सरकारी रोख्यांचाही सोनेखरेदीसाठी पर्याय केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या सार्वभौम सुवर्णरोख्यांच्या (सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड) विक्रीच्या पुढील टप्प्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना १७ जानेवारीपर्यंत हे रोख विकत घेता येतील. यासाठी एक ग्रॅम सुवर्णरोख्याची किंमत ४,०१६ रुपये निर्धारित करण्यात आली आहे. ऑनलाइन खरेदी केल्यास त्यात ५० रुपयांची सवलत मिळेल. म्हणजेच, सुवर्णरोखे ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना एक ग्रॅमसाठी ३,९६६ रुपये द्यावे लागतील. सद्यस्थितीत सोनेदरात सतत वाढ होत असून यापुढेही ही तेजी कायम राहणे अपेक्षित आहे. अपारंपरिक माध्यमातून होणारी ही गुंतवणूक बरीच लाभदायी ठरू शकेल, असे विश्लेषकांनी म्हटले आहे. सार्वभौम सुवर्णरोख्यांची वैशिष्ट्ये पाहू या. चार किलोची मर्यादा या प्रकारचे सुवर्णरोखे सरकारद्वारे जारी केले जातात आणि ते दुय्यम बाजारात सूचीबद्ध असतात. २०१८-१९ प्रमाणे चालू आर्थिक वर्षातही दरमहा हे सुवर्णरोखे विक्रीसाठी उपलब्ध केले जात आहेत. कोणतीही व्यक्ती, विश्वस्त संस्था, अविभक्त हिंदू कुटुंब, धर्मादाय संस्था आणि विद्यापीठ हे रोखे विकत घेऊ शकतात. या रोख्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे बँक, आर्थिक संस्था आणि बिगर बँकिंग वित्त कंपन्यांकडून हे रोखे तारण ठेवून कर्ज देऊ शकतात. या योजनेतून एका आर्थिक वर्षात एका व्यक्तीला जास्तीत जास्त चार किलो सोने विकत घेता येते. तर, विश्वस्त संस्थांसाठी ही मर्यादा २० किलोंची आहे. ठोक सोन्याची मागणी कमी करण्याच्या हेतूने नोव्हेंबर २०१५पासून या योजनेस सुरुवात करण्यात आली. करलाभ कशाप्रकारे? सार्वभौम सुवर्णरोख्यांचा कालावधी हा ८ वर्षांचा असतो व त्यावर वार्षिक २.५ टक्के दराने व्याज दिले जाते. गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणून त्याकडे पाहिले जाते. या रोख्यांच्या विक्रीवर होणारा दीर्घकालीन भांडवली नफा हा करमुक्त असतो. मात्र त्यातून मिळणारे व्याज हे करपात्र असते. अन्य फायदे कोणत्याही प्रकारच्या तारण कर्जासाठी या रोख्यांचा उपयोग होऊ शकतो. तसेच, या रोख्यांमध्ये गुंतवणूक केल्यास टीडीएस कापला जात नाही. या रोख्यातील सोन्याचे मूल्य हे ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या बरोबरीचे मानले जाते. पाच वर्षांच्या कालावधीनंतर हे रोखे मोडून रोख रक्कम घेता येते. रोखे मोडताना असणारा सोन्याचा भाव त्यावेळी विचारात घेतला जातो. या रोख्यांच्या खरेदीवर जीएसटी आकारला जात नाही. पारंपरिक सोनेखरेदीत मात्र तीन टक्के जीएसटी द्यावा लागतो. गुंतवणूक पर्याय सध्याच्या काळात सोन्याचे दागिने, नाण्यांव्यतिरिक्त सुवर्ण बचत योजना, गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ), सॉव्हरिन सुवर्णरोखे आणि सुवर्णसंचय योजना यांतून सोन्यात गुंतवणूक करता येते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट