चंद्रशेखर प्रभु
.............................
आम्ही मुंबईतील माहीम या ठिकाणी वसलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचे रहिवासी आहोत. म्हाडाच्या जमिनीवर ३६ वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारती असून जमिनीचे क्षेत्रफळ ४००० चौरस मीटरपेक्षा जास्त आहे. कन्व्हेअन्स झालेले आहे. ले आऊट/पीआर कार्ड म्हाडाकडे आहे. सभासदांनी ३३ (५)प्रमाणे पुनर्विकास विकासकामार्फत व्हावा असा ठराव केला. टेंडर पद्धती वापरून विकासक नेमण्याचा निर्णय झाला. आम्हाला असे विचारावयाचे आहे, की शासन परिपत्रक (३/१/२००९रोजीचे) अनुसरून स्वयंपुनर्विकास करण्याचा ठराव विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करवून घेऊन पुनर्विकास करता येईल काय? नसल्यास पूर्वी तयार केलेल्या टेंडरच्या अटींमध्ये (इएमडी/बँक गॅरेंटी) बदल करून प्रस्ताव घेता येतील काय? टेंडरला प्रतिसाद न आल्यास ऑफर्स घेऊन विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांची मान्यता घेऊन विकासक नेमता येईल काय? सध्याच्या स्थितीमध्ये ४००० चौरस मीटरपेक्षा अधिक जागा असूनही समोरील रस्त्याची रुंदी १८ मीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे क्लस्टर डेव्हलपमेंटचा ४ एफएसआय मिळेल काय? तसे नसेल, तर ३ एफएसआय मिळेल काय? म्हाडाला प्रिमियम किंवा स्टॉक द्यावा लागेल काय? असल्यास किती द्यावा लागेल? कृपया आपण संबंधित बाबींवर मार्गदर्शन करावे ही विनंती.
ज. द.
..................................
उत्तर
आपल्या गृहनिर्माण संस्थेत जरी आधी विकासकाच्या माध्यमातून विकास ठराव मंजूर झाला असला, तरी स्वयंपुनर्विकासाचा ठराव कधीही घेतला जाऊ शकतो व त्याची अंमबजावणी करणे शक्य आहे. सभासदांच्या बहुमताच्या निर्णयाने नवीन ठराव मंजूर झाल्यास पूर्वीच्या ठरावाची दखल घेण्याची आवश्यकता राहत नाही. स्वयंपुनर्विकासाचा ठराव झाला, तर टेंडर काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. स्वयंपुनर्विकास या प्रकारे होत नाही. तो आपणच म्हणजे संस्थेने, सभासदांनी करायचा असतो. त्यामुळे स्वयंपुर्नवकासात टेंडरची पद्धत उपलब्धच नाही. क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी १८ मीटर रुंदीचा रस्ता उपलब्ध असणे आवश्यक असते. आपल्या सोसायटीस लागून असलेल्या रस्त्याची रुंदी १८ मीटर नसल्यास आपण ३३ (५) प्रमाणे पुनर्विकास करू शकता. यात ३ एफएसआय अधिक ३३ टक्के फंजिबल मिळून ४ इतके चटई क्षेत्र मिळू शकते. म्हाडाला जर २००० मीटरपेक्षा कमी जमीन असेल, तर प्रमियम भरण्याची सोय आहे. मात्र २०००पेक्षा अधिक चौ. मी. जमीन असल्यास हाऊसिंग स्टॉक देण्याची पद्धत आहे. याकरता ३३ (५) ही विकास नियंत्रण नियमावली तुम्हाला सविस्तर वाचावी लागेल. म्हाडाला स्टॉक कसा द्यावा याच्याविषयी सूत्रे जी आहेत, त्या सूत्रांप्रमाणे गणित मांडल्यास म्हाडाला किती जागा बांधून देणे आवश्यक राहील या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट