प्राप्तिकराने दिलेला निर्देशांक महत्त्वाचा १) भांडवली नफा/तोटा निश्चित करण्यासाठी ज्या निर्देशांकाचा आधार घ्यावा लागतो तो कसा ठरतो? मी गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडांत गुंतवणूक केली असून त्यावरील नफा/तोटा मला निश्चित करायचा आहे. त्यासाठी आधीच्या वर्षांचे निर्देशांक कोठे उपलब्ध होतील? दुसरे म्हणजे, या काळांत मिळालेला लाभांश हा नफा मोजताना विचारात घ्यावा लागेल काय? अशोक वर्तक, ठाणे कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचा व्यवहार करताना प्राप्तिकर विभागाने दिलेल्या निर्देशांकाला महत्त्व असते. त्यामुळे खरेदीच्या किंमतीस निर्देशांकानुसार वाढवून योग्य नफा मोजता येतो. या विषयीची तपशीलवार माहिती प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर म्हणजे, www.incometaxindia.gov.in येथे उपलब्ध आहे. २) समजा, एखाद्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडांच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीममध्ये (ईएलएसएस) दरवर्षी एक लाख याप्रमाणे १० वर्ष गुंतवणूक केली आणि त्यानंतर पहिल्या सात वर्षांतील सर्व युनिट काढून घेतली. या युनिटचे मूल्य ३० लाख रुपये असून त्यातील २० लाख हा परतावा आहे. तर, १० लाखांची रक्कम ही मूळ गुंतवणूक आहे. या स्थितीत लाँग टर्म कॅपिटल गेनच्या नियमानुसार वरीलपैकी किती मूल्याच्या फंड रकमेवर १० टक्के कर आकारला जाईल तसेच, संबंधित गुंतवणूकदाराला या व्यतिरिक्त कर (प्राप्तिकर) देय असेल का? अन्य कर देय असल्यास तो कोणता असेल व किती प्रमाणात आकारला जाईल, याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. गीतेश कानडे म्युच्युअल फंडाच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीममधून पैसे काढल्यानंतर झालेल्या नफ्यावर आपणास सरसकट १० टक्के दराने कर भरावा लागेल. निर्देशांकानुसार खरेदीची किंमत वाढवता येणार नाही. ३) वडिलोपार्जित सामायिक जमिनीवर माझे, माझा भाऊ, त्याची पत्नी आणि दोन मुले अशा वारसांची नावे लागली आहेत. त्यावर आणेवारीची नोंद झालेली नाही. ही जमीन सरकारने रस्तारुंदीसाठी संपादित करून १० लाख रुपये भरपाई दिली. ही रक्कम समभागात प्रत्येकाच्या खात्यावर जमा झाली. माझा हिस्सा निम्मा असल्याने पुतण्याने आवश्यक ती अतिरिक्त रक्कम माझ्या खात्यात वर्ग केली. ही सर्व रक्कम सरकारी जाहीरनाम्याप्रमाणे करमुक्त आहे. परंतु मला नंतर मिळालेली रक्कम करमुक्त समजली जाईल की नाही? हा सर्व व्यवहार आरटीजीएसनेच झाला आहे. कृपया मार्गदर्शन करावे. एक वाचक प्राप्तिकर खात्याच्या नियमाप्रमाणे पुतण्याने काकास बक्षीस म्हणून रक्कम दिल्यास त्यावर कर भरण्याची गरज नाही. यासाठी योग्य त्या रकमेचे बक्षीसपत्र बनवून घ्यावे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट