ईटी इन क्लासरूम करभार टाळण्यासाठी आर्बिट्रेज फंड शेअर बाजारात सध्या कमालीचा चढउतार अनुभवण्यास मिळत आहे. या स्थितीत कमी जोखीम व चांगला परतावा देणाऱ्या फंडांना गुंतवणूकदार प्राधान्य देतात. या फंडातील गुंतवणूक ही एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी राखल्यास करभारही पडत नाही. त्यामुळे या श्रेणीत आर्बिट्रेज फंडांचा पर्याय उत्तम असल्याचे अर्थविश्लेषक सांगतात. आर्बिट्रेज फंड म्हणजे काय? आर्बिट्रेज फंड हा इक्विटी म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे. या फंडातील निधी हा कॅश आणि डेरिव्हेटिव्हजमध्ये गुंतवण्यात येतो व त्या माध्यमातून गुंतवणूकदारांना परतावा दिला जातो. अतिशय कमी जोखमीच्या इक्विटीमध्ये हे फंड गुंतवणूक करतात. किंबहुना यासाठी हे फंड क्रिसिलने सुचवलेल्या लिक्विड फंड इण्डेक्सचा आधार घेतात. साहजिकच, ही गुंतवणूक अतिशय सुरक्षित व कमी जोखमीची ठरते. आर्बिट्रेज फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमुख कारण काय? अल्पमुदतीची गुंतवणूक हे या फंडाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. डेट फंडांच्या दीर्घकालीन मुदतीसाठी एक वर्षाऐवजी तीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आल्यानंतर आर्बिट्रेजचे वैशिष्ट्य अधिक अधोरेखित झाले आहे. शिवाय, या फंडातील ६५ टक्के रक्कम ही इक्विटी फंडात गुंतवली जात असल्याने त्याला इक्विटी फंडाचाच दर्जा मिळतो. यामुळे इक्विटी फंडाला मिळणारे सर्व फायदे या फंडाला लागू होतात. आर्बिट्रेज फंडांवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यासाठी एक वर्षाची मुदत असते. त्यामुळे एक वर्षांच्या आत फंड युनिट्स काढून घेतल्यास गुंतवणूकदाराला कर लागू होत नाही. इक्विटीच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर सध्या १० टक्के कर लागू होतो. यातील गुंतवणूक सुरक्षित आहे का? आर्थिक सुरक्षिततेचा विचार केल्यास हे फंड सर्वात कमी जोखमीचे आहेत, असे अर्थ सल्लागार ठामपणे सांगतात. या फंडांची गुंतवणूक ही रोख बाजाराद्वारे केली जाते व विक्री फ्युचर मार्केटमध्ये होते. शेअर बाजारात ज्या प्रमाणात चढउतार नोंदवले जातात त्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी असतात. मात्र ज्यांना कमी जोखीम पत्करायची असते त्यांच्यासाठी हे फंड चांगला पर्याय ठरतात. या फंडातून आतापर्यंत मिळालेल्या परताव्याचे प्रमाण किती आहे? स्पॉट व फ्युचर मार्केटमधील संधींवर या फंडाच्या परताव्याचे प्रमाण अवलंबून असते. या फंडांनी गेल्या वर्षभरात सरासरी ६.०७ टक्के परतावा दिला आहे. कोणताही फंड हा जास्तीत जास्त काळ राखल्यास त्यातून अधिक परतावा मिळत असल्याने तीन वर्षांच्या कालावधीत या फंडाने ५.७८ टक्के परतावा दिल्याचे दिसते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट