- गणेश आचवल
ग्रॅण्ट रोडच्या भाजीगल्लीमधल्या काही इमारतींनी शंभरी गाठल्यानंतर त्यांचा पुनर्विकास झाला. अशाच काही इतर इमारती आज नव्या रूपासाठी सज्ज झाल्या आहेत.
ग्रॅण्ट रोड रेल्वे स्टेशनच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर एक विस्तीर्ण गल्ली दिसते. सकाळपासून रात्रीपर्यंत गजबजलेली ही गल्ली म्हणजे ग्रॅण्ट रोडची भाजीगल्ली. या भाजीगल्लीमधल्या काही इमारतींना १०० वर्षं पूर्ण झाली आहेत, तर काही इमारतींनी शंभरी पूर्ण केल्याने त्यांचा कायापालट झाला आहे.
खरंतर या गल्लीतच तीन क्रॉस लेन आहेत. संपूर्ण गल्लीत सुमारे १५ इमारती आहेत. पूर्वी इथे 'भालचंद्र बिल्डिंग' नावाच्या तीन चाळी होत्या. त्या चाळींना १०० वर्षांचा इतिहास होता, पण २००३ मध्ये त्या चाळी पाडून तिथे २० मजली इमारत उभारण्यात आली. या गल्लीत 'अभ्यंकर बिल्डिंग' नामक तीन चाळी आहेत. त्यापैकी एक, चार मजली आणि उरलेल्या तीन मजल्याच्या आहेत. इथल्या घरांचं क्षेत्रफळ २१५ ते २५० चौरस फूट आहे.
भाजीगल्लीचा अर्धा भाग हा 'ईस्ट' आणि वेस्ट विला' या इमारतींनी व्यापला आहे. त्यात काही बैठी घरं आहेत, तर काही दुमजली चाळी आहेत. ब्लॉक सिस्टिम पद्धतीचा 'ईस्ट आणि वेस्ट' बंगलाही इथे आहे. या गल्लीत पूर्वी इथे एक तळं होतं, असं जुनी मंडळी सांगतात. पुढे ते तळं बुजवून तिथे चाळी बांधण्यात आल्या. भाजीविक्रेते, विविध वस्तूंची दुकानं, भांड्यांची दुकानं, सुपरमार्केट, हॉटेल, डेअरी, नारळाची दुकानं, केशकर्तनालय अशा सर्व व्यावसायिकांनी ही गल्ली गजबजलेली असते. व्यवसाय करणारी अनेक कुटुंबंही याच गल्लीत राहतात. या गल्लीचं नाव 'भाजीगल्ली' असं नव्हतं. पूर्वी भाजी विकायला इथे वसईहून भाजीविक्रेते येत. पण आता वसईहून भाजी विकायला येणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे या गल्लीचं नाव 'भाजीगल्ली' असं झालं.
सुप्रसिद्ध साहित्यिक बाबुराव अर्नाळकर, अभिनेत्री उषा नाडकर्णी इथल्याच रहिवासी होत्या. तसंच अभिनेत्री गौतमी कपूरचं बालपणसुद्धा 'भालचंद्र बिल्डिंग'मध्ये गेल्याचं इथले रहिवासी सांगतात.
भाजीगल्लीत दोन गणपती आणले जातात. त्यापैकी १९४९ पासून इथे श्री बाल गणेशोत्सव मंडळाचा एक गणपती असतो. दरवर्षी एकाच प्रकारची शाडूची गणपतीची मूर्ती हे या गणपतीचं वैशिष्ट्य आहे. तसेच याच गल्लीत 'तालुका मलबार हिलचा राजा' असं महत्व असणारी एक मोठी गणपतीची मूर्तीसुद्धा आणली जाते. 'अभ्यंकर बिल्डिंग' तसंच आणि 'ईस्ट आणि वेस्ट विला'मध्येही नवरात्र साजरी केली जाते.
गेली काही वर्षं 'भाजीगल्ली प्रिमिअर लीग' नावाने इथे क्रिकेट सामनेसुद्धा आयोजित केले जातात . या गल्लीत मराठी कुटुंबांची वस्ती प्रामुख्याने आहे. या गल्लीतील काही इमारतींना आता पुनर्विकासाची प्रतीक्षा आहे .
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट