उरणकर वाडीतल्या चार चाळींमध्ये ८० टक्के मराठी कुटुंबं आणि काही गुजराथी कुटुंबं राहतात. ती सर्वच शेजारधर्म जपतात. या वाडीत अनेक चित्रपटांचं शुटींग झालेलं आहे.'मोरया', 'सिंघमरिटर्न्स', 'परिंदे, 'आन' ही त्यापैकी काही.
गिरगावात शंभर वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या ज्या वाड्या आजही टिकून आहेत त्यापैकीच एक म्हणजे उरणकर वाडी . गिरगावात माधवदास प्रेमजी चाळ, बेडेकर सदन वरून सरळ पुढं चालत आलात की तुम्हाला 'उरणकर वाडी' दिसेल. या वाडीत चार चाळी असून १९०० सालापासून त्या उभ्या आहेत असं इथले ज्येष्ठ रहिवासी सांगतात. या वाडीचे मालक उरणकर म्हणून या वाडीचं नाव 'उरणकर वाडी' आहे. आता या वाडीचे मालक गिरीशभाई शहा आहेत.पण वाडी मात्र 'उरणकर वाडी' याच नावानं ओळखली जाते. इथली घरं भाड्याची आहेत. चाळ क्रमांक एक ते चार अशा नावानं या चार चाळी ओळखल्या जातात .
या चाळींची रचना सांगायची झाली तर प्रत्येक चाळ ही तळमजला आणि वर दोन मजले अशा स्वरुपाची आहे. चारही चाळी पूर्णपणे सागवानी लाकडांनी बांधलेल्या आहेत. त्यातल्या जागा मोठ्या आहेत. प्रत्येक जागेचं क्षेत्रफळ हे तीनशे ते साडे तीनशे चौरस फूट आहे. सर्वच खोल्यांमध्ये जमीन आणि सिलिंग यात खूप अंतर आहे.
इथल्या प्रत्येक मजल्यावर आठ कुटुंबं राहतात. त्यानुसार चार चाळी मिळून चौऱ्याऐंशी कुटुंबांच वास्तव्य आहे. या वाडीत असलेलं मोठं पटांगण हा या वाडीचा महत्वाचा फायदा म्हणता येईल. त्यामुळे या पटांगणात क्रिकेट, व्हॉलिबॉल , हुतुतू आदी खेळांचे सामने रंगतात. या वाडीत एक विहीर आणि वडाचं झाडही आहे. त्यामुळे वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा होतो.
एकत्र कुटुंब पद्धती हा या चाळीचं खास वैशिष्ट्यं. कित्येक कुटुंबं तीन-तीन पिढ्यांपासून या वाडीत वास्तव्य करत आहेत. बेळगाव आंदोलनात सहभागी असणारे एम. आर. सप्रे, महेंद्र उद्योग समूहाचे एमडी मोहन
गादीकर हे याच वाडीत निवास करायचे. श्री सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर,लालबागचा राजा,शिर्डीचे साईबाबा, यासह दरवर्षी तीस ते पस्तीस मंडळांसाठी देव-देवतांचे दागिने घडवणारे नाना वेदक हे याच वाडीचे रहिवासी आहेत .
उरणकर वाडीत अनेक चित्रपटांचं शुटींग झालेलं आहे. 'मोरया','सिंघमरिटर्न्स','परिंदे , 'आन' ही त्यापैकी काही. या वाडीत सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आहे. त्याच्या अंतर्गत गणेश उत्सवाप्रमाणेच गोविंदा, नवरात्र, होळी असे सर्व मराठमोळे सण जल्लोशात साजरे केले जातात. या वाडीतल्या श्रीगणेश उत्सवाला नव्वद वर्षं पूर्ण झाली आहेत. कोजागिरी पौर्णिमेचा उत्सवही इथं उत्साहात साजरा होतो. या चाळींनी शेजारधर्म जपला आहे. गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळापासून अनेक कुटुंबं पिढ्या न् पिढ्या गुण्यागोविंदाने राहत आहेत. पूर्वी इथं सर्व मराठी कुटुंबं होती. आजही ८० टक्के मराठी कुटुंबं आणि काही गुजराथी कुटुंबं वाडीत राहतात. विशेष म्हणजे चाळीच्या मराठमोळ्या संस्कृतीत अमराठी माणसंसुद्धा आनंदानं मिसळली आहेत. उरणकर वाडीच्या परिवाराचाच ती सदस्य बनली आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट