एकीकडे मूळ मुंबईतला मराठी टक्का कमी होत असल्याचं बोललं जात असताना गिरगावातल्या 'जाधवजी जेठाबाई चाळी'सारख्या मोठ्या वस्तीतले ९० टक्के रहिवासी हे मराठी असल्याचं ऐकून समाधान वाटतं.
गिरगावातल्या बेडेकर सदन आणि माधवदास प्रेमजी चाळीवरून थोडे पुढे गेलात की 'शंभराव्या गणेशोत्सवाकडे वाटचाल' अशा आशयाचा एक फलक दिसतो. तो फलक असतो जाधवजी जेठाबाई चाळीचा. ही चाळ तब्बल १२० वर्षं जुनी आहे.
जेव्हा ही चाळ बांधली गेली, तेव्हा इथे फारशी वस्ती नव्हती. हळूहळू लोक राहायला येऊ लागले आणि त्यांच्या गरजेनुसार चाळ विकसित होऊ लागली. वेगळ्या प्रकारे बांधलेली ही अखंड चाळ म्हणता येईल. अगदी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या या चाळीची रचना तळमजला अधिक तीन मजले अशी आहे. तर आतमधली एक चाळ तळमजला अधिक एक मजला अशा रचनेची आहे. एक चाळीत तळमजला अधिक दोन मजले आहेत. दोन चाळींना जोडणारा एक छोटा पूलसुद्धा इथे आहे!
या चाळीतल्या घरांचं क्षेत्रफळ वेगवेगळं आहे. काही घरं १२० चौरस फुटांची तर काही १५० ते १६० चौरस फुटांची आहेत. काही जागा मोठी म्हणजे ३०० चौरस फुटांचीदेखील आहेत. साधारणतः ८६ भाडेकरू इथे राहतात.
या चाळीच्या मध्यभागी एक मोठा चौक आहे. या चाळीत पूर्वी विहीरही होती. चाळीचे काही जिने लाकडी तर काही दगडी आहेत.
या चाळीत तीन गणपती बसवले जातात. एक गणपती पूजेचा असतो. रहिवासी सांगतात की पूर्वी पूजेच्या गणपतीला सोवळं पाळलं जात असल्याने मुलांना मूर्तीच्या जवळ येऊ दिलं जात नसे आणि मग त्यातून पहिल्या मजल्यावर बालगोपाळांचा गणपती सुरू करायचं ठरलं. इथल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ९५ वर्षं पूर्ण झाली आहेत. मुख्य म्हणजे इथला गणेशोत्सव हा २१ दिवसांचा असतो. तसेच या चाळीतला तिसरा गणपती म्हणजे एक इंचाची मूर्ती असते. एक इंचाचा गणपती ही इथली खासियत असते. होळी, गोविंदा, नवरात्र असे सर्व सण इथे साजरे होतात. नवरात्रात दांडिया रासचं आयोजन केलं जातं.
सुप्रसिद्ध मूर्तीकार महेंद्र दळवी आणि चित्रकार एकनाथ कामतेकर हे या चाळीचे रहिवासी आहेत. 'अमरीगो' नामक एका चित्रपटाचे शूटिंगदेखील इथे झालं आहे. या चाळीतली ९० टक्के वस्ती ही मराठमोळी असल्याने या चाळीला आपण खऱ्या अर्थाने 'मराठमोळी वसाहत' म्हणू शकतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट