेल तर. बिल्डरने कशाची नोंदणी करावी अशी तुमची अपेक्षा आहे? नोंदणीचा प्रश्न तेव्हाच उद्भवतो जेव्हा स्थावर मालमत्तेचे हस्तांतर हे एका व्यक्ती/संस्थेकडून दुसऱ्या व्यक्ती/संस्थेला केले जाते. फ्लॅट आधीच बिल्डरच्या मालकीचा आहे. त्यामुळे तो त्या फ्लॅटचे हस्तांतर स्वतःलाच करू शकत नाही. त्यामुळे रजिस्ट्रेशनचा प्रश्नच उद्भवत नाही. बिल्डर 'सोसायटी'चा सदस्य बनू शकतो आणि त्याला अन्य कोणाहीप्रमाणे शेअर सर्टिफिकेट दिले जाऊ शकते. जेव्हा बिल्डर फ्लॅट विकेल तेव्हा तो आणि खरेदीदार यांच्यात होणाऱ्या कराराची नोंदणी करणे आवश्यक आहे. मग, नव्या मालकाच्या नावावर फ्लॅटची नोंदणी होईल, जशी 'सोसायटी'च्या अन्य कोणत्याही सदस्याबाबत होते.
प्रश्नः अहमदनगर शहराच्या एका उपनगरातील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेचा मी १५ वर्षांहून अधिक काळ अध्यक्ष आहे. आमची बंगल्याची 'सोसायटी' असून एकूण ८५ सदस्य आहेत. प्रत्येक सदस्याचा स्वतंत्र भूखंड आहे. सभासदांच्या जमिनींच्या ७/१२ च्या उताऱ्यांवर त्यांची मालकी व इतर हक्कांमध्ये संस्थेचे नाव आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठीच्या आदर्श उपविधिंमधील ९७ व्या दुरुस्तीअनुसार आमच्या संस्थेने नवीन उपविधि स्वीकारले आहेत. त्याअनुसार सभासद फक्त निवासासाठी (रहिवासी) घरे बांधू शकतो. तसेच नवीन घर बांधताना किंवा मोठी दुरुस्ती करण्यासाठी 'सोसायटी' बांधकाम आराखड्याच्या ('ले आउट') शिफारशीसह महानगरपालिकेकडे प्रस्ताव सादर करते व महानगरपालिकेच्या मंजुरीनंतर असे काम केले जाते. परंतु अलीकडच्या दोन प्रकरणात असे झाले आहे की सभासद परस्पर महानगरपालिकेच्या नगर नियोजन खात्याकडून 'ले आउट' मंजूर करवून घेऊन, व्यावसायिक हेतूसाठी भूखंडाचा व इमारतीचा वापर करण्याकरिता मंजुरी मिळवून आणि 'सोसायटी'च्या संमतीशिवाय परस्पर बांधकाम सुरू करू लागले आहेत. प्रश्न असेः महानगरपालिकेचे नगर नियोजन खाते 'सोसायटी' सदस्यांना परस्पर आणि व्यवसाय करण्याकरिता परस्पर मंजुरी देत आहे ते कायद्याच्या कोणत्या कलमाप्रमाणे? की अशी मंजुरी देणे बेकायदेशीर आहे? असे सभासद आणि महानगरपालिकेचे नगर नियोजन खाते यांच्याविरुद्ध 'सोसायटी' कोणाकडे दाद मागू शकते?
— एक 'सोसायटी' अध्यक्ष, अहमदनगर.
उत्तरः तुमच्या प्रश्नावरून असे दिसते की तुमच्या तथाकथित 'सोसायटी'चे सदस्य हे त्यांच्या भूखंडांचे आणि बंगल्यांचेही मालक आहेत. ही समजूत बरोबर असेल, तर तुम्ही स्थापन केलेली 'सोसायटी' ही 'महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज अॅक्ट, १९६०'च्या कक्षेत बसत नाही. या कायद्यातील नियमांमधील नियम १० मध्ये गृहनिर्माण संस्थांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करण्यात आलेले आहेः अ) टेनन्ट ओनरशिप सोसायटीज, ब) टेनन्ट को-पार्टनरशिप सोसायटीज आणि क) अदर हाउसिंग सोसायटीज. तुमच्यासाठी अ) आणि ब) वर्गातील गृहनिर्माण संस्थांचा संदर्भ येतो. 'टेनन्ट को-पार्टनरशिप सोसायटी'मध्ये भूखंड हा 'सोसायटी'च्या मालकीचा असतो आणि सदनिका या सदस्यांच्या मालकीच्या असतात. 'टेनन्ट को-पार्टनरशिप 'सोसायटी'मध्ये जमीन आणि इमारतीचा सांगाडा याची मालकी 'सोसायटी'कडे असते आणि सदस्यांना त्यांना वितरित करण्यात आलेल्या सदनिका/बंगला यामध्ये राहण्याचा हक्क असतो. भूखंड आणि बंगले हे सदस्यांच्या मालकीचे असल्यामुळे तुमची 'सोसायटी' ही सदर कायद्याच्या तरतुदींअनुसार स्थापन करण्यात आलेली नाही. त्यामुळेच महानगरपालिका आणि सदस्य अशा प्रकारे वागत आहेत की जणू 'सोसायटी' अस्तित्वातच नाही. तुमच्या 'सोसायटी'ला कसलाही कायदेशीर दर्जा नाही. सदस्यांना जर कायद्यातील तरतुदींप्रमाणे 'सोसायटी' स्थापन करायची असेल तर प्रत्येकाला आपला भूखंड किंवा भूखंड आणि बंगला 'सोसायटी'ला हस्तांतरित करावा लागेल.
( या सदरातील उत्तरे ही प्रश्नकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिलेली असतात. संबंधितांनी कोणतीही कृति करण्यापूर्वी आपल्या वकिलाचा सल्ला घ्यावा.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
अनेक वर्षं परदेशात राहून सपना पाटील भारतात परतल्या. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या पाटील या मुंबईतच लहानाच्या मोठ्या झालेल्या. त्यामुळे या शहरात एखादं घर असावं अशी त्यांची इच्छा असून एखाद्या चांगल्या ठिकाणी त्यांना गुंतवणूक करायची आहे.
स ध्या रिअल्टी मार्केट फार चांगलं आहे, असं म्हणता येत नाही. अजूनही ते धीम्या गतीनेच वाटचाल करत आहे. त्यामुळे नेमकी कुठे गुंतवणूक करण्याचा सल्ला सपना पाटील यांना द्यावा, हे समजत नाही. रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी अॅक्ट लवकरच लागू होणार आहे. आज गुंतवणूक केली तर काही वर्षांनी त्या प्रॉपर्टीची किंमत वाढली पाहिजे, थोडक्यात चांगला परतावा मिळाला पाहिजे, ही पाटील यांची साधी अपेक्षा. पण त्या लोकेशनच्या बाबतीत खूप काटेकोर आहेत. अशा परिस्थितीत पाटील आणि त्यांच्यासारख्या ग्राहकांनी खालील गोष्टी लक्षात घेऊनच मुंबईत गुंतवणूक करायला हवी.
भाड्यातून मिळणाऱ्या मिळकतीवरून एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या घरामधून किती वार्षिक उत्पन्न मिळू शकतं, हे समजू शकतं. मुंबई कोणत्या भागांमध्ये चांगली भाडी मिळतात हे बघितलं तर कांजूरमार्ग(प.), ठाकूर व्हिलेज, डायमण्ड गार्डन, कलिना या भागात चांगली वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
कांजूरमार्ग
चांगल्या अॅमेनिटीज असलेल्या ५५ लाख ते २ कोटींच्या घरांचा विचार केला तर कांजूरमार्ग हा एक चांगला पर्याय आहे. कारण हे उपनगर एकतर मुंबईत आहे आणि तिथे सर्व भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. या भागात अनेक विकासकांनी गृहप्रकल्पाची कामं सुरू केली आहेत. या गृहप्रकल्पांमध्ये पार्क, ब्रॅण्डेड फिक्श्चर, फ्लोअरिंग व फिटिंग्ज, अॅडव्हान्स सिक्युरिटी सिस्टिम आदी सेवासुविधा देत आहेत.
जॉब मार्केट हा कुठल्याही प्रॉपर्टी मार्केटवर प्रभाव टाकणारा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. ज्या भागात कॉर्पोरेट ऑफिसेस असतात त्याच्या आजूबाजूच्या मालमत्तांना नेहमीच मागणी असते. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड हा पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडलेला आहे. तसंच तो एलबीएस मार्गालाही जाऊन मिळतो. परिणामी या भागातून कुठेही जाणं किंवा येणं खूप सोपं आहे. त्यामुळे या परिसरातल्या घरांना भाडेकरू मिळण्यात कधीच अडचण येत नाही.
या भागातल्या ८०० ते १२०० चौ.फूट क्षेत्रफळाच्या घरांमधून ३० ते ६० हजारांपर्यंतचं भाडं मिळतं. सिक्युरिटी डिपॉझिट, वीजबील, पाणीपट्टी आदींचा खर्चही वेगळा असतो. या सर्वांमुळे घरातून मिळणारं उत्पन्नात वाढ होते.
ठाकूर व्हिलेज
कांदिवली पूर्व भागातलं ठाकूर व्हिलेज हे आणखी एक ठिकाण जिथे वैयक्तिक इमारती, टॉवर्स आणि अपार्टमेण्ट्सचे अनेक गुंतवणूक पर्याय आहेत. हा भाग शांत आहे पण त्याच्या आजूबाजूला गर्दी आहे. ठाकूर व्हिलेज खुलं असून तिथे हिरवळ आहे. या भागात घरं तर आहेतच, त्याचबरोबर खाण्यापिण्याची आणि हँगआऊटची अनेक ठिकाणंही आहेत.
ठाकूर व्हिलेज पश्चिम द्रुतगती महामार्गापासून जवळ आहे. या परिसरात कमी किमतीतले फ्लॅट्स मिळू शकतात. तसंच महागड्या गृहप्रकल्पांचे पर्यायही उपलब्ध आहेत. ४० लाखांपासून ते ६ कोटींपर्यंची घरं विक्रीसाठी आहेत. अर्थात त्यांच्या किमती क्षेत्रफळ, सेवासुविधा आणि लोकेशनवर अवलंबून असतात. छोट्या घरासाठी १२ हजार तर मोठ्या फर्निश्ड घरासाठी ८० हजारांपर्यंतची भाडी आहेत.
डायमण्ड गार्डन
डायमण्ड गार्डन भाग हा पूर्वी 'चेंबूरचा शोपीस' म्हणून ओळखला जायचा. सायन-ट्रॉम्बे रोडचं रूंदीकरण आणि लेन बिघडवणारी रेस्टॉरण्ट्स यामुळे ती ओळख हरवली होती. पण आता हा भाग खूप सोयीचा झाला आहे. म्हणूनच भाडेकरू डायमण्ड गार्डन भागाला नेहमीच प्राधान्य देतात. या भागातल्या घरांच्या किमती या साधारणतः १ कोटींपासून सुरू होतात. तसंच घराची भाडी २५ हजारांपासून पुढे काही लाखांपर्यंत जातात. ही भाडी भाडेकरूंना मिळणाऱ्या सेवासुविधांवर अवलंबून असतात.
चेंबूर हे एक मायक्रो मार्केट असलं तरी त्याचं व्यावसायिक महत्त्व खूप आहे. कारण या भागात आयटी कंपन्यांची कार्यालयं आहेत. म्हणूनच चेंबूरमध्ये भाड्याच्या घरांची मागणी नेहमी जास्त असते. सांताक्रूज-चेंबूर लिंक रोड, चेंबूर-वडाळा मोनोरेल आणि ईस्टर्न फ्रीवे यामुळे चेंबूरची कनेक्टिविटी खूप चांगली झाली आहे.
कलिना
सांताक्रूजमधल्या कलिना परिसराचा २००५ नंतर कायापालट झालेला आहे. पूर्वी या भागात जुन्या बंगल्यांची संख्या खूप होती. या बंगल्यांचा पुनर्विकास होऊन टॉवर्स उभे राहिले. त्यामुळे फार मोठ्या संख्येने या भागात नव्या घरांचा पुरवठा वाढलेला आहेत. कलिना भागात आज ८०० ते ९०० चौ.फूट क्षेत्रफळाचा टू बीएचके १ ते ३ कोटींना तर थ्री बीएचके १ ते ३ कोटींना आहे. भाड्याचे दर हे साधारणतः १२ हजारांपासून सुरू होतात आणि क्षेत्रफळानुसार १ लाखांच्याही पुढे जातात. अतिउच्च उत्पन्न गटात मोडणारे लोक या भागात गुंतवणूक करतात. हा भाग वांद्रे-कुर्ला संकुलासारखाच आहे.
दक्षिण मुंबईतलं लोअर परेल हा खूप महागडा भाग आहे. व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांना तो कदाचित आकर्षक वाटणार नाही. पण कलिना वाटेल. कारण काय तर तिथली आधारभूत किंमत. कलिनामध्ये राहण्यासाठी काही हजार अधिक देण्यास लोक तयार होतात, पण तिथली कनेक्टिविटी, सोयीसुविधा आणि लोकेशन सोडायला तयार होत नाहीत. यावरूनच कलिना गुंतवणुकीला किती योग्य आहे, हे लक्षात येतं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
मुंबई बेटातील 'म्हाडा'च्या एका वसाहतीत ४८ सदस्य सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संकुलात आम्ही राहतो. प्रत्येक इमारतीची स्वतंत्र सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. आमच्या या गृहनिर्माण संस्थांचा महासंघ व त्याची कार्यकारी समिती आहे. संस्थांच्या सर्व इमारतींच्या पुनर्विकासाची गरज निर्माण झाली आहे. पण, संस्थांच्या कार्यकारी समितीची मुदत जून २०१४ अखेर संपलेली असताना समितीने सप्टेंबर २०१४ मध्ये वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध न करताच पुनर्विकासासाठी निविदा मागविल्या.
खरे तर सदर कार्यकारी समिती ही काळजीवाहू होती व तिला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे सदर समितीने घेतलेले निर्णय नियमबाह्य व बेकायदेशीर ठरतात व आहेत असे आम्हा रहिवाशांचे म्हणणे आहे. महासंघाने ४८ सदस्य संस्थांची पूर्वमंजुरी न घेताच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची (प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट कन्सल्टन्ट- 'पीएमसी') नियुक्ती केली. सदर 'पीएमसी'ने पुनर्विकासातील शिलकी चटई क्षेत्रफळाचे वाटप हे 'म्हाडा'ला ६० टक्के आणि उर्वरित ४० टक्के चटई क्षेत्रफळ सदस्य सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे न दाखविता विकासकाच्या नावे दाखवून सदस्य संस्थांचे नुकसान केले आहे.
महासंघाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया चालू असतानाच महासंघाच्या कार्यकारी समितीने विकासकाला आधी सहा महिने व त्यानंतर ९० दिवसांची नियमबाह्य पद्धतीने मुदतवाढ दिली. या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका अन्य एका विकासकाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. महासंघाच्या झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत चार विकासकांचे सादरीकरण घ्यावे असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले होते, पण कार्यकारी समितीने ते केले नाही. महाराष्ट्र शासनाच्या ३ जानेवारी २००९ च्या निर्देशातील क्र. ११ अनुसार विकासकाची निवड झाल्यानंतर एक महिन्याच्या आत पुनर्विकास करारनामा करणे आवश्यक आहे.
परंतु ४८ पैकी ३० सहकारी गृहनिर्माण संस्थांनी विकासकाची निवड करून दहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही पुनर्विकास करारनामा झालेला नाही. पैकी ४ गृहनिर्माण संस्थांनी विकासकाला मंजुरी देण्याचे नाकारले. तसेच ८ संस्थांच्या सदस्यांनी विकासकाला निवडणाऱ्या कार्यकारी समितीच्या निर्णयाविरुद्ध तीव्र विरोध व्यक्त केला व काही संस्थांमध्ये त्यांच्याच व्यवस्थापकीय समित्यांच्या विरोधात अविश्वास ठरावही मंजूर करण्यात आले. आमच्या 'म्हाडा' वसाहतीतील गृहनिर्माण संस्थांच्या सन २००२ ते २०१२ या कालावधीत निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी विहित मुदतीत 'एम- २०' बंधपत्रे सादर करणे आवश्यक होते.
पण त्यांनी ती सादर केली नाहीत हे सिद्ध झाले. असे पदाधिकारी अपात्र असतानाही त्यांनी पुनर्विकासाची प्रक्रिया राबविली. या सर्व बाबींचे संदर्भ देऊन आम्ही सहकार आयुक्तांकडे तक्रार सादर केली असून, त्यांच्या निर्णयाची प्रतिक्षा करीत आहोत. सर्वसमावेशक पुनर्विकास साध्य करण्यासाठी आम्ही आता काय करावे?
— चिंतित सदनिकामालक, मुंबई.
उत्तरः
आपण तडक सहकार आयुक्तांकडे तक्रार केली हे योग्यच केले. साधारणपणे खालच्या अधिकाऱ्यांवर बिल्डरांची पकड घट्ट बसली असल्याचे ऐकिवात येते. अनेकवेळा आयुक्तदेखील त्याची दखल घेत नाहीत असे म्हटले जाते. अलीकडच्या काळातच मात्र नवीन सहकार आयुक्तांची नेमणूक झाली आहे व सहकार विभाग स्वच्छ करण्याच्या ते मागे लागले आहेत असे कळते. आपल्या बाबतीतही त्यांनी पूर्ण चौकशी व्हावी असे आदेशदेखील दिल्याचे कळते.
प्रश्न असा आहे की, चौकशी कोण करणार? ज्यांनी आतापर्यंत या सगळ्या चुकीच्या गोष्टींना साथ दिली किंवा सोयीस्कर काणाडोळा केला तेच चौकशी करणार असतील तर न्याय कसा मिळणार? जनतेला न्याय द्यायचा असेल तर ही पूर्ण प्रक्रिया पुन्हा करणे आवश्यक आहे. विशेष सांगायचे म्हणजे या विकासक निवडीच्या तथाकथित प्रक्रियेत 'म्हाडा'ला ३ चटईक्षेत्र निर्देशांक मिळेल असे गृहीत धरले होते. नवीन विकास नियमावलीत हे वाढवून ४ पर्यंत नेण्यात आले आहे. म्हणजेच 'म्हाडा'ला ३३ टक्के अधिक चटईक्षेत्र मिळणार.
मात्र रहिवाशांना देय असणारे चटईक्षेत्र ३३ टक्के वाढवण्यात आलेले नाही. ते वाढवावे अशी मागणी 'म्हाडा'च्या सर्व वसाहतींतून येत आहे. याच्यावर जो निकाल होईल तो होईल, पण त्याचा पूर्ण लाभ जनतेला व्हावा याकरितादेखील विकासक निवडीची प्रक्रिया पुन्हा सुरूवातीपासून करावी लागेलच. तसे आदेश आयुक्तांनी द्यावेत असे आम्हाला वाटते. अन्यथा, विविध विकासक पूर्ण वसाहतीचे तुकडे पाडून नागरिकांच्या एकजुटीचे लचके तोडतील हेही तितकेच उघड आहे. आपण नागरिकांची ही लढाई अधिक जोमाने लढावी असे आम्हाला वाटते.
( या सदरातील उत्तरे ही प्रश्नकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिलेली असतात. संबंधितांनी कोणतीही कृति करण्यापूर्वी आपल्या वकिलाचा सल्ला घ्यावा.)
पुनर्विकासः प्रश्नकर्त्यांना सूचना
'पुनर्विकास' सदराकरिता प्रश्न पाठविताना पुढील तपशील देणे अत्यावयक आहेः भूखंडाचे क्षेत्रफळ, रस्त्याला लागून आहे किंवा कसे, रस्ता किती रुंद आहे, रहिवासी किती, प्रत्येकाच्या सदनिकेचे चटईक्षेत्र किती, दुकाने वा गाळे किती, अधिकृत किंवा अनधिकृत याबाबत स्पष्टता, मुंबई बेट किंवा उपनगर, जमिनीची मूळ मालकी कोणाची, भाडेपट्टा कोणाच्या नावे, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहे किंवा कसे, हे स्पष्ट असावे. तरच अचूक मार्गदर्शन मिळू शकेल. अन्य अनावश्यक तपशील मात्र कटाक्षाने वगळावा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
उत्तरः मला तुमचे दोन्ही प्रश्न योग्य वाटत नाहीत, कारण त्यातून कोती आणि संकुचित मनोवृत्ती दिसते आहे. एखाद्या सदस्याने त्याला वितरित करण्यात आलेल्या पार्किंगच्या जागेत त्याच्या तीनपैकी एक कार पार्क केली तर त्यात 'सोसायटी'चे काय नुकसान होते? तुम्ही सर्व संबंधितांनी का चिंता करावी आणि निर्बंध लागू करून सक्ती करावी की त्याने विशिष्टच कार त्याच्या पार्किंगच्या जागेत ठेवावी? पार्किंग त्या सदस्याचे आहे आणि कायद्याप्रमाणे तो त्याच्या मालकीची कोणतीही कार त्याच्या पार्किंगच्या जागेत ठेवू शकतो. जर तो सदस्य अन्य कोणाची कार त्या जागेत पार्क करीत असता तर परिस्थिती वेगळी असती. दुकानदारांच्या पार्किंगच्या बाबतीत तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबाबत मी तुम्हाला असे विचारतो की 'सोसायटी'ला पार्किंगच्या जागा 'शिफ्ट बेसिस'वर देण्याची इच्छा आहे का? अन्यथा दुकानदारांनी त्यांच्या मोटारी फक्त दुकाने चालू असतानाच्या वेळेतच ठेवावीत की कसे, असे विचारण्याचा प्रश्नच येत नाही. दुकानमालक हेही 'सोसायटी'चे सदस्य आहेत आणि त्यांना इतर सदस्यांप्रमाणेच हक्क आहेत. ते आपल्या मोटारी त्यांना वितरित करण्यात आलेल्या जागेत ठेवू शकतात आणि त्यांच्यावर तुमच्या मनात आहे त्याप्रमाणे निर्बंध लागू केले जाऊ शकत नाहीत.
प्रश्नः मुंबईतील एका नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा मी सदस्य असून गेल्या नऊ वर्षांपासून माझ्या सदनिकेत राहत आहे. मी देत असलेल्या मासिक देखभाल शुल्काच्या पावत्या 'सोसायटी' माझ्या नोंदणीकृत असलेल्या नावावर देत आलेली आहे. अलीकडेच 'सोसायटी' व बिल्डर यांच्यात अभिहस्तांतर करार ('कन्व्हेयन्स डीड') झाला. या 'डीड'मध्ये 'सोसायटी'कडे नोंदणीकृत असलेले माझे नाव दाखविलेलेच नाही, उलट त्याऐवजी माझी दोन वेगळी आडनावे दाखविलेली आहेत. मी 'सोसायटी'ला पत्र देऊन सदर चूक निदर्शनास आणली व ती दुरुस्त करण्याची विनंती केली आहे. परंतु 'सोसायटी' कसलीच कार्यवाही करण्यास तयार नाही. उलट 'सोसायटी'ने चुकीची आडनावे असलेली दोन नावे तशीच ठेवली व एक चुकीचे आडनाव ('सरनेम') रजिस्ट्रेशनसाठी पाठविले आहे. माझ्या सदनिकेची नोंदणी आधीच झालेली आहे व 'सोसायटी'च्या दफ्तरात (रेकॉर्ड) असलेले नाव बरोबर आहे. बिल्डरने सदनिका खरेदीच्या वेळीच सदनिका खरेदीविक्री कराराची, रजिस्ट्रेशनची प्रत व इतर शुल्के भरल्याच्या पावत्या 'सोसायटी'ला दिलेल्या आहेत. तरीही 'सोसायटी'ने उपनिबंधक, सहकारी संस्था यांना माझे नाव चुकीचे पाठविले आहे. याबाबत मी काय कायदेशीर कारवाई करू शकतो? — एक 'मटा' वाचक, मुंबई.
उत्तरः तुम्ही नोंदणी प्राधिकरणाला पत्र लिहून हे निदर्शनास आणू शकता की तुमचे आडनाव चुकीचे देण्यात आलेले आहे. दस्तऐवज नोंदणीकृत होण्यापूर्वीच प्राधिकरण 'सोसायटी'ला नावाची दुरुस्ती करण्यास भाग पाडू शकते.
( या सदरातील उत्तरे ही प्रश्नकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिलेली असतात. संबंधितांनी कोणतीही कृति करण्यापूर्वी आपल्या वकिलाचा सल्ला घ्यावा.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
घराच्या सजावटीला काय लागतं? सुखी संसाराला काय लागतं असे प्रश्न विचारल्यावर त्या साऱ्यांचं उत्तर 'समाधान' असेल तर... सगळ्यांच्या बाबतीत तसं घडेलच असं नाही पण कवी चंद्रशेखर गोखले आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री उमा गोखले यांच्यासाठी मात्र हे उत्तर नक्कीच लागू पडतं...
खरं सांगायचं तर 'घर' याविषयावर मी कितीही तास बोलू शकतो. कारण ज्या कविता, चारोळ्या मी केल्या त्याची सुरुवात घरातूनच झाली. शेवटी घर, घर म्हणजे तरी काय...
इमारत बनायला वेळ लागत नाही
घर बनायला वेळ लागतो
घरासाठी दोन जीवांचा
खराखुरा मेळ लागतो
इथे राहायला येण्याआधी पवई हिरानंदानीमध्ये म्हाडाच्या घरात राहत होतो. पण तिकडे पाण्याची काहीच सोय नव्हती. १२ ही महिने टँकरच्या पाण्यावर राहावं लागायचं. त्यात उमा गातेही, त्यामुळे तिच्या गळ्यावर त्याचा परिणाम व्हायला लागला. त्यानंतर आम्ही ते घर सोडण्याचा विचार केला. घर शोधत असताना आम्हाला कांदिवलीचा हा परिसर इतका आवडला की पाहताचक्षणी ठरवलं की इथेच घर घ्यायचं ठरवलं.
पावसाळ्यात हा परिसर खूप सुंदर बनतो. मी आणि उमा दोघंही मासेखाऊ आहोत. इथे अनेक ठिकाणी मच्छिबाजार भरतो. इथे घर घेण्यासाठी हे कारण आम्हाला पुरेसं वाटलं. सध्या इथे रिडेव्हलपमेण्टचे वारे वाहू लागलेत. पण दुसरीकडे राहायला जायचं तरी चारकोप सोडून जाणार नाही, एवढे आम्ही या परिसराशी एकरूप झालो आहोत.
माझं बालपण पार्ल्यातलं. तिथे आमचं घर होतं. पण त्या घराची ऊब मला कधी जाणवली नाही. काही माझ्या चुका असतील तर काही आई-वडिलांच्या. त्यामुळेच कदाचित माझ्या कवितांमधून घराबद्दलचा एक ओलावा प्रकर्षाने जाणवतो. लहानपणी न मिळालेल्या घराच्या प्रेमातून असेल कदाचित मला घराच महत्त्व अगदी सुरुवातीपासूनच पटलं. त्यामुळेच अनेक ठिकाणी भाड्याने राहून, अनेकदा बेघर होऊन जेव्हा पवईच्या घराची किल्ली आम्हाला मिळाली तो क्षण मला आजही आठवतो. कित्येक तास मी आणि उमा फक्त भिंतींना टेकून काहीही न बोलता बसलो होतो. ती शांतता भंग करत उमा मला म्हणाली होती, 'गोखले, इथून कोणीही 'ऊठ' म्हणणार नाही'. तो दिवस आम्ही कधीच विसरू शकणार नाही.
घर दोघांचं असतं
ते दोघांनी सावरायचं
एकाने पसरवलं तर
दुसऱ्याने आवरायचं असतं
आम्ही दोघं जगत आलो. उमेदीच्या काळात घरासाठीचे, अनेक चढउतार पाहिले. उमाच्या साथीशिवाय हे शक्यच नव्हतं. संघर्षाच्या काळात ती खंबीरपणे माझ्याबरोबर उभी होती. कधीही मान खाली जाऊ दिली नाही. कर्तृत्ववान बायको मिळाल्याचा मला नेहमीच अभिमान होता आणि आहे.
तुला शांत निजलेली पाहिलं
की मी निवांत होतो मनातल्या मनात
मला वाटतं हीच सुखाची सावली आहे
बाहेरच्या रणरणत्या उन्हात
आमच्या या घराला साथ मिळाली ती उमाच्या आईची. मी, उमा आणि आई. तिघांच्या या घरात तिघं कधीच नसतो. आमच्याकडे पाहुण्यांची वर्दळ खूप असते. घर कसं असावं असा जेव्हा मला कोणी विचारतं तेव्हा मी ते माझ्या घरासारखं असावं असंच सांगतो. कारण आमच्या घरी दोघांचं जेवण बनलेलं असेल आणि अचानक घरी पाहुणे आले तरी पाचजण तृप्त होऊन जेवतील असं अनेकदा घडलं आहे. घर मुळात समाधानी असलं की तुम्हाला आनंदी राहायला फार काही लागत नाही हा माझा एवढ्या वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत जेवढी घरं बदलली ती आम्ही बदलली, कोणीही आम्हाला जा म्हणून सांगितलं नाही. सुखी, समाधानी होतो. या संपूर्ण प्रवासात जिवाला जीव देणारी माणसं भेटली.
अनेकदा उमांच्या मालिकांमध्ये काम करणारी नवीन मुलं आमच्याकडे काही महिने, वर्षं राहून जातात. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं मानधन घेत नाही. फक्त या घरात राहताना हसतखेळत राहणं ही एकच अट असते. मला माणसांत गुंतवणूक करायला जास्त आवडते, जी मी आत्तापर्यंत करत आलो आहे. शिवाय मला सोनंही आवडतं. सोन्याची काही ना काही गोष्ट मी घेत असतो.
तुझी हिशोबाची वही का ठेवलीस?
माझ्या कवितेच्या वहीवर
त्या दोघांना एकत्र बघून
मला दाटून आला गहिवर
अशी माझी अवस्था होते. मी फक्त कविता करतो. सेव्हिंग माझा प्रांत नाही. गुंतवणुकीची सगळी जबाबदारी उमा आणि माझा मेव्हणा सांभाळतात. मासे खाणं, फिरणं, कविता करणं, लोकांचं स्वागत करणं यासारख्या गोष्टी मला जास्त चांगल्या जमतात. महाबळेश्वर आणि पन्हाळ्याला तर आम्ही दोघं वर्षातून चार ते पाच वेळा जातोच. शिवाय एका वृद्धाश्रमातही आम्ही पैसे भरायला सुरुवात केली आहे.
माझं स्वप्नातलं घर गोव्यात केरी (सत्तरी) गावी असेल. नयनरम्य असं ते गाव आहे. तीन बाजूंना डोंगर आणि एका बाजूला नदी यामध्ये वसलेलं हे छोटंसं गाव. शेतीवर उदरनिर्वाह होणाऱ्या याठिकाणी आम्हाला राहायला नक्कीच आवडेल. एखादं घर बांधायचं ठरवलं तर गोव्यातल्या या छोट्या गावीच बांधू हे नक्की.
मी आणि जग यामध्ये
माझ्या घराचा उंबरठा आहे
आणि छतापेक्षा मला
त्याचाच मोठा आधार आहे.
या घराच्या बाबतीत माझ्या काही अशाच भावना आहेत. कारण जो या घरात येतो तो रमतो. लहानपणी ज्या सुखासाठी धडपड चालली होती ती या घरात पूर्ण झाल्याने मला घरात राहण्याचा कधी कंटाळा येत नाही. साथीदाराची सोबत असली की कोणतंही घर बनवणं आणि त्याचं नंदनवन करणं फारसं कठीण नसतं असंच मला वाटतं.
शब्दांकन - मधुरा नेरूरकर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
दरवर्षी पावसाळा आला की चर्चा सुरू होते ती मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांची. त्यात 'रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते' असा प्रश्न विचारला जातो. अलिकडेच रस्तेकामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची बाब उघडकीला आली असून त्यात ६ कंत्राटदार दोषी आढळले आहेत.
शहरात नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता हे एक उत्तम साधन आहे. रस्तासेवा हे एक विकासाचं महत्वाचं अंग मानलं जातं. देशातला एकूण प्रवासापैकी सुमारे ९० टक्के प्रवास आणि एकूण मालवाहतूकीपैकी ६५ टक्के वाहतूक ही रस्त्यानेच होते. त्यामुळे मुंबई असो की देश रस्ते हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे.
भारतात रस्त्यांचं प्रमाण किती?
महामार्गाची घनता ०.६६ किमी प्रति भूमी चौ.कि.मी. आहे. अमेरिकेच्या महामार्गांचं प्रमाणही तेवढंच आहे. चीनचं ०.१६ तर ब्राझीलचं ०.२० आहे. परंतु आपल्या देशातले महामार्ग तुलनेने अरूंद असल्याने तसंच त्यांचे पृष्ठभाग कमी दर्जाचे असल्यामुळे रहदारी खोळंबळून राहते.
भारतात २०१३ मध्ये रस्त्यांची लांबी ४.७ दशलक्ष किमीहून जास्त होती. पण त्यापैकी फक्त २.५३ दशलक्ष किमी रस्तेच पक्के आणि वाहतूक करण्यायोग्य होते.
भारतातल्या रस्त्यांचं प्रमाण १००० माणसांमागे ३.८ किमीहून कमी आहे. ही लांबी एकदम नीचांकावर आहे. अमेरिकेत हे प्रमाण २१ कि.मी. तर फ्रान्समध्ये १५ कि.मी. आहे. शिवाय तिथले रस्ते गुणवत्तेत भारताच्या कितीतरी पटीने उत्तम दर्जाचे आहेत.
रस्ते कसे हवेत?
मुंबईतल्या रस्त्यांचं काम व्यवस्थित करून घेण्याची आणि ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे. रस्त्यांवर कायम लक्ष केंद्रित करून जिथे खड्ड्यांच्या वा इतर दुरुस्त्या हव्या असतील तिथे त्या महापालिकेने ताबडतोब केल्या पाहिजेत. सुयोग्य रेखाटन आणि देखभाल असलेल्या रस्त्यांवर अपघातांचं प्रमाण नक्कीच कमी असेल.
मुंबईतले काही रस्ते पीडब्ल्यूडी आणि एमएमआरडीएच्या ताब्यात आहेत. त्यांनी त्या रस्त्यांची देखभाल करायला हवी.
रस्ते हे कायम स्वच्छ ठेवले पाहिजेत. विशेषतः पावसाळ्यात त्यावर कुठेही पाणी साचता कामा नये. याचाच अर्थ रस्त्यांच्या बाजूला थोडा उतार (camber) असायला हवा. छोट्या रस्त्यांना एका बाजूला तर मोठ्या रस्त्यांना दोन्ही बाजूना नाले किंवा वर्षावाहिन्या बांधलेल्या हव्यात.
तसंच या वाहिन्यांमध्ये पाणी शिरण्याकरता जाळीची तोंडे असायला हवीत. पाणी तुंबू नये म्हणून नाले वा वाहिन्या साफ ठेवायला हव्यात.
जड वाहनांना रस्त्यावरून जाण्याची मुभा असेल तर रस्त्यांचं काम तशा रेखाटनांनी बांधलं पाहिजे. म्हणजे वाहनांचा भार व वेग तसंच तासाला ५० मिमीपर्यंतच्या तीव्रतेच्या पावसाला जुमानण्यायोग्य संरचनेचं असायला हवं.
रस्त्याच्या संरचनेत पाया, रोलरनी घट्ट केलेले बांधकामांचे थर (एक किंवा अधिक) आणि काँक्रिट वा बिट्युमेनबद्ध साजेसा पृष्ठभाग असायला हवा.
रस्त्याच्या घोटाळ्यात ६ कंत्राटदार
देशातला सर्वात मोठा मुंबईतल्या रस्त्याच्या बांधकामाचा गैरव्यवहार अलिकडेच समोर आला आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडून गैरव्यवहाराविषयी गौप्यपत्र आल्यावर ऑक्टोबर २०१५ मध्ये महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्या अधिकारात ही सर्व रस्ताकामं सुरू होती.
चौकशीची प्रथम फेरी : पहिल्या प्रयत्नात अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी ३५२ कोटींची ३४ रस्ताकामे चौकशीसाठी घेतली. चौकशी समितीत उप महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता आणि अन्य काहीजणांचा समावेश आहे. या कामात आरपीएस इन्फ्रा प्रोजेक्ट्स, केआर कन्स्ट्रक्शन, जयकुमार, रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्ट्स, आरके मधानी, महावीर इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदारानी कामं केली होती.
२५/४/१६ रोजी प्रथम चौकशीचा ११५ पानांचा अहवाल महापालिका आयुक्तांनी महापौरांकडे पाठवला.
प्रथमफेरी चौकशीत ३८ ते १०० टक्के (सरासरी ५३ टक्के) निकृष्ट काम झाल्याचं आणि खूप अनियमितता आढळून आली. रस्ता बांधकामाचा पाया निविदाप्रमाणित तत्वांवर आधारित नव्हता, त्यामुळे महापालिकेला १४ कोटीहून जास्त तोटा झाला आहे.
एसआयटीने महापालिकेच्या दोन अभियंत्यांना, दोन ऑडिटर कंपन्यांच्या काही लेखा निरीक्षकांना आणि कंत्राटदारांच्या नोकरवर्गांपैकी काहींना गुन्हेगार ठरवून पकडलं आहे. सहा कंत्राटदारानासुद्धा पकडण्याचं ठरवलं आहे.
चौकशीची द्वितीय फेरी: यात १००० कोटींची २१७ रस्ताकामांची चौकशी करण्यात येत आहे. १० तपास गटांच्या प्रत्येक समितीत १४ जण असणार आहेत. संबंधित १३ प्रभाग अधिकाऱ्यांना सखोल चौकशीसाठी रस्ता कामांवर १ मीटर खोल, १ मीटर लांब व १ मीटर रूंद चाचणी खोदकामाची (trial pits) तयारी करण्यास सांगितलं आहे.
या फेरीतही अनेक घोटाळे आढळले आहेत. त्याचा अहवाल बनवण्याचं काम बाकी आहे.
किती खड्डे बाकी ?
मुंबई शहरात अनेक रस्ते खड्ड्यांनी व्यापलेले आहेत. त्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
अंधेरी (प) : ४७ पैकी ७ बाकी
देवनार :३५ पैकी १२ बाकी
मालाड: २९ पैकी ६ बाकी
कांदिवली: २० पैकी ९ बाकी
पेडर रोड: १८ पैकी ५ बाकी
एलबीएस मार्ग: ६० खड्डे भरल्यावर पेवर ब्लॉक लावले ते लगेच निघाले
दादर-माटुंगा: ३२० पैकी ५० बाकी
अंधेरी लिंक रोडवरच्या चौकामधील खड्ड्यांची दुरुस्ती बाकी आहे.
महामार्गावरच्या खड्ड्यांची दुरुस्ती पीडब्ल्यूडीकडून होईल.
गेल्या ३-४ वर्षांत महपालिकेनी किती खड्डे दुरुस्त केले व किती खर्च केला?
२०१२ - २३१५६ खड्डे
२०१३ - ३७३२३ खड्डे
२०१४ - १४०७६ खड्डे
२०१५ - ६०४८ खड्डे
२०१६ आतापर्यंत : १६६ खड्डे
एकूण खर्च - २५०० कोटी रु.
खड्डे दुरुस्तीची पद्धत
गरम मिश्रण (Hot mix) - अस्फाल्ट व बिट्युमेन गरम मिश्रणाच्या बांधकामास काम संपल्यावर सुकण्यास जास्त वेळ लागतो. मिश्रण घट्ट होईपर्यंत वाहतूक बंद ठेवावी लागते. खर्च कमी येतो पण ते जास्त काळ टिकत नाही.
थंड मिश्रण (Cold mix) - या मिश्रणाचं सामान गरम मिश्रणासारखं लवकर सुकतं. त्यामुळे पावसाळ्यात काम करण्यास उत्तम आहे, पण ते अधिक खर्चिक असतं. कोल्ड मिश्रण वापरलं तरी काम संपल्यावर कमीत कमी चार तास सुकण्यासाठी थांबावं लागतं.
रस्ता दुरुस्तीत कंत्राटदार निकृष्ट खडी आणि डांबर वापरत असल्यामुळे खड्डे पुन्हा उद्भवतात. महापालिकेने अजून खड्डे दुरुस्तीची एकच प्रमाणित पद्धत ठरवलेली नाही. ती लवकर निश्चित करण्याची आवश्यकता आहे.
गेल्या ३-४ वर्षांत रस्ताकामं किती व खर्च किती?
२०१३-१४ (२३२४ - रु. ४३५५ कोटी)
२०१४-१५ (८६९ - रु. २८८३ कोटी)
२०१५-१६ (९० - रु. २१०५ कोटी)
एकूण (३२८३ - रु. ९५२३ कोटी)
पॉटहोल ट्रॅकर पद्धत
महापालिकेने पारंपरिक पॉटहोल ट्रॅकर पद्धत बंद करण्याचं ठरवलं आहे. यात व्हॉइस ऑफ सिटीजन.कॉम ही वेबसाइट २०११ पासून सुरू होती. ही साइट ३१ मार्च२०१६ पासून बंद केली आहे.
महापालिकेने ठरवलं आहे की, जुनी पद्धत बदलून आता नवीन पद्धत आणली पाहिजे. जोपर्यंत नवीन पद्धत सुरू होत नाही तोपर्यंत याकरता फेसबुक हे व्यासपीठ म्हणून वापरलं जाणार आहे. गरजूंनी तिथे आपल्या पॉटहोलच्या तक्रारी नोंदवाव्यात. नवीन पद्धत शून्य खर्चातून उभी राहिल. आतापर्यंत याला आपण दरवर्षी १ कोटी खर्च करत होतो. ती वेबसाइट अजून अद्यावत पण केली गेली नाही. महापालिकेच्या आयटी खात्याने आता जूनपासून नवीन पद्धत अवलंबण्याचं ठरवलं आहे. त्यात अनेक आधुनिक सुधारणा करण्यात येणार आहेत. तक्रारीसाठी MCGM24/7 हे अॅप अँड्रॉइड फोनवर डाऊनलोड करावं लागेल.
उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी आदेश दिले होते की, महापालिकेने नागरिकांकडच्या पॉटहोल तक्रारींसाठी तीन पद्धतींचा (ऑनलाइन, टेलिफोन व सोशल नेटवर्किंग वेबसाइट) अवलंब करावा.
न्यायालयाची महापालिकेला तंबी
खड्ड्यांची मलमपट्टी करू नका; दुरुस्तीला चांगलं मिश्रण वापरा, म्हणजे ते खड्डे परत होणार नाहीत. पावसाळ्यात खड्डे लवकर दुरुस्त करा. कारण नागरिकांची अवस्था दयनीय होते. आढळलेल्या ६ दोषी रस्ता कंत्राटदाराना काळ्या यादीत टाका आणि त्यांना पुन्हा दुसरं काम देऊ नका, अशा स्पष्ट शब्दांमध्ये न्यायालयाने महापालिकेला तंबी दिलेली आहे.
गैरव्यवहारांना वाव
परदेशांमध्ये नवीन रस्ते बनवणं, त्यांची कामं पूर्ण होत असताना आणि झाल्यावर तपासणी करणं, ही कामं क्वालिटी कंट्रोल विभागाकडून होतात. तर बिलाचं काम बांधकाम विभाग करतो. मुंबई महापालिकेच्या रस्ता विभागात काम तपासणाराच बिलं बनवतो. त्यामुळे गैरव्यवहार होण्यास भरपूर वाव असतो. त्याबाबत ऑडिटर कंपनीचा अनुभव चांगला नाही.
कंत्राटदारांनी काय करावं?
वास्तविक पाहता कंत्राटदारानी सिंडिकेट करू नये. शक्यतो कामात एक्स्ट्रॉ, एक्सेस व डिलिजन बाबी आणू नये. कामाचा आणि साहित्याचा दर्जा तसंच प्रकल्पाचं काम निविदा नियमावलीप्रमाणे असावं. स्वच्छता राखणं, प्रदूषण न होणं, सुरक्षितता ठेवणं, गैरव्यवहार न करणं, इतर कामात अडथळा न आणणं अशा गोष्टींचा अंगीकार केला पाहिजे.
तज्ज्ञांची समिती
रस्त्याचं काम सुधारण्यासाठी महापालिकेचे पूर्व आयुक्त यांनी २००४ मध्ये एक तज्ज्ञांची समिती (STAC) बनवली होती. पण ती काही कारणाने रद्द केली गेली. त्या समितीत देशातले नावाजलेले तज्ज्ञ होते आणि त्याचे अध्यक्षपद एस.आर. तांबे होते. त्यांनी खालील काही मुद्दे सुचवले होते.
काम तपासण्यासाठी सब इंजिनिअरकडे ५ कोटीपेक्षा जास्त खर्चाची कामं देऊ नये. सध्या २५ कोटीपर्यंतची कामं देण्यात येतात.
रस्त्याचं रेखाटन कसं करावं आणि दुरुस्ती कधी करावी, पेवर ब्लॉक वापरु नये, आदी गोष्टींसाठी समितीने एक पुस्तिका काढली होती. पण महापालिकेने या पुस्तिकेची दखल घेतली नाही.
रस्ताकामात सुधारणा होण्याकरता स्टॅक समिती पुनरुज्जिवीत करावी.
(लेखक ज्येष्ठ अभियंते असून त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जलविभागात काम केलेलं आहे.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
शंभर वर्षं पूर्ण झालेल्या गिरगावातल्या वाड्यांपैकी आणखी एक वाडी म्हणजे शेणवी वाडी. या वाडीला १२५ वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. त्याकाळात इथे शेणवी समाजातल्या लोकांची घरं होती आणि त्यावरून या वाडीला 'शेणवी वाडी' असं नाव पडलं, असं इथले रहिवासी सांगतात. या वाडीचा एक प्रवेश खाडिलकर रोडपासून सुरू होतो, तर वाडीच्या दुसऱ्या टोकाला एका बाजूला उरणकरवाडी तर दुसऱ्या बाजूला पिंपळवाडी दिसते.
शेणवी वाडीतल्या इमारती आणि चाळींची एकूण संख्या १८ असून त्यात साधारणतः १७० ते १८० कुटुंबं राहतात. या अठरा चाळी आणि इमारतींमधल्या घरांचे क्षेत्रफळ मात्र वेगवेगळे आहे. अगदी १००-२०० चौरस फुटांपासून ६०० चौरस फुटांपर्यंत क्षेत्रफळाच्या जागा इथे आहेत. काही चाळी खूप जुन्या आहेत, तर काही इमारतींचा पुनर्विकास झाला आहे. काही इमारती चार मजली आहेत. याच शेणवी वाडीत सुप्रसिद्ध अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा बंगला होता आणि दुर्गाबाईंचं बालपण त्या बंगल्यात गेलं होतं. पुढे तो बंगला पाडून तिथे इमारत बांधण्यात आली.
शेणवी वाडीपर्यंत पोहोचताना जो खाडिलकर रोड लागतो आणि ज्यांच्यामुळे त्या रस्त्याला खाडिलकर रोड हे नाव देण्यात आलं, ते सुप्रसिद्ध नाटककार कृ.प्र. खाडिलकर याच वाडीचे रहिवासी होते. नवाकाळ प्रेसची स्थापना त्यांनीच केली होती. पुढे अर्थातच तो वारसा सुप्रसिद्ध पत्रकार नीलकंठ खाडिलकर यांनी जपला. खाडिलकर कुटुंबातल्या जयश्री आणि रोहिणी या कन्यांनी बुद्धिबळाच्या क्षेत्रात ठसा उमटवला. आजही खाडिलकर कुटुंबाचं वास्तव्य इथेच आहे. त्याकाळात गिरगावात लग्न, मुंज यासाठी उपलब्ध असणाऱ्या सभागृहांची संख्या खूप कमी होती. तेव्हा इथे कोकणस्थ वैश्य समाज महाजन वाडी या नावाचं सभागृह बांधण्यात आलं. या वास्तूलासुद्धा १०० वर्षांचा इतिहास आहे. सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी बालपणी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती सुरुवात या सभागृहातल्या रंगमंचावर गणेशोत्सवादरम्यान झाली असं इथले रहिवासी सांगतात. आजही या सभागृहात विविध सोहळे आयोजित केले जातात. या सभागृहात गणेशोत्सवही साजरा होतो. याच वाडीत सारस्वत समाजाचा विष्णुबाग हॉलसुद्धा होता, मात्र हे सभागृह आता बंद झालं आहे. शेणवी वाडीचे सुद्धा एक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ असून त्याला ७५ वर्षं झाली आहेत. या मंडळातर्फे सामाजिक उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबिराचं आयोजन होतं, तसंच १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी महानगरपालिकेतल्या सफाई कामगारांचा सत्कार केला जातो. तसंच काही पोलिस अधिकाऱ्यांना सन्मानित केलं जातं. दक्षिण मुंबई स्तरावर चित्रकला आणि अन्नकोट स्पर्धा घेतली जाते.
ज्यावेळी मुंबई पुनर्रचना इमारत मंडळातर्फे काही इमारती बांधायचं ठरलं, तेव्हा या वाडीत जानकी निवास नावाची एक इमारत उभी राहिली. शेणवी वाडीत राहणारा समाज हा मध्यमवर्गीय मराठी समाज होता. जसजशी कुटुंबं विस्तारत गेली, तशी इथली जागा अपुरी पडू लागली. साहजिकच जागा विकून स्थलांतरित होणं हा एकमेव पर्याय मराठी माणसापुढे उरला आणि त्यामुळे इथली अनेक मराठी कुटुंबं स्थलांतरित झाली. आता इथे केवळ ३० टक्के मराठी कुटुंब आहेत, हे सांगताना रहिवाशांच्या मनातली खंत जाणवत होती. मात्र सामाजिक उपक्रमांमुळे इथले लोक एकत्र येतात, हे वैशिष्ट्य सांगावंसं वाटतं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
सुंदर पावसाळा आणि हिरवागार परिसर, गडद निळे आकाश आणि काळे काळे ढग... इतकं सुंदर वातावरण बघून अनेकांना स्वतःच्या घरात पाऊल टाकावंसं वाटत नाही. या उत्तम वातावरणात सहलीला जावंसं वाटतं म्हणून नाही तर घरातल्या कुबट, बुरसटलेल्या भिंती व भकास वातावरणामुळे त्यांना बाहेरची ओढ लागते.
वास्तूमध्ये असं नकारात्मक चित्र व बाहेर एवढं उत्साही आणि सकारात्मक वातावरण बघून बरेचदा उदासीनता येते. ती टाळण्यासाठी घरात काही बदल करणं आवश्यक आहे.
पावसाळ्यात वातावरणात थंडावा आणि गारवा असतो. शेवाळ, बुरशी, गांडूळ, छोटे किडे यांच्या वाढीसाठी आणि प्रजोत्पादनासाठी हे वातावरण अनुकूल असतं. घरात पावसाच्या सरींपासून त्यांना संरक्षण मिळतं व उबदार वातावरण त्यांची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे बुरशीचे प्रकार नेचे, शेवाळ घरात सांदीकोपऱ्यात वाढू लागतात. पाली, कोळी, झुरळं तर अशा वातावरणात झपाट्याने वाढतात. एकंदरच घराचा चेहरामोहरा बदलतो. भिंतींना ओलसरपणा, गळणारं छप्पर, सुकत घातलेल्या कपड्यांचा दमटपणा व बंद खिडक्या यात भर घालतात.
प्रत्येकालाच असं घर नको असतं. पण बदलासाठी काय करावं ते सुचत नाही. अशावेळी खालील बदल करून घर प्रसन्न व आनंदी बनवता येईल.
पावसाळ्यात घरात दमट वातावरण असणार व भिंतींना ओल येणार हे गृहित धरूनच भिंतींना रंग लावून त्यावर बुरशीविरोधी रसायन लावता येतं. रंग बदलायचा असेल तर हल्ली रंगातच ही बुरशीविरोधी रसायनं मिसळता येतात.
बुरशी किंवा शेवाळ भिंतींवर आलं तर तो भाग कोरड्या फडक्याने पुसावा. १०० वॅट किंवा हॅलोजन भिंतीजवळ ठेवून दिला तर त्यामुळे कोरडेपणा येतो. गरमपणा निर्माण झाल्याने भिंतीवरची बुरशी नष्ट होते. भिंतीतली ओल निघाल्याने बुरशी व भिंतीतील दमटपणा निघून जातो. दररोज एकेक दिवशी भिंतीखाली हे गरम दिवे ठेवल्यास सर्व घराच्या भिंती कोरड्या राहून नव्याने बुरशी येणं बंद होईल.
घरात कोरडेपणा राहण्यासाठी धूपन करणंही उपयोगाचं ठरतं.
कपडे सुकवण्यासाठी ते दोरीवर टाकण्याआधी वॉशिंग मशीनच्या ड्रायरमधून एकाऐवजी दोनदा कपडे कोरडे केले तर त्यातलं बरंचसं पाणी निघून जातं. त्याला जोड म्हणून कपडे झटकून, त्यावर इस्त्री फिरवून वाळत टाकले तर घरातल्या ओलसरपणाचं अजून एक कारण कमी होतं.
घराच्या खिडक्यांना एक्झॉस्ट फॅन असेल तर उत्तमच, नसेल तर टेबल फॅन सुरू करून खिडकीच्या बाहेर त्याचा झोत जाऊ दिला तर त्यानेही घरातला ओलसरपणा कमी होतो.
कडुलिंब, निवडुंग, तुळस, वाळा, आलं अशा वनस्पती घरात प्रसन्नता आणतात. कडुलिंब, निवडुंग खिडकीमध्ये लावून त्याच्या पानांचा वापर धूपामध्ये करता येतो किंवा ते नुसतं घरात टांगून ठेवल्यानेही वातावरणात नैसर्गिक सुगंध येतो व त्यामुळे निर्जंतुकीकरणही होते.
बुरशी, कोळीष्टकं झाडूने किंवा बांबूला लावलेल्या कापडाने सतत आठवड्यातून एक-दोन वेळा काढून टाकावी लागतात.
दुर्लक्ष व आळस न करता घर कोरडं राखल्यास आणि उबदार करत राहिल्यास प्रसन्नता व आरोग्य आणि पावसाचं रोमांचक क्षण घरातच अनुभवता येतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
केंद्रीय पर्यावरण विभागाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला ग्रीन सिग्नल दिल्याने आता विमानतळाची निविदा प्रक्रिया पार पाडणं सिडकोला सोपं जाईल.
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंगळवारी हिरवा कंदील दाखवल्याने विमानतळाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. यासंदर्भात सोमवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय पर्यावरण विभागाच्या बैठकीत सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा यांनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाबाबत सादरीकरण केलं होतं. या बैठकीत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली असून मंजुरीचं पत्र येत्या १५ दिवसांत सिडकोला मिळणार आहे. या मंजुरीमुळे विमानतळ उभारणीस आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या सिडकोला प्राप्त झाल्या आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याला तीन वर्षांपूर्वी मंजुरी देताना केंद्रीय पर्यावरण विभागाने खारफुटी उद्यानाची उभारणी, गाढी नदीचा प्रावाह बदलणं, उच्च दाबाच्या वाहिन्या भूमिगत करणं आदींसह जवळपास ३० अटींची पूर्तता करण्यास सिडकोला सांगितलं होतं. त्यानंतरच सिडकोला विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाची मंजुरी मिळणार होती. केंद्रीय पर्यावरण विभागाने सांगितलेल्या अटींची पूर्तता करत विमानतळ प्रकल्पाला केंद्राकडून हिरवा कंदील प्राप्त करून घेण्यास सिडकोला यश आलं आहे.
नवी मुंबईत देशातला पहिला ग्रीनफिल्ड विमानतळ उभं राहणार आहे. यासाठी पनवेल तालुक्यातल्या २२६८ हेक्टर जमीन वापरली जाणार आहे. यात ३५० हेक्टर जमीनीवर खारफुटीचं जंगल आहे. ते अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची अट केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घातली आहे. तसंच गाढी नदीचा प्रवाह बदलताना तो कशा प्रकारे बदलण्यात यावा, याबाबतही मार्गदर्शक तत्वं सिडकोला घालून दिलेली आहेत. याशिवाय पक्षी अभयारण्य, अन्य जैव विविधता यांची जपणूक करण्याचा सल्ला पर्यावरण मंत्रालयाने सिडकोला दिला आहे.
वरील अटींची पूर्तता न झाल्याने विमानतळास तब्बल पाच वर्षं परवानगी मिळत नव्हती. सिडकोने या सर्व अटींची पूर्तता करण्याचं आश्वासन दिल्यानंतर नोव्हेंबर २०१२ रोजी विमानतळाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. त्याचवेळी ही तातुपरती मंजुरी असल्याचं स्पष्ट करून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ३० अटी घातल्या होत्या. या अटींची सिडको कशा प्रकारे पूर्तता करणार आहे, याबाबतचं सादरीकरण करण्यात आल्यानंतरच दुसऱ्या टप्प्याला मंजुरी प्राप्त झाली आहे.
प्री-डेव्हलपमेण्ट वर्क
केंद्रीय पर्यावरण विभागाचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाल्याने सिडकोला आता विमानतळाची निविदा प्रक्रिया पार पाडणं सोयीस्कर होणार आहे. सिडकोच्या दृष्टीने हा मैलाचा दगड असून लवकरच अंतिम निविदाधारकाची निवड करून डिसेंबर २०१६ अखेरीस विमानतळाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. तोपर्यंत सिडकोने प्री-डेव्हलपमेण्ट वर्क अंतर्गत जमीन सपाटीकरण, टेकडीची कटाई आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची कामं सिडको पूर्ण करणार असल्याचं सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा यांनी सांगितलं आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
दरवर्षी भारताच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. ही वाढ काही छोट्या देशांच्या एकूण लोकसंख्येएवढी असते. लोकांची अशी संख्या वाढत असताना त्या सर्वांना निवासस्थानं उपलब्ध होतात का?
देशातल्या नागरिकीकरणाचा वेग खूप आहे. आजघडीला ३१ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शहरांमध्ये राहते. या लोकसंख्येचा सकल देशी उत्पादन म्हणजे जीडीपीत ६० टक्क्यांचा वाटा आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढच्या १५ वर्षांत शहरी लोकसंख्येचा जीडीपीतला हिस्सा ७५ टक्क्यांपर्यंत वाढेल. शहरं देशाच्या आर्थिक विकास साधतील आणि रिअल्टी क्षेत्र हे त्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. त्यात केंद्र सरकारच्या दोन योजना महत्त्वाच्या ठरतील. 'स्मार्ट सिटी' आणि 'हाऊसिंग फॉर ऑल बाय २०२२'. या दोन योजना आणि रिअल्टी क्षेत्राचं इंजिन ठरू शकतात.
नरेंद्र मोदी सरकराने निश्चित केलेलं उद्दिष्ट्य पूर्ण झालं तर २०२२ मध्ये एकीकडे भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी होत असताना दुसरीकडे सर्व कुटुंबांकडे त्यांचं स्वतःचं, हक्काचं घर असेल. शहरी आणि ग्रामीण भारतासाठी राबवण्यात येत असलेल्या या योजना मोदी सरकार स्थापन होण्यापूर्वीच तयार झालेल्या आहेत.
या योजनांतर्गत शहरांमध्ये २० कोटी तर ग्रामीण भागात ४.५ कोटी घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यात सरकारी, खासगी, सामायिक आणि वैयक्तिक अशा सर्वच क्षेत्रांचा सहभाग असेल.
१९९८ मध्ये देशातलं पहिलं गृहनिर्माण धोरण बनवणाऱ्या समितीचे सदस्य आणि तत्कालिन हाऊसिंग अॅण्ड अर्बन डेव्हलपमेण्ट कॉर्पोरेशन लि.चे सीएमडी व्ही.सुरेश यांच्या मते, 'हाऊसिंग फॉर ऑल मिशन' पूर्ण करणं शक्य आहे. पण त्यासाठी केंद्र सरकारने गृहनिर्माण धोरण आणि त्याची रूपरेखा योग्य असली पाहिजे. परवानग्या, मंजुऱ्या आणि ना हरकत प्रमाणपत्रं देणाऱ्या अनेक प्राधिकरणांचे अडथळे दूर केले पाहिजेत. गृहनिर्माणात काम करणाऱ्या सर्वच घटकांना आर्थिक प्रोत्साहन दिलं पाहिजे. तसंच जमिनी, बांधकाम साहित्य व तंत्रज्ञान परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिलं पाहिजे. सुलभ अर्थपुरवठा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. भौतिक, सामाजिक आणि व्यावसायिक पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. थोडक्यात गृहनिर्माणाच्या संपूर्ण प्रक्रियेलाच संपूर्ण पाठिंबा दिला पाहिजे. केंद्र सरकारने आणखी एक अत्यावश्यक गोष्ट जाणीवपूर्वक करायला हवी आणि ती म्हणजे राज्य सरकारांना या योजनांमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. त्यासाठी आवश्यक धोरणं, प्रकल्पं आणि कृती आराखडे आखायला हवीत. सर्वांना घरं देण्याचं मिशन पूर्ण करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे काय होईल तर संसाधनांचा जास्तीत जास्त वापर होऊ शकेल, ठरवलेल्या योजना निश्चित मुदतीत पूर्ण होतील आणि त्यात सर्वजण आपापली भागीदारी उचलतील. ग्राहक, बिल्डर, नागरी विकास यंत्रणा, केंद्र व राज्याच्या पातळीवरचे धोरणकर्ते, पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या संस्था हे सर्व घटक एका उद्दिष्ट्यासाठी काम करतील.
गृहनिर्माण हा तसा राज्य सरकारशी अधिक निगडित असलेला विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारांना गृहनिर्माणाचा ठोस कृती आराखडा लागेल. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच राज्य सरकारांना विश्वासात घेऊन काम करायला हवं.
अर्थव्यवस्था पुनर्निर्माणात गृहनिर्माणाची भूमिका का महत्त्वाची आहे?
देशपातळीवर गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात कितीही काम केलं तरी जीडीपी ७ ते १२ टक्क्यांच्या पुढे जाणार नाही. पण त्यामुळे निर्माण आणि उत्पादनातल्या २५० उद्योगांना (लघु, मध्यम, मोठ्या) फायदा होईल. या क्षेत्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. सुमारे ६५ उद्योग क्षेत्रांमध्ये २.५ कोटी स्त्री-पुरुषांना रोजगार मिळतील.
पुढच्या आठ वर्षांमध्ये हे साध्य होईल तेव्हा भारताची लोकसंख्या १४२ कोटींपर्यंत गेलेली असेल. दरवर्षी २ कोटींनी लोकसंख्या वाढत आहे. त्यात ५० टक्के वाटा हा शहरांचा आहे.
गृहनिर्माणात 'नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया २००५' हा कायदा खूप महत्त्वाचा आहे. त्यात मागास, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्वच उत्पन्न गटातल्या लोकांसाठी घरांची निर्मित करण्यास सांगण्यात आलं आहे. पण बांधकाम उपविधी, विकास नियंत्रण नियमावली आणि नियोजनाचे मापदंड हे केवळ मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातल्या लोकांच्या गृहनिर्मितीचाच प्रामुख्याने विचार करताना दिसतात.
सर्वांना घरं देण्याचं स्वप्न साकार करायचं असेल तर केंद्र आणि राज्यांनी नवी गृहधोरणं स्वकारायला हवीत आणि ती एकमेकांशी सुसंगत असायला हवीत.
संसाधनांची गुंतवणूक : गृहनिर्माण क्षेत्रात जमीन हा एक महत्त्वाचा स्रोत आहे. शहरांमध्ये तर जमिनीचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करण्याची आवश्यकता असते. वाढत्या लोकसंख्येला पुरेशी घरं बांधायची असतील तर शहरांमध्ये विकासासाठी जमिनी उपलब्ध झाल्या पाहिजेत. आज त्याचं प्रमाण सुमारे ४ टक्के आहे, ते ७ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढायला पाहिजे. तसंच या जमिनींचा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जास्तीत जास्त वापर करायला हवा. केंद्राची १०० स्मार्ट सिटीज उभारण्याची योजना आहे. औद्योगिक व आर्थिक क्षेत्रांचाही विकास करण्याचं निश्चित केलं आहे. परिणामी भविष्यात सॅटेलाइट सिटींचं महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे १.५ ते २ एवढा कमी असणाऱ्या 'फ्लोअर एरिया रेशिओ'मध्येही वाढ होण्याची आवश्यकता आहे. आशिया खंडातल्या अनेक शहरांमध्ये तो ८ ते १० टक्के आहे.
शीघ्र मंजुऱ्या : गृहनिर्माणासाठी बांधकाम नियामावली लागू केली पाहिजे आणि ती नॅशनल बिल्डिंग कोडशी सुसंगत असायला हवी.
बांधकाम खर्च : परवडणारी घरं बांधायची असतील तर इमारतीच्या बांधकामाचा खर्च कमी करायला हवा. आज तो महागाईपेक्षा ५० टक्क्यांनी अधिक आहे.
अर्थपुरवठा : परवडणारी घरं बांधण्यासाठी आवश्यक असणारा अर्थपुरवठा सुलभ होईल, याची काळजी घेतली पाहिजे.
प्राथमिक पायाभूत सुविधा: पाणीपुरवठा, शंभर टक्के सांडपाणी आणि प्रक्रिया व्यवस्था, पिण्याचं पाणी, वीजपुरवठा आणि रस्त्यांचं जाळं आदींचा विकास करायला हवा. तसंच आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि मनोरंजन आदी सामाजिक पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
तंत्रज्ञान : इमारत साहित्य आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं पाहिजे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
प्रश्नः दक्षिण मुंबईतील एका अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सात इमारतींत आम्ही २९६ भाडेकरू राहत आलो. या सात इमारती दोन मजली (तळ मजला, अधिक दोन मजले) असून अंदाजे ६,९०० चौरस मीटरच्या भूखंडावर उभ्या आहेत. खोल्यांचे चटईक्षेत्र २०० ते ३०० चौरस फूट असे वेगवेगळे आहे. आम्ही सर्व भाडेकरूंनी १९९४ साली 'म्हाडा' कायदा अधिनियम प्रकरण '८ अ'प्रमाणे १०० महिन्यांच्या भाड्यापैकी एक तृतीयांश रक्कम 'म्हाडा'कडे भरून, सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून, नियोजित गृहनिर्माण संस्था स्थापन केली व 'म्हाडा'ला भूसंपादनाची विनंती केली. 'म्हाडा'ने संबंधित मूळ मालकाला या संदर्भात नोटीस पाठविल्यानंतर मालकाचे वकील 'म्हाडा'च्या सुनावणीस आले खरे, पण ते वरचेवर थातुरमातुर कारणे पुढे करून मुदतवाढ मागत राहिले. 'म्हाडा'ने १९९४ मध्येच या सातही इमारतींचा ताबा घेतला. या भूसंपादनाविरोधात मूळ मालकाने मुंबई उच्च न्यायालयात १९९६ साली 'रिट पिटिशन' दाखल केले, पण उच्च न्यायालयाने ते त्याच वर्षात फेटाळून लावले. या निर्णयाविरुद्ध मालकाने सर्वोच्च न्यायालयात १९९६ मध्येच विशेष अनुमती याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीनंतर सदर याचिका 'लॅण्ड ओनर्स असोसिएशन'च्या खटल्यासोबत व्यापक खंडपीठाकडे वर्ग केली व ती आता नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे प्रलंबित आहे. हा प्रयत्न फसल्यानंतर मालकाने काही असंतुष्ट भाडेकरूंच्या सह्या मिळवून भूसंपादन रद्द करण्याची विनंती करणारी विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केली. या अर्जाला राज्य शासनाने व 'म्हाडा'ने प्रतिज्ञापत्रे सादर करून विरोध केला. 'म्हाडा'ने तर प्रतिज्ञापत्रातच भाडेकरुंच्या सह्यांच्या सत्यतेबाबत शंका व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने हाही खटला नऊ न्यायाधीशांच्या प्रस्तावित खंडपीठाकडे वर्ग केला. या याचिकेच्या सुनावणीदरम्यानच आमच्या नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य प्रवर्तकांनी भूसंपादन रद्द करण्याच्या विरोधात प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले. या कारणास्तव असंतुष्ट भाडेकरूंनी २००८ मध्ये मुख्य प्रवर्तकांनाच पदावरून हटविण्याबाबत ठराव करून 'म्हाडा'कडे पाठविला व 'नवनिर्वाचित मुख्य प्रवर्तका'चे नावही कळविले. परंतु माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीवरून 'म्हाडा'ने कळविले आहे की अभिलेखाअनुसार मूळ मुख्य प्रवर्तकच अजूनही मुख्य प्रवर्तक आहेत. गेल्या १५ वर्षांत जवळपास ८५ मूळ भाडेकरूंनी आपल्या खोल्या विकल्या व तेथे नवीन भाडेकरू राहतात. 'म्हाडा' कायद्याप्रमाणे एकदा 'म्हाडा'ने भूसंपादन केल्यानंतर कोणत्याही भाडेकरूला खोली विकण्याचा अधिकारच राहत नाही. या रहिवाशांना हाताशी धरून तथाकथित 'नव्या मुख्य प्रवर्तकां'नी पुन्हा भूसंपादन रद्द करण्याची विनंती करणारा अर्ज काही भाडेकरूंच्या सह्या घेऊन राज्य शासनाकडे पाठविला. या अर्जाला पाठिंबा म्हणून तत्कालीन स्थानिक आमदाराने 'कॉन्स्टिट्युट पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर' म्हणून सही करून तत्कालीन गृहनिर्माण राज्यमंत्र्यांना निवेदनरुपी पत्र पाठविले. एवढा दबाव आला म्हणून 'म्हाडा'ने मूळ भाडेकरूंची नावे व त्यांच्या सह्यांच्या सत्यतेबाबत पडताळणी न करताच सदर अर्ज शासनाकडे योग्य कारवाईसाठी पाठविला आहे. अलीकडेच शासनानेदेखील सदर जागा पुन्हा मूळ मालकाला देण्यासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्याकडे कागदपत्रे पाठवली. दरम्यानच्या काळात दक्षिण मुंबईतीलच आणखी एका अशाच इमारतीच्या सर्व भाडेकरूंनी एकमताने भूसंपादनाची कारवाई रद्द करावी असा प्रस्ताव पाठवला, पण सर्वोच्च न्यायालयाने तो प्रस्ताव नामंजूर करताना कायद्यामध्ये असे करण्याची तरतूदच नाही आणि किती लोकांनी भूसंपादन रद्द करण्यासाठी अर्ज केला हा मुद्दाच असू शकत नाही, कारण एकदा भूसंपादन सार्वजनिक कामासाठी केले की ते मग खासगी फायद्यासाठी देण्याकरिता कायद्यात तरतूदच अस्तित्वात नाही असे आदेश दिले. असे असतानादेखील भूसंपादन अधिकाऱ्यानी बिल्डरला जागा द्यावी असे आदेश दिले. या आदेशाविरुद्ध आमच्यातील काही भाडेकरूंनी उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे व ती प्रलंबित आहे. या परिस्थितीतून मार्ग काढून आम्ही पुनर्विकासाकरिता कसे प्रयत्न करावेत? — चिंतित भाडेकरू, मुंबई.
उत्तरः आपण उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याकारणाने सदर बाब ही न्यायप्रविष्ट आहे. सरकारला जर एखादा संपादित केलेला भूखंड खासगी व्यक्तीला द्यायचा असेल तर त्यांना कायद्यात बदल करणे क्रमप्राप्त आहे. त्याशिवाय असे निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत. पण, राजकीय पुढाऱ्यांचे साटेलोटे हे कायद्याच्याही पलीकडचे आहेत असे काही लोकांना वाटते. मात्र उच्च न्यायालय अशा प्रवृत्तींना भीक घालील असे वाटत नाही. आपण उच्च न्यायालयात असलेल्या याचिकेला पाठिंबा दिलात तर न्यायप्रक्रियेला बळ मिळेल व यातूनच पुनर्विकासाचा मार्ग सापडू शकेल.
( या सदरातील उत्तरे ही प्रश्नकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिलेली असतात. संबंधितांनी कोणतीही कृति करण्यापूर्वी आपल्या वकिलाचा सल्ला घ्यावा.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
उत्तरः आपण पाच विकासकांना निवडण्यासंबंधीचा इतिहास नीट मांडलात, पण त्या पाचपैकी एक विकासक निवडला की कसे, याविषयी माहिती दिलेली नाही. असा विकासक निवडून त्याच्याशी करार झाला का? याविषयीही माहिती नाही. तुम्ही जर एक विकासक निवडला नसेल किंवा कोणत्याही विकासकाशी करार केला नसेल तर नवीन निविदा मागवणे हाच योग्य मार्ग राहील. नवीन निविदा मागवताना आधी ठरवलेले क्षेत्रफळ देणे बंधनकारक राहील अशी अट त्या निविदेमध्ये टाकावी, जेणेकरून किमान ४० टक्के अधिक क्षेत्रफळ मिळण्याची खात्री होईल व त्यापेक्षा कमी देणाऱ्यांच्या निविदा येणारच नाहीत. हा झाला विकासक नेमलेला नसेल तेव्हाचा मार्ग. आता आपण विकासक नेमलाच असेल व त्याच्याशी करारही केला असेल, मात्र आपल्या पत्रात त्याविषयी उल्लेख केलेला नसेल तर आम्ही आपणास काय उत्तर द्यावे? एका बाजूला पाच विकासकांपर्यंतची आपली वाटचाल कायद्याला धरून असल्याचे वाटते. नंतरच्या भागात मात्र ४० टक्के अधिक चटईक्षेत्र कोणी देऊ केले आणि ते २० टक्क्यांपर्यत खाली कोणी आणले याविषयी आपल्या पत्रात स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे करार झाला असेल तर तो कसा झाला, त्यातील तरतुदी काय, या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करूनच पुढील निर्णय घेणे आवश्यक आहे. एरवी, बँकांकडून कर्ज घेऊन पुनर्विकासाची सुरूवात केल्यास ५० टक्क्यांपर्यंतही अधिक जागा मिळू शकेल. मात्र हा मार्ग घ्यावा किंवा कसे हा निर्णय सर्वसाधारण सभेत घ्यावा लागेल. बिल्डरधार्जिणा पुनर्विकास आणि स्वयं पुनर्विकास यातील फायदेतोटे नीट समजूनच निर्णय घेतला तर तो सर्व सभासदांच्या हिताचा राहील.
( या सदरातील उत्तरे ही प्रश्नकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिलेली असतात. संबंधितांनी कोणतीही कृति करण्यापूर्वी आपल्या वकिलाचा सल्ला घ्यावा.)
पुनर्विकासः प्रश्नकर्त्यांना सूचना 'पुनर्विकास' सदराकरिता प्रश्न पाठविताना पुढील तपशील देणे अत्यावयक आहेः भूखंडाचे क्षेत्रफळ, रस्त्याला लागून आहे किंवा कसे, रस्ता किती रुंद आहे, रहिवासी किती, प्रत्येकाच्या सदनिकेचे चटईक्षेत्र किती, दुकाने वा गाळे किती, अधिकृत किंवा अनधिकृत याबाबत स्पष्टता, मुंबई बेट किंवा उपनगर, जमिनीची मूळ मालकी कोणाची, भाडेपट्टा कोणाच्या नावे, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहे किंवा कसे, हे स्पष्ट असावे. तरच अचूक मार्गदर्शन मिळू शकेल. अन्य अनावश्यक तपशील मात्र कटाक्षाने वगळावा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
उत्तरः सर्वात उत्तम पाऊल तुम्ही उचलू शकता ते हे की सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आलेल्या ठरावांना सक्षम अधिकारकक्षेतील न्यायालयात आव्हान देणे. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह 'सोसायटी'ज अॅक्ट, १९६० मधील कलम २(१०- एआयआयआय) मध्ये नमूद करण्यात आलेले आहे की सहकार वर्ष (कोऑपरेटिव्ह इयर) प्रत्येक वर्षाच्या ३१ मार्च रोजी संपते. कायद्यातील नियमांमधील नियम ६१ हे सांगतो की प्रत्येक सहकार वर्षाच्या समाप्तीच्या ४५ दिवस आधी सर्व हिशेब तयार असले पाहिजेत. कायद्यातील कलम ७५ हे सांगते की हिशेब तयार झाल्यानंतर त्यावर सदस्यांकडून विचार होण्यासाठी तीन महिन्यांच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा झाली पाहिजे. अद्ययावत आदर्श उपविधिंमधील (मॉडेल बाय लॉज) 'बाय लॉ' ९५ (ए) म्हणतो की वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी झाली पाहिजे. तुमच्या प्रकरणात, 'सोसायटी'ची वार्षिक सर्वसाधारण सभा नोव्हेंबर २०१५ च्या अखेरीस झालेली आहे. उपनिबंधक, सहकारी संस्था यांना कोणत्याही 'सोसायटी'ला हिशेबांना मंजुरी देण्याकरिता तीन महिन्यांची अतिरिक्त मुदत देण्याचे अधिकार आहेत. तुमच्या 'सोसायटी'ने अशी मुदतवाढ मिळविली आहे की नाही हे तुम्हाला शोधून काढावे लागेल. अशी मुदतवाढ मिळविलेली नसेल तर कायद्याच्या कलम ७५ (५) मध्ये त्याचे परिणाम विशद केलेले आहेत. जर सर्वसाधारण सभाच बेकायदेशीर असेल तर तीत संमत करण्यात आलेले सर्व ठरावही बेकायदेशीर ठरतील. तुम्ही सभेच्या वैधतेला आणि तीत संमत करण्यात आलेल्या ठरावांना सक्षम अधिकारकक्षेच्या न्यायालयात आव्हान देऊ शकता.
प्रश्नः झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने ('एसआरए') आम्हा झोपडपट्टीवासियांकरिता बांधलेल्या गृहसंकुलातील आमच्या पुनर्विकसित इमारतीत 'अ' व 'ब' या दोन सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सभासद राहतात. म्हणजेच एकाच इमारतीत 'अ' व 'ब' या दोन गृहनिर्माण संस्था कार्यरत आहेत. सध्या इमारतीची संपूर्ण देखभाल विकासकच करीत आहे. सदर इमारतीला 'विंग्ज' नाहीत व ती 'विंग्ज'मध्ये विभागली जाऊ शकत नाही. 'अ' संस्थेची नोंदणी रद्द करून ती 'ब'मध्ये विलीन करणे किंवा 'अ' व 'ब' या दोन्ही संस्थांची नोंदणी रद्द करून नवीन सहकारी गृहनिर्माण नोंदणीकृत करणे यापैकी कोणत्याही पर्यायाला 'अ' संस्था इच्छुक नाही. 'अ' संस्थेच्या सदस्यांच्या समस्या, त्यांच्या कायदेशीर दस्तऐवजांची (कागदपत्रे) पूर्तता व दस्तऐवजांचे व्यवस्थापन आपल्या पातळीवर हाताळण्याची 'अ'ची इच्छा आहे. प्रश्न असाः 'अ' संस्थेचे अस्तित्व कायम ठेवून भविष्यात आमच्या इमारतीचा सामायिक कारभार/व्यवहार कसा चालविला जाऊ शकेल? — एक 'मटा' वाचक, मुंबई.
उत्तरः दोन संस्थांचे विलिनीकरण करून संपूर्ण इमारतीची एकच संस्था करणे हा चांगला विचार आहे. पण, असे एकत्रीकरण जर शक्य नसेल तर एकाच इमारतीत दोन संस्था कार्यरत राहू शकतात. प्रत्येक 'सोसायटी'च्या सदस्यांनी हे पहावे की त्यांची 'सोसायटी' आणि तिची व्यवस्थापकीय समिती कायद्याप्रमाणे आपले कर्तव्य पार पाडीत आहे.
( या सदरातील उत्तरे ही प्रश्नकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिलेली असतात. संबंधितांनी कोणतीही कृति करण्यापूर्वी आपल्या वकिलाचा सल्ला घ्यावा.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या बऱ्याचशा वास्तू औरंगाबादमध्ये असल्या तरी या शहराची सामान्य जनमनाला असलेली ओळख 'बीबी का मकबरा'भोवतीच गेली अनेक वर्षं एका विलक्षण ओढीने फिरत्येय.
एरव्ही वैराण भासणाऱ्या मराठवाड्याचा विस्तीर्ण मुलूख त्याकाळी एक वेगळाच कैफ आणि वैभव बाळगून होता. प्राचीन काळी सातवाहनांची राजधानी याच प्रदेशातली. १३२७मध्ये मोहम्मद तुघलकाने दिल्लीहून भारताची राजधानी दौलताबादला हलवली, एवढी या मुलुखाची मातब्बरी. याच परिसरातलं एक कर्तृत्वान शहर म्हणजे औरंगाबाद. आज औरंगाबादची ओळख म्हणजे महाराष्ट्रातलं एक मोठं शहर या पलीकडे नाही. पण १६व्या शतकात या शहराभोवती एक प्रचंड झगमगतं वलय होतं. मोगलांची दख्खनच्या पठारावरची ही राजधानी. त्यावेळी या शहरात दख्खनच्याच नव्हे देशातल्या अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडी दीर्घकाळ होत राहिल्या.
तसं औरंगाबाद १६१० मध्ये मुर्तुझा निझाम शाहचा पंतप्रधान मलिक अंबरने वसवल्याचं इतिहास सांगतो. त्यावेळी औरंगाबाद 'खिरकी' या नावाने ओळखलं जायचं. खाम नदीच्या तीरावर वसलेल्या या शहरावर मलिक अंबरच्या मुलाचा फतेहखानाचा अंमल होता. त्याने याचे नाव बदलून 'फतेहपूर' असं केलं.
त्याने हे शहर उत्तम नियोजनाने वसवायचा प्रयत्न केला. शहरात सगळ्या वेशींवर भव्य दरवाजे बांधले. शहरात खेळत्या पाणीपुरवठ्यासाठी १४ भुयारी कालवे बांधले.
१६५३मध्ये शाहजादा औरंगजेब दख्खनचा सुभेदार म्हणून इथे आला. त्याने इथेच आपली राजधानी केली आणि 'औरंगाबाद' हे नाव केलं. खरं म्हणजे औरंगजेबाने आपलं बस्तान औरंगाबादला बसवलं आणि दख्खन पठारावर एक नव्या मोगलाई पर्वाला सुरुवात झाली. बनारसच्या काशीविश्वेश्वराचं पवित्र मंदिर त्यानं उध्वस्त केल्यामुळे हिंदू मनाला प्रचंड हादरा बसला. मराठे मनातून औरंगजेबाविरुद्ध पेटून उठले. तेव्हापासून या भूमीत मराठे आणि मोगल यांच्यात अत्यंत कडव्या लढायांचे बुलंद सूर दीर्घकाळ उमटत राहिले.
आता औरंगाबाद आपल्याला मुख्यतः माहीत आहे ते 'बीबी का मकबरा' या वास्तूमुळे. याला 'दख्खनचा ताजमहाल' असंदेखील म्हटलं जातं. उर्दूमध्ये 'बीवी' म्हणजे पत्नी आणि 'बीबी' म्हणजे वंदनीय स्त्री. या भव्य स्मारकाची खासियत म्हणजे हे मुलाने आपल्या आईच्या सन्मानासाठी बांधलं. औरंगजेबाची पत्नी दिलरास बानू बेगम उर्फ राबिया-उल-दुराणी हिच्या सन्मानार्थ तिचा मुलगा आझम शहा याने हा मकबरा १६५१ मध्ये बांधायला घेतला.
ही वास्तू बांधायला पाच वर्षं लागली. अता उल्ला आणि हंसपत राय या वास्तूशिल्प शास्त्रज्ञांनी ही वास्तू साकारली. मकबऱ्याचं मुख्य शिखर संगमरवरी असून त्याच्याभोवती चार उंच मिनार आहेत. ४५८ मीटर X २७५ मीटर एवढ्या प्रचंड आकार असलेल्या उंच चौकोनी चौथऱ्यावच्या मधोमध ही वास्तू उभारण्यात आली.
वास्तूचा मुख्य दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. दरवाजाबाहेर उच्च दर्जाच्या पितळेत केलेलं सुंदर नक्षीकाम आहे. वास्तूच्या बाहेरच्या प्रशस्त प्रांगणात मुघल पद्धतीचा सुंदर बगीचा आणि त्यात विविध प्रकारची कारंजी होती. गुलाम मुस्तफा यांच्या तारीखनाम्यानुसार हा मकबरा उभारायला ६६८२०३ रुपये आणि सात आणे खर्च आला. यासाठी वापरण्यात आलेले संगमरवरी दगड जयपूरहून आणण्यात आले.
असं म्हणतात आझम शहाने आपल्या आजीची, मुमताज महलची, कबर असलेल्या ताजमहालपासून स्फूर्ती घेत हा मकबरा उभारायचा निर्णय घेतला. यातलं अजून एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ताजमहालचं मुख्य डिझाइन आणि मास्टर माइण्ड असलेल्या उस्ताद अहमद लाहौरी यांच्या अता उल्ला या मुलाने ताजमहालची प्रतिकृती असलेल्या या मकबऱ्याचं डिझाइन केलं. अजून एक गोष्ट म्हणजे औरंगजेबाला वास्तूशास्त्रात अजिबात रस नव्हता. त्याला हा अनाठायी खर्च वाटत असल्याने या मकबऱ्याला त्याचा तीव्र विरोध होता. मात्र मुलगा तेवढाच जिद्दी असल्याने शेवटी त्याने काही पैसे मंजूर केले. त्यात त्याने पडद्यामागून ही वास्तू उभारली जाऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले. याला लागणाऱ्या सामानाच्या बैलगाड्या कित्येक वेळेला अडवल्या. खूप अडचणी त्याने निर्माण केल्या. मात्र हव्या तेवढ्या प्रमाणात संगमरवर आणता येत नाही म्हणा किंवा तेवढे पैसे नाहीत म्हणून या पठ्ठ्याने मुख्य ठिकाणी संगमरवर वापरला व उरलेल्या ठिकाणी साधंच साहित्य वापरून बांधकाम केलं. मात्र त्याने कारागिरांना बहुतेक खूप प्रोत्साहन दिलं असावं कारण जिथे संगमरवर नाही तिथे या कारागिरांनी इतकं कसबी प्लास्टर आणि पॉलिश केलं की त्याला संगमरवराचा भास आला.
मकबऱ्यातल्या कबरीभोवती संगमरवरावर अष्टकोनी आकारात अतिशय नाजूक नक्षी कोरलेली आहे. वरच्या मजल्यांवरून तिचं दर्शन घेता येतं.
औरंगाबादेत अजूनही बरीच आकर्षणाची ठिकाणं आहेत. यापैकी एक म्हणजे बाबा शाह मुसाफिर या दर्ग्यात १७व्या शतकात बांधलेली ही अपूर्व पाणचक्की आहे. यासाठी आठ किमीवरच्या पहाडातून जमिनीखालच्या कालव्याच्या माध्यमातून त्यावेळी पाणी आणण्याची व्यवस्था होती.
नौखंड पॅलेस हा मलिक अंबरनेच बांधलेला महाल सुंदर आहे. यामध्ये दिवाण-इ-आम, दिवाण-इ-खास, पाच जनानखाने, एक मोठी मशीद अशा इमारती आहेत. प्रत्येक इमारती समोर सुंदर बगीचा आणि त्यात तेवढीच सुंदर कारंजी बांधलेली होती. मलिक अंबरनेच बांधलेल्या काली मशीद आणि जामा मशीद नक्कीच औरंगाबादमधल्या बघण्यासारख्या काही खास वास्तू आहेत. याचबरोबर औरंगाबाद असं बहुतेक एकमेव शहर असावं ज्याला ५२ दरवाजे/गेटस आहेत. त्यामुळे काही ठिकाणी त्याचा उल्लेख 'सिटी ऑफ गेट्स' असाही केला गेला आहे. यातल्या प्रत्येक गेटला छोटासा का होईना पण स्वतंत्र इतिहास आहे. या सगळ्या वास्तू वास्तूशास्त्राच्या म्हणा किंवा ऐतिहासिक संदर्भाच्या दृष्टीने म्हणा सुंदर आणि स्वतंत्र अस्तित्व ठेऊन असल्या तरी औरंगाबादची सामान्य जनमनाला असलेली ओळख 'बीबी का मकबरा'भोवतीच गेली अनेक वर्षं एका विलक्षण ओढीने फिरत्येय.
असं म्हणतात की त्यावेळी ज्ञात असलेल्या पृथ्वीच्या एकपंचमांश भागाचे मोगल सम्राट होते. त्यांची ही महाप्रचंड युद्धयंत्रणा संपूर्ण दख्खनवर दीर्घकाळ अखंडपणे घाला घालत होती. एवढं असूनही हे प्रबळ मोगल दख्खनचे स्वामी कधीही झाले नाहीत. मराठ्यांनी न भूतो न भविष्यती टक्कर दिलेला औरंगजेब हा बाबराने स्थापन केलेल्या बलाढ्य राजघराण्याचा सहावा आणि दैवयोगाने शेवटचा बडा मोगल होता. त्यातही विशेष म्हणजे भोवताली अफाट ऐश्वर्य असूनही हा महाविद्वान शहेनशहा आयुष्यभर एखाद्या फकिरासारखा राहिला. मराठ्यांची दख्खनमधली नवी उभारी पूर्णतः उध्वस्त करण्याचा अखंड ध्यास घेतलेल्या या माणसाने शेवटी मराठवाड्याच्या भूमीतच शेवटचा श्वास घेतला. त्यातही दैवगती इतकी भयानक विचित्र की आज औरंगाबादला आलेले पर्यटक त्याच्या मुलाने बांधलेल्या स्मारकाच्या भेटीला आवर्जून जातात. नुसतेच जात नाहीत तर विलक्षण ओढीने जातात. इतकंच कशाला शहरातली इतर ठिकाणं आणि १६-१७ कि.मी. वरचा देवगिरीचा किल्ला आणि वेरूळची लेणी बघायला जातात. पण तिथूनच तीन-चार किमी वरच्या खुल्ताबादला असलेल्या त्याच्या कबरीचे दर्शन घ्यायला मात्र बहुतेकजण जात नाहीत. हे पर्यटक हे काही मुद्दाम करत नाहीत. पण अनावधानाने का होईना देशातल्या एक उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या अस्तित्वाची अशी बेदखल कधी झाली नसेल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
गायक श्रीकांत नारायण यांचं प्रशस्त घराचं स्वप्न त्यांच्या सध्याच्या घराने पूर्ण केलं. ऐसपैस जागा आणि प्रत्येकाला स्वतःची 'स्पेस' देणारं हे घर आपल्या कुटुंबाला सर्वार्थाने लाभलं असे ते सांगतात. मोकळी हवा, भरपूर उजेड आणि आयुष्य सुकर बनवणाऱ्या आधुनिक सोयीसुविधा यामुळे घराचे 'प्लस पॉइण्ट' वाढतच गेले. आपल्या या घराबद्दल श्रीकांत भरभरून बोलतात...
मोहम्मद रफीच्या गाण्यांचं गारूड जुन्याप्रमाणेच नव्या पिढीवरही आहे. आज रफी आपल्यात नसले तरी त्यांच्यासारखाच एक गोड आवाज त्यांच्या स्मृती ताज्या ठेऊन आहे. तो आवाज म्हणजे श्रीकांत नारायण. आपल्या गायनाच्या करिअरमधले एकेक टप्पे पार करत असताना श्रीकांत यांना जशी त्यांच्या अर्धांगिनीची साथ लाभली तशीच घराचीही भक्कम सोबत होती.
श्रीकांत नारायण यांचं घर चांदिवली इथल्या 'नाहर अमृत शक्ती'मधल्या 'लॅण्टाना' या टोलेजंग इमारतीमध्ये आहे. १३ व्या मजल्यावर असणाऱ्या या थ्रीबीएचके घरात ते पत्नी मैत्रेयी आणि मुलगी वैष्णवीसोबत राहतात. याआधी त्यांची तीन घरं झाली. मालाडच्या महिंद्रनगरमध्ये त्यांचं बालपण गेले. इथल्या वन बीएचकेच्या घरातून पुढे त्यांनी दत्तानी पार्कमधल्या स्वतःच्या मालकीच्या वन रूम किचन घरामध्ये प्रवेश केला. पुढे ते कांदिवली इथल्या एव्हरशाइन मिलेनिअम पॅरेडाइजमधल्या घरात राहायला आले. या घरात ते ८ वर्षं राहिले.
'आता या घरातून जाणार ते थेट रिटायरमेण्ट होममध्ये,' असं त्यांच्या पत्नी मैत्रेयी गमतीत सांगतात. पण या दोघांच्याही स्वप्नात होतं तसंच घर त्यांना आता मिळालं आहे. १६०० चौ. फूट इतकं क्षेत्रफळ असणाऱ्या या घराला तीन स्वतंत्र बाल्कनीज आहेत. बाल्कनीत उभं राहिलं की कॉम्प्लेक्सची भव्यता अनुभवता येते.
मैत्रेयी यांचं ऑफिस पवईमध्ये आहे. त्यांच्या ऑफिसमधल्या बहुतांश सहकाऱ्यांची घरं याच परिसरात आहेत. त्यांनी मैत्रेयी यांना या भागात घर घेण्याचे सुचवले. या कॉम्प्लेक्सची भव्यता, इथल्या सोयीसुविधा आणि मुख्य म्हणजे छोटा बगिचा आणि झोपाळ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी जागा असल्याने 'लॅण्टाना'मधलं हे घर त्यांना खूप आवडलं. शिवाय प्रशस्त घराचं त्यांचं स्वप्न पूर्ण
होणार होतं.
'माझी मात्र थोडी द्विधा मनस्थिती झाली होती. पवई, चांदिवली परिसरातल्या ट्रॅफिकच्या समस्येची जाणीव मला होती. शिवाय कांदिवलीच्या घरात आम्ही चांगलेच रूळलो होतो. खरंतर इथे राहायला येण्याबाबत मी फारसा आग्रही नव्हतो. पण जेव्हा हे घर पाहिलं तेव्हा मनातल्या सगळ्या शंका मिटल्या. उत्तम उजेड, खेळती हवा आणि घरातून दिसणारा व्ह्यू यामुळे मला हे घर खूप आवडले. इथून पूर्व किंवा पश्चिम उपनगरात जाण्याचे अनेक रस्ते असल्याने ट्रॅफिक असणारा भाग टाळता येतो. शिवाय या घरापासून डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल अशी दोन्ही एअरपोर्ट्स जवळ असल्याने सर्वच गोष्टी जुळून आल्या. वैष्णवीची शाळाही घराच्या अगदी बाजूलाच आहे. त्यामुळे तिला अभ्यासाबरोबरच खेळायलाही खूप वेळ मिळतो. अखेरीस जून २०१३ मध्ये सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर आम्ही या घरात राहायला आलो.' मुंबईतच जन्म आणि लहानाचे मोठे झाल्याने तामीळ ही मातृभाषा असणारे श्रीकांत नारायण उत्तम मराठीतून संवाद साधतात.
श्रीकांत यांच्या कुटुंबात आणखी दोन महत्त्वाचे सदस्य आहेत. ते म्हणजे 'सिट्झू' जातीचे 'चेरी' आणि 'चिओ' हे दोन श्वान. 'चेरी' आणि 'चिओ' हे आपले 'स्ट्रेसबस्टर्स' असल्याचं श्रीकांत सांगतात. संपूर्ण घरात त्यांचा मुक्त वावर असतो.
'पुढल्या सात-आठ महिन्यांत घराचा चेहरमोहरा बदलायचा आहे. राहायला आल्यापासून घरात फारसे बदल केलेले नाहीत. नुकतंच थोडं रंगकाम करून घेतलं आहे. नव्या सजावटीसाठी आम्ही 'एथनिक' थीम वापरणार आहोत. शिवाय एक स्वतंत्र म्युझिक रूम बनवायची आहे. मला आजूबाजूला माणसं लागतात. घरी पाहुणे आल्यावर मला खूप आनंद होतं. दर्जेदार साऊंड सिस्टिम, माइक सिस्टिम आणून मित्रमंडळींसमवेत गाण्याच्या मस्त मैफली रंगवायच्या आहेत.
या घरात राहायला आल्यापासून माझ्या करिअरचा आलेखही उंचावतच गेला. त्यामुळे हे घर आम्हाला सर्वार्थाने 'लाभलं'. खरंतर मानवी आकांक्षांना मर्यादा नसतात. अजून मोठं घर असतं तर, असाही विचार मनात येतो. पण मी या घरात आनंदी आहे. मुंबईपासून फार लांब नसलेल्या एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सेकण्ड होम घेण्याची इच्छासुद्धा आहे. काही क्रिएटिव्ह करावंसं वाटलं तर थेट शहरी गोंधळापासून दूर असलेल्या त्या घरी जायचं! कारण त्या घरीही माझी स्वतंत्र म्युझिक रूम असेल.'
वास्तूशास्त्रावर विश्वास असल्याने हे घर घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या गुरूकडून घराचे परीक्षणही करून घेतले होते. घराची दिशा उत्तर-पूर्व असल्याने गुरूंनीही त्यांच्या निर्णयाला दुजोराच दिला. हे घर घेण्याचा आपला निर्णय योग्य ठरला याचं समाधान खूप मोठं असल्याचं श्रीकांत आवर्जून सांगतात.
- रुई गावंड
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
गृहकर्ज असो की घर, त्यासाठी विमा घेताना तो दोन प्रकारे घेता येतो. ऑनलाइन आणि अभिकर्ता म्हणजे एजण्टामार्फत. दोन्ही पद्धतीत काही फायदे आणि काही तोटे आहेत. विमा घेण्यापूर्वी ते नीट समजून घेणं गरजेचं आहे.
विमा ही आग्रहाची बाब आहे, हे वाक्य विमा कंपन्यांच्या जाहिरातीत आपण नेहमीच पाहतो. पूर्वी विमाविषयक जागरूकता नसल्यामुळे तो पटवून देण्याची गरज होती. त्यातूनच या वाक्याची निर्मिती झाली असावी. पण आज विमाविषयक जागरूकता वाढलेली आहे. तरीही स्वतःहून विमा घेण्याऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे. पूर्वी ऑनलाइन विमा नव्हता, त्यावेळी विमा कंपनीचे अभिकर्ता (एजण्ट) ग्राहकांना भेटून विम्याचा आग्रह करत. पण आता ऑनलाइन विमा उपलब्ध झाल्यामुळे टेक्नोसॅव्ही ग्राहक ऑनलाइन विमा घेऊ लागले आहेत.
विमा घेण्याचे दोन्ही प्रकार उपलब्ध झाल्यामुळे विमा अभिकर्त्यामार्फत घ्यावा की ऑनलाइन घ्यावा, असा अनेक ग्राहकांचा संभ्रम होतो. त्यामुळे दोन्ही प्रकारांबाबत खालील गोष्टी समजून घ्यायला हव्यात.
ऑनलाइन विमा
ऑनलाइन विमा हा स्वस्त असतो. कारण या प्रकारात ग्राहक कंपनीशी थेट संपर्क करत असल्यामुळे आणि अभिकर्त्याला मिळणाऱ्या कमिशनचा भाग नसल्यामुळे विमा कंपनीला तो स्वस्तात विकता येतो.
ऑनलाइन विमा घेणाऱ्या ग्राहकांना कंपनीशी थेट संपर्क करावा लागतो. विमा घेण्यापासून ते विम्याचा दावा करेपर्यंत सर्वच गोष्टींसाठी स्वतःच कंपनीशी संपर्क साधावा लागतो.
विम्याचा दावा सादर केल्यानंतर विमा कंपनीने मागिलेली कागदपत्रं स्वतःच समजून घेऊन त्यावर कारवाई करणं आवश्यक असतं.
आपण अभिकर्त्याच्या सल्ल्याचे आणि वेळेचे पैसे ऑनलाइन विमा प्रकारात वाचवतो, पण त्याची किंमत आपला स्वतःचा वेळ आणि अभ्यास देऊन चुकवायला लागते. मात्र आपण हा वेळ द्यायला तयार असाल तर निश्चितच ऑनलाइन पॉलिसीमध्ये आपले पैसे वाचू शकतात.
अभिकर्त्यामार्फत विमा
विमा ऑनलाइन घेतल्यामुळे स्वस्त मिळत असेल तर मग अभिकर्त्यामार्फत तो का घ्यावा? ग्राहक ऑनलाइन विमा घेत असतील तर मग विमा कंपन्या अभिकर्त्यांचं जाळं का निर्माण करतात? पण गंमत अशी आहे की आजही असंख्य ग्राहक ऑनलाइनपेक्षा अभिकर्त्यामार्फतच विमा घेण्यास पसंत करतात.
सर्वच ग्राहकांना विम्याचा अभ्यास, त्याचे फायदे-तोटे, खाच-खळगे आदींची माहिती नसते. कधीकधी स्वतःच्या कामाच्या गडबडीत बहुतांश लोकांना याबाबत विचार करायलाही वेळ नसतो. अशावेळी विमा घेताना विमा कंपनीचा अभिकर्ता आपल्याला योग्य ती मदत करू शकतो.
विम्याचा पूर्ण अभ्यास करून आपल्या ग्राहकांना योग्य तो विमा विकत घ्यायला अभिकर्ता मदत करतो.
विमा घेतल्यावरही ग्राहकाला चांगली सेवा देऊन त्यांना जेव्हा दाव्यासाठी गरज लागेल तेव्हा योग्य मार्गदर्शन करून त्यांचे पैसे मिळवून देण्याचं काम अभिकर्ता करतो. त्याच्या या वेळचं मूल्य म्हणूनच विमा कंपनी अभिकर्त्यांना कमिशन देते.
कमिशनमधून मिळालेल्या उत्पन्नातून बहुतांशी अभिकर्ते सेवा पुरवण्यासाठी स्वतःचं ऑफिस सुरू करतात. ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी स्टाफचीही नियुक्ती करतात. ज्यावेळी ग्राहकांना विम्याच्या संदर्भात सेवा लागेल तेव्हा अनेक ग्राहक कंपनीकडे न जाता अभिकर्त्यामार्फत आपलं काम पूर्ण करून घेतात.
हे लक्षात ठेवा
गृहविमा देताना विमा कंपनी आपल्यावर पूर्ण विश्वास टाकते. आपण दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्या धोक्यांचं मूल्यमापन करून विमा देते. पण दावा आल्यानंतर मात्र आपण दिलेली माहिती तंतोतंत बरोबर आहे की नाही हे तपासून पाहते. आपण कुठलीही माहित दडवून ठेऊन किंवा चुकीची देऊन विमा घेतला असेल तर मात्र आपला विमा रद्द होतोच, पण विम्याचे भरलेले सर्व पैसेही कंपनी स्वतःकडे जमा करून घेते. त्यामुळे आपली अचूक माहिती फॉर्ममध्ये भरली की नाही हे तपासून पाहा.
अर्जातल्या प्रत्येक प्रश्नाचा अर्थ समजून प्रश्नांची उत्तरं द्या.
आयुर्विम्यामध्ये आपले आजार, हॉस्पिटलायझेशन, सवयी, छंद हेसुद्धा नमूद करणं आवश्यक आहे.
घराच्या विम्यामध्ये घराचं क्षेत्रफळ, घरातल्या वस्तूंच्या योग्य किमती, धोके निर्माण करणाऱ्या बाबीही सांगणं आवश्यक आहे.
विम्याचे नियम, विम्याच्या अटी याही तपासून घेणं आवश्यक आहे.
विम्याचा दावा करताना लागणारी कागदपत्रं आणि नियम हेसुद्धा समजावून घेणं आवश्यक आहे.
विम्याच्या हप्त्याच्या तारखेला किंवा वाढीव मुदतीच्या आत हप्ता भरणं आवश्यक आहे.
विमा कंपनीशी संपर्क करायचा झाल्यास संबंधित कार्यालयाचे पत्ते आणि फोन नंबर जवळ बाळगणं आवश्यक आहे.
विमा घेताना आपल्याला किती विमा लागणार आहे, याचं योग्य मूल्यमापन करून विमा घेणं हिताचं आहे.
प्रत्येक ग्राहकाने आपल्याला काय योग्य आहे, याचा निर्णय स्वतःच घ्यावा. स्वतःला आणि आपल्या घराला योग्य प्रकारे सुरक्षित करावं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
'संयुक्त मालकी' या संकल्पनेबाबतची चर्चा कित्येक दशकं नव्हे तर शतकांपासून चाललेली होती आणि कित्येक कायदेपंडितांनी (जुरिस्ट) त्यावर आपापली मतं विश्वसनीयरित्या व्यक्त केलेली होती. त्यातूनच पुढे वैधानिक नियम आखले गेले आणि 'संयुक्त मालकी' आणि 'सामायिक मालकी' असा सुस्पष्ट फरक करण्यात आला.
कित्येक प्रसंगी असं दिसून येतं की बँकांमधल्या मुदतठेवी, संयुक्त भांडवल कंपन्यांचे समभाग (कंपनी शेअर्स), पोस्टातली बचत खाती वा मुदतठेवी किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रं आणि अगदी सहकारी गृहसंस्थेतली सदनिकादेखील पती-पत्नी किंवा पिता-पुत्र किंवा भाऊ-बहीण यांच्या 'संयुक्त नावाने धारण केलेली' असते. कधी-कधी अशी मालमत्ता, काका-पुतण्या किंवा मामा-भाचा किंवा कधी कधी तर नात्यात नसणाऱ्या व्यक्तींच्या संयुक्त नावाने नोंदवलेली/धारण केलेली असते.
मालमत्ता संयुक्त नावाने धारण करणाऱ्या अशा दोन व्यक्ती जोपर्यंत जीवित आहेत किंवा त्यांच्यात सुसंवाद आहे, तोपर्यंत त्यांना अशा मालमत्तेची किंवा त्यातून व्याज किंवा लाभांश (डिव्हिडंडच्या) रूपाने मिळणाऱ्या उत्पन्नाची वाटणी कशी करायची याची चांगली कल्पना असते. सहकारी संस्थेतील सदनिकेच्या बाबतीत, तिच्या देखभालीच्या खर्चाच्या (मेंटेनन्स चार्जेस) जबाबदारीची वाटणी कशी करायची याचीदेखील चांगली माहिती असते. अशा संयुक्त मालमत्ताधारकांना ठेवींच्या मुदत समाप्तीनंतर मिळणारी रक्कम किंवा अशा मालमत्तेच्या विक्रीतून प्राप्त होणारी रक्कम कशाप्रकारे विभागून घ्यायची हेसुद्धा चांगलं ठाऊक असतं. परंतु बरेचदा वाद किंवा असहमतीच्या प्रसंगी मालमत्तेच्या संयुक्त मालकीचा मुद्दा उफाळून येऊन आणि त्याची परिणती कोर्टाची पायरी चढण्यात होते. तसंच संयुक्तपणे मालकी धारण करणाऱ्यांपैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर मालमत्तेतला त्याचा वाटा किंवा हितसंबंध हे त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांकडे जातील की संयुक्त मालकी धारण करणाऱ्यांपैकी जो हयात असेल तो संपूर्ण मालमत्तेचा एकमेव मालक बनेल, असादेखील प्रश्न उद्भतो. म्हणूनच संयुक्त मालमत्ता या विषयाचा परामर्श घेणं आवश्यक ठरतं. कारण याबाबत काही वादग्रस्त, विरोधाभासी दृष्टिकोन किंवा मतमतांतरे प्रचलित असू शकतात की जी कायद्याच्या नजरेतून योग्य असतीलच असं नाही.
पोस्ट ऑफिसेस किंवा बँका किंवा कंपन्या वा सहकारी संस्था मयत व्यक्तीच्या माध्यमातून मालमत्तेवर दावा सांगणाऱ्या व्यक्तीकडे संबंधित मालमत्ता हस्तांतरित करण्यास एकतर नकार देतात किंवा त्या व्यक्तीवर ढीगभर अनावश्यक कागदपत्रं गोळा करून सादर करण्याचा बोजा लादतात. हे काम वेळखाऊ तर असतंच पण क्षतिपूर्ती पत्र (इंडेम्निटी बॉण्ड) वा हमीपत्र (गॅरेण्टी बॉण्ड) अशी कागदपत्रं मागितली तर ती कायद्याच्या दृष्टीने अनावश्यकदेखील असतात.
संयुक्त मालकी या संकल्पनेबाबतची चर्चा कित्येक दशकं नव्हे तर शतकांपासून चाललेली होती आणि कित्येक कायदेपंडितांनी (जुरिस्ट) त्यावर आपापली मतं विश्वसनीयरित्या व्यक्त केलेली होती. त्यातूनच पुढे वैधानिक नियम आखले गेले आणि संयुक्तपणे मालमत्ता धारण करण्याच्या दोन मुख्य प्रकारांमध्ये (म्हणजे, संयुक्त मालकी आणि सामायिक मालकी) यात सुस्पष्टपणे फरक करण्यात आला. संयुक्त मालकीचा तिसरा पर्याय म्हणजे समग्र मालकी (टेनन्सी बाय द एन्टाइअर्टी), यालाही कायदेशीर मान्यता देण्यात आली. मात्र हा पर्याय केवळ पती-पत्नीसाठीच उपलब्ध आहे, ज्यामध्ये एकाच्या मृत्यूनंतर उत्तरजीविता (सर्व्हायवरशीपने) पद्धतीने मालकी हस्तांतरित होते आणि दोघांच्या संमतीशिवाय मालकी तोडताही येत नाही.
संयुक्त मालकीच्या संदर्भात माननीय गुजरात उच्च न्यायालयाने नंदलाल गिरधरलाल आणि इतर विरूद्ध गुलामनबी जमालभाई मोटारवाला (AIR 1973 Guj 131, (1972) GLR 880) या प्रकरणी दिलेल्या निकालाचा संदर्भ घेणं इथे उपयोगी ठरेल.
या प्रकरणात एका न्यायमूर्तींनी द्विसदस्यीय खंडपीठाला उद्देशून दोन प्रश्न केले.
१) मालमत्तेच्या अनेक सह-मालकांपैकी केवळ काही सह-मालक, संयुक्त मालकीतून माघार घेण्याची नोटीस देऊन संयुक्त मालकीला समाप्त करू शकतात काय?
२) एका किंवा अनेक सह-मालकांना, उर्वरित सह-मालकांना सहभागी करून न घेता, न्यायालयात दावा दाखल करून एखाद्या सह-मालकाला संयुक्त मालकीतून कमी करता येतं काय?
यावर गुजरात उच्च न्यायालयाने नोंदवलेलं मत खालीलप्रमाणे आहे.
विचार करण्याजोगा पहिला प्रश्न हा की दोन किंवा अधिक सह-मालकांनी धारण केलेली मालमत्ता एखाद्या भाडेकरूला दिलेली असेल अशा प्रकरणात सह-मालकांपैकी केवळ काहींनी सह-मालकीतून माघार घेत असल्याबाबत दिलेली नोटीस ही संयुक्त मालकी समाप्त करण्यास पुरेशी आहे किंवा अशी नोटीस सर्वच्या सर्व संयुक्त मालकांनी वा सर्व संयुक्त मालकांच्या वतीने दिली गेली पाहिजे.
आपण सध्या या प्रश्नाची तात्त्विक दृष्टीने आणि अधिकारितेच्या दृष्टीने तपासणी करू. पण असं करण्यापूर्वी आपण आधी हे स्पष्ट करू की मालमत्तेच्या संयुक्त मालकीमध्ये दोन मुख्य प्रकार ओळखले जातात.
१) संयुक्त मालकी
२) सामायिक मालकी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
मुंबईला एक सुसज्ज शहर बनवण्यासाठी ज्यांनी आजन्म धडपड केली, पदरचे पैसे खर्च केले त्यात जगन्नाथ शंकरशेट यांचं मोलाचं योगदान होतं. कायम मुंबईच्या विकासाचा ध्यास बाळगणाऱ्या नानांना ३१ जुलै १८६५ रोजी मुंबईतच देवाज्ञा झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची ही ओळख.
नानांचे आजोबा गणबाशेट कोकणातून मुंबईला आले आणि तेव्हापासून मुंबईने त्यांना व त्यांच्या नाना शंकरने मुंबईला आपलंसं केलं. नाना म्हणजे जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे. त्यांची कर्मभूमी म्हणजे गिरगाव अर्थात मरिन लाइन्सपासून मुंबई सेंट्रलपर्यंतचा विभाग. हा भाग त्यांनी आपला मानला आणि त्याच्या विकासासाठी ते आजन्म झटत राहिले. १९ फेब्रुवारी १८०३ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला आणि ३१ जुलै १८६५ रोजी मुंबईतच त्यांना देवाज्ञा झाली.
नानांचे शिक्षणक्षेत्रातले कार्य, अनेक ठिकाणी केलेले परोपकार, सामाजिक कार्य तसेच मुंबईला घडवण्यासाठी त्यांनी जो पुढाकार घेतला तो सर्व मुंबईकरांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल. नाना शंकरशेट यांचे योगदान जमशेटजी जीजीभाय, कावसजी जहांगीर, दादाभाई नवरोजी, फिरोजशहा मेहता तसेच डेव्हिड ससून यांच्या तोडीचेच मानले पाहिजे. नानांनी १८५७ च्या उठावात भाग घेतल्याचा संशय ब्रिटिशांना होता पण पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली.
नानांचा जन्म एका पिढीजात धनिक कुटुंबात झाला. त्यांनी सचोटीने उद्योग-व्यवसाय केल्यामुळे व्यापारात पत कमावली. त्यांना व्यवसायात कायम यश व मान मिळाला. त्यांनी खूप धनसंचय केला पण समाजसेवाही केली. अशा सांगितलं जातं की, अरब आणि अफगाण व्यापारी आपले पैसे बँकेत न ठेवता नानांकडे ठेवत. नानांचे वडीलसुद्धा सावकारी पेढी चालवत. तेव्हा ब्रिटिश व ईस्ट इंडियाचे प्रतिनिधीही त्यांच्याकडे आर्थिक व्यवहार करत. असं म्हणतात की १८०० मध्ये नानांकडे १८ लाखाची संपत्ती होती. नाना गिरगावच्या एका वाड्यात राहत. तो वाडा पाडून तिथे आता एक उंच इमारत बनणार आहे.
नानांनी आपल्या मालकीची सर्व जमीन सार्वजनिक कामासाठी दान म्हणून देऊन टाकली. त्यांनी अनेक सोसायट्या व संस्था काढल्या त्याची यादी खूप लांब होईल. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांनी खूप मदत केली. व्यावसायिक व व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी एक सहकारी संस्था काढली. वस्तू संग्रहालयं व उद्यान बनवण्यासाठी त्यांनी निधी पुरवला. जीजीभाय यांच्याबरोबर भागीदारीमध्ये इंडियन रेल्वे असोसिएशन काढली. तिचेच रूपांतर पुढे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेमध्ये झालं. ती म्हणजे सध्याची मध्य रेल्वे. मुंबईतल्या मरिन लाइन्स इथली सोनापूरची स्मशानभूमी त्यांच्या मदतीतूनच तयार झाली.
नानांनी सर जॉर्ज बर्डवूड व डॉ. भाऊ दाजींबरोबर मुंबईत इमारतींचे, रस्त्यांचे आणि दुतर्फा झाडी लावण्याचे नियोजन व बांधकाम केले. नानांनी सार्वजनिक विकासासाठी स्वतःचे पैसे खर्च केले. सध्याच्या धनिकांना यामधून धडा घेता येईल. नाना शंकरशेट यांनी केलेले काम व दान याला तोड नाही. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात नाना शंकरशेट यांचे मोलाचे योगदान आहे.
मुंबई म्हटली म्हणजे आपल्यापुढे तिची जीवनवाहिनी असणारी रेल्वे यंत्रणा येते. दरदिवशी ७० लाखाहून अधिक प्रवाशांना वाहतूक करणारी उपनगरी रेल्वे सुरू होण्यास परत नाना शंकरशेटच मदत धावले. जीआयपीमध्ये दहा डायरेक्टर होते. त्यात ज्या दोन भारतीयांचा समावेश होता त्यापैकी एक नाना होते.
मुंबईतल्या सार्वजनिक व खासगी दिमाखदार इमारती, राजाबाई टॉवर, नियोजित रस्ते व दुतर्फा वृक्षारोपण, डेव्हिड ससून वाचनालय, एशियाटिक सोसायटी, एल्फिन्स्टन कॉलेज, संस्कृत शाळा व वाचनालय, मुलींकरता शाळा, ग्रँट मेडिकल व नायर महाविद्यालय, जेजे स्कूल ऑफ आर्टस, पाणीपुरवठा, आरोग्य यंत्रणा, रस्त्यावरचे दिवे, पालिका स्थापणे, भाऊचा धक्का, म्युझियम, राणीचा बाग इत्यादी अनेक सुविधा नानांच्या प्रेरणेतून स्थापल्या गेल्या. त्यांच्या कर्तृत्वामुळे मराठी, गुजराथी व देवनागरीत प्रथमच क्रमिक पाठ्यपुस्तकं छापली गेली. त्यामुळे सर्वांच्या शिक्षणाची सोय झाली.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राइतकंच प्रचंड कार्य नानांनी आर्थिक व मूलभूत क्षेत्रातही केलं. १८४५मध्ये एतद्देशियांच्या भागीदारीने पश्चिम भारतात वाफेच्या बोटींचा पाया घालणारी बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी काढली. मराठी हिंदी, गुजराथी व्यावसायिक रंगभूमीचा पाया घालणारे बादशाही नाट्यगृह काढले. १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे मार्गावर आशिया खंडात प्रथमच धावलेल्या रेल्वेमध्ये बसून प्रवास केला. अर्थात ती रेल्वेगाडी धावण्यामागे नानांचेच प्रयत्न होते. शासकीय मध्यवर्ती वस्तूसंग्रहालय, मर्कण्टाइल बँक, सेंट्रल बँक आदी बँकाचीही स्थापना त्यांनी केली.
मुंबईकरानी एवढ्या मोठ्या मनाच्या नायकाचे कौतुक केले पाहिजे. सध्याचा जवळ जवळ सगळ्याच प्रांतात त्यानी आपली छटा उमटवली आहे.
(लेखक ज्येष्ठ अभियंते असून त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जलविभागात काम केलेलं आहे.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
मुंबई, नवीन मुंबई व ठाणे इथल्या विविध विभागात औद्योगिक विभाग सोडून अन्य बहुतेक ठिकाणी डेसिबल्सचं उल्लंघन होतं. ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी नॉइज बॅरिअर्स बसवायला हवेत. तसंच रस्त्यांवरच्या उत्सवांपाठोपाठ डीजेवरही बंदी घालायला हवी.
मुंबईत प्रदूषणाची एक मालिकाच बनली आहे. वायू-जल-प्रकाश-भूमी आणि ध्वनिप्रदूषण. वाहनांच्या एक्झॉस्ट्मधून कमी जळलेल्या इंधनामधून ओझोन व इतर विषारी वायू आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या भ्रमणध्वनी माध्यमातून हवेत आणखी विषारी उत्सर्जन होत असतं. अशा बाबींमुळे मुंबईकरांना अनेक आजाराना तोंड द्यावं लागतं. पण ध्वनीचा सकारात्मक वापरही करता येतो.
ध्वनीची ताकद डेसिबलमध्ये (डीबी) मोजतात. डेसिबल हे लोगॅरिथमवर रचलेले आहेत. १० डेसिबल ताकद वाढली तर प्रत्यक्ष आवाज दुपटीने वाढलेला असतो.
ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून महाराष्ट्र व केंद्रीय प्रदूषण नियमन मंडळाने (MPCB & CPCB) डेसिबल-प्रमाणित बंधनं आणि मर्यादा आखून दिल्या आहेत. परंतु मुंबईत व इतर मोठ्या शहरात या प्रमाणांचं उल्लंघन केलं जातं आणि याला सर्वस्वी नागरिकच जबाबदार आहेत. महापालिका आणि पोलिस खातं अशा नियम-उल्लंघन करणाऱ्यांवर व्यवस्थित लक्ष देत नसल्याने आणि कडक कारवाई करत नसल्याने ही मंडळंही तितकीच अविश्वसनीय ठरतात.
'सीपीसीबी'ने ध्वनिप्रदूषणाचं गेल्या काही वर्षांत(२०११-१४) ९ मोठ्या (१० लाख लोकसंख्याहून जास्तीच्या) शहरांतल्या ३५ ठिकाणी सर्व्हेक्षण केलं होतं. त्यात मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्य़ाच्या सर्व ठिकाणांवर प्रमाणित बंधनापेक्षा अधिक ध्वनिप्रदूषण झालेलं आढळून आलं. मुंबईत सर्वात जास्त प्रदूषण आढळलं. दिल्लीचा क्रमांक लखनऊ व हैदराबाद पाठोपाठ चौथा आला तर बंगळुरू व कोलकाता शहरांमध्ये प्रदूषण मर्यादेचं कमी उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं.
सीपीसीबीने सरकारला वसाहतींच्या ठिकाणांबाबत काही मार्गदर्शक तत्व सांगितलेली असून ती खालीलप्रमाणे आहेत.
घरं औद्योगिक ठिकाणाहून जवळ बांधू नयेत. घरांभोवती वृक्षांची लागवड करावी आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडांच्या रांगा लावाव्यात. म्हणजे रस्त्यावरील कर्कश आवाजापासून रहिवाशांचा बचाव होईल.
नेहमीच्या वाहतुकीमुळे आजूबाजूच्या घरांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. कारखान्यातील मशिनरीचा, विमानांच्या आवाजाचा, कार्यालयातल्या विविध मशिनरी व सायरनसारख्या साधनांकडून प्रदूषण होतं.
वाहतुकीच्या गजबजाटामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होतं. याचं कारण चुकीचं नगरनियोजन वा नगर नियोजनाचाच अभाव.
विशेष सामाजिक घटना ध्वनिक्षेपण यंत्रं बसवून साजऱ्या करण्यात येतात, त्यामुळेही या प्रदूषणात भर पडते.
बांधकाम उद्योगधंदा, घरातली टीव्ही, भ्रमणध्वनी वा इतर ध्वनी उत्पन्न करणारी साधनं वापरल्यामुळेही ध्वनिप्रदूषण होतं.
मुंबई, नवीन मुंबई व ठाणे इथल्या विविध विभागात औद्योगिक विभाग सोडून अन्य बहुतेक ठिकाणी डेसिबल्सचं उल्लंघन होतं. त्याची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
वडाळा (७०.९५, ७३.२)
वाशी (६८.५, ५७)
अॅम्बेसेडर हॉटेल (७३.२, ६६.३)
एमपीसीबी ऑफीस, शीव (६८.७, ६६.९)
वांद्रे (६७.९, ६२.२)
ठाणे (६१.६, ५४.५)
बिसलेरी, अंधेरी (६८.९, ६६.५)
एलअॅण्डटी (६३, ५५.८५)
कांदिवली (६३.२, ५३.४)
चेंबूर (६२.७, ५६.८)
मुंबईतली महापालिकेची शांतता क्षेत्रं आणि तिथं किती डेसिबलची मर्यादा घालून दिलेली आहे, ते पाहू या.
ध्वनिप्रदूषणासंदर्भातल्या निरीक्षणासाठी दिवसाची वेळ सकाळी ६ ते रात्री १० तर रात्रीची वेळ रात्री १० ते सकाळी ६ अशी असते.
२००९ मध्ये मुंबईत ११७७ शांतता क्षेत्रं (सायलेन्स झोन) होती, ती २०१५ मध्ये १५३७ झाली आहेत. बेटावर ४५३, पश्चिम उपनगरात ५२४ आणि पूर्व उपनगरात ५४० अशी त्यांची संख्या आहे.
कुर्ल्यात सर्वात जास्त २६८ आणि सी प्रभागात सर्वात कमी १२ शांतता क्षेत्रं आहेत.
शांतता क्षेत्रापासून १०० मीटर अंतरापर्यंत परिसर हिशोबात घेऊन १७ प्रभागांचे नकाशे पुरे झाले आहेत. इतर प्रभागांतली शांतता क्षेत्रं नकाशावर दाखवण्याचं काम सुरू आहे.
मुंबईतल्या वायू प्रदूषणाची आकडेवारी रोजच्या रोज बघायला मिळते. तशी अन्य १२०० ठिकाणच्या ध्वनिप्रदूषणाचे आकडे समजण्यासाठी करण्यात येणारं काम ३५ टक्के पूर्ण झालं आहे. या वेगाने सर्व कामं पूर्ण व्हायला आणखी २ वर्षं लागतील.
ध्वनिप्रदूषणाने बाधित व्यक्तीवर आजाराचे काय परिणाम आढळतात ?
अनेक साधनांच्या सततच्या मोठ्या आवाजामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. एक तर ध्वनिप्रदूषणाचा कानावर परिणाम होतो आणि कमी ऐकू येतं. तसंच शरीरावर दबाव येणं, काळजी व भीती वाटणं, उच्च रक्तदाब वा हृदयाचे ठोके वाढणं, निद्रानाशाचा त्रास होणं, डोकं दुखणं, एकाग्रता भंग होणं, कामातला शीघ्रपणा कमी होणं आदी समस्यांना तोंड द्यावं लागतं.
प्रचंड ध्वनी निर्माण करणारी कारणं कोणती?
मोठे फटाके (१४० डीबी)
ध्वनिक्षेपण (१२७ डीबी)
वाहतुकीतले वाहनांचे भोंगे वा सायरन (११० डीबी)
बांधकाम उद्योग (१०७ डीबी)
विमानतळ/हेलिपॅड (९० डीबी)
रेल्वे शीळ (८५ डीबी)
बाहेरील जनरेटर वा एक्झॉस्ट (८५ डीबी)
घरातला पंखा वा वातायन (७५ डीबी)
विमान चालू होणं (१५० डीबी)
ढगांचं गडगडणं (१३० डीबी)
पोलाद कारखाना (१२० डीबी)
घड्याळाचा गजर (८० डीबी)
वातायन (६० डीबी)
फ्रीज (४९ डीबी)
पोलिस खात्याला न्यायालयाची सूचना
महाराष्ट्रातल्या ४६ महापालिका हद्दीतल्या १३८८ पोलिस केंद्रांसाठी फक्त ४९४ डेसीबल मापन यंत्रांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. या केंद्रांनी लवकरच म्हणजे ३ महिन्यांच्या आत १८४३ डेसिबल मापन यंत्रं बसवावीत, अशा सूचना उच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी धार्मिक उत्सव होतात आणि आवाजाची मर्यादा वाढते, तिथे ध्वनिमापन व्हायला हवं. मुंबईतल्या प्रत्येक पोलिस केंद्रावर ऑगस्ट २०१६ च्या शेवटापर्यंत ध्वनीमापन यंत्रं बसवली जाणार आहेत.
महापालिका किंवा पोलिस विभागाने खालील गोष्टी तपासाव्यात
ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने घरांजवळच्या सर्व उड्डाणपुलांवर नॉइज बॅरिअर्स बसवायला हवेत.
रस्त्यांवरील उत्सवापाठोपाठ डीजेवरही बंदी घालायला हवी. अलिकडे मुंबईच्या विमानतळावर नॉइज बॉक्स बसवण्यात आला आहे.
दुःश्राव्य (ultra) ध्वनी आणि ध्वनिशक्ती
ध्वनिप्रदूषणामुळे कोणाचंही नुकसान होतं आणि ते अहितकारी ध्वनीमुळे होतं. पण उपयुक्त अशा ध्वनीकडून अनेक गोष्टी मानवाना हितकारकरित्या मिळू शकतात.
समुद्राच्या लाटांचा आवाज, बाळांचं बडबडणं, ओढ्याचं खळखळणं हे गोड आवाज मानवाला मोहवून टाकतात. अशा आवाजाने शांत झोपही येऊ शकते.
भारतीय व परदेशी शास्त्रीय संगीत हे तर अनेकाना गुंगवून टाकतं आणि बेभान करतं. काही आजारांवर संगीतोपचार म्हणूनही याचा वापर होऊ शकतो. त्यातून आजार कमी वा बरे होण्यास मदत होते.
प्राचीन भारतात विकसित झालेल्या अनेक मंत्रसिद्धी या तर ध्वनीवर अवलंबित अशा शास्त्रशुद्ध आहेत. या मंत्रातला ॐकार हा तर सर्वमान्य असा शक्तिशाली मंत्र आहे. याच्या उच्चाराने आध्यात्मिक बळ मिळतं आणि त्यात वातावरण पवित्र करण्याची शक्तिही आहे.
दु:श्राव्य ध्वनी (Ultra sound) हा २०००० हर्ट्झपेक्षा अधिक फ्रिक्वेन्सीत असतो आणि तो मानवाला ऐकू येऊ शकत नाही. पण तो मानवाच्या हिताचा आहे.
मानवाला श्राव्य ध्वनी २० ते २०००० हर्ट्झ इतक्या मर्यादेतच असतो. बालकं हा दु:श्राव्य ध्वनी थोड्या-अधिक प्रमाणात ऐकू शकतात. अनेक कीटक, व्हेल, डॉल्फिन मासे व कुत्रा यांना हा आवाज ऐकू येतो. वस्तू आणि वेल्डिंगमधला दोष ओळखण्यासाठी या दु:श्राव्य ध्वनीचा अविध्वंसक चाचणीतून (NDT) वापर करतात. हा ध्वनी वैद्यकशास्त्रात इको-कार्डिओग्रॅमसारख्या अनेक प्रांतात उपयुक्त ठरला आहे.
ध्वनिप्रदूषणापासून घराचा बचाव कसा करायचा?
ध्वनिप्रदूषणापासून घराचा बचाव करायचा असेल तर घराच्या भिंतीना ग्लासवूल व फोमची प्रक्रिया करावी लागते. तसंच खिडक्यांची तावदानं जाड दुहेरी ग्लास सॅण्डविचची बसवून घ्यावी लागतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषणापासून घराचं संरक्षण होतं.
(लेखक ज्येष्ठ अभियंते असून त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जलविभागात काम केलेलं आहे.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट