आम्ही भुलेश्वर भागांतील एका इमारतीत राहणारे भाडेकरू आहोत. आम्हाला कळले आहे की आमची इमारत दुसऱ्या मालकाने घेतली, मात्र आमच्या जुन्या मालकाने आम्हाला कोणतीही नोटिस दिली नाही. प्रॉपर्टी कार्डावर जुन्या मालकाचेच नाव आहे. आम्ही भाडेकरू संघटना स्थापन केली आहे. कृपया आम्हाला गृहनिर्माण संस्था कशी स्थापन करायची याचे मार्गदर्शन करावे.
- विजय शिंदे
उत्तर
तुम्ही मान्य करता की प्रॉपर्टी कार्ड अद्याप जुन्या घरमालकाच्या नावे आहे. त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही केवळ भाडेकरू आहात आणि त्याचे मालक नाही. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अनुसार गृहनिर्माण संस्थेची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे "२ (१६) नुसार गृहनिर्माण संस्था म्हणजे गृहनिर्माणासाठीचे खुले भूखंड, घरे अथवा फ्लॅट, आणि जर खुले प्लॉट असतील तर मालकीची असलेली त्यावरील घरे अथवा फ्लॅट साठी आपल्या सदस्यांना समान सेवा आणि सुविधा देण्याचे उद्दीष्ट असलेली संस्था होय.
या व्याख्येचा अर्थ असा की केवळ ज्यांनी आधीच भूखंड किंवा त्यावरील घर अथवा फ्लॅट विकत घेतला असेल अथवा सोसायटीने पैसे भरल्यानंतर तो दिलेला असेल तर त्यांना मिळणाऱ्या सुविधा. दुसऱ्या शब्दात केवळ ज्यांनी मालकी तत्वावर विकत घेतलेले असेल तर त्यांनाच सोसायटी स्थापन करण्याचा अधिकार आहे. भाडेकरूला महाराष्ट्र भाडेनियंत्रण करार १९९९ अन्वये संरक्षण प्राप्त आहे म्हणून भाडेकरुला त्या जागेचा मालक मानता येत नाही. वरील कायद्यात आखून दिलेल्या प्रक्रियेनुसार केलेल्या कार्यवाही व्यतिरिक्त त्याला अन्य कोणत्याही मार्गाने घराबाहेर काढता येत नाही. त्याला या मालमत्तेवर कोणताही अधिकार सांगता येत नाही, तो मिळत नाही. त्यामुळे ही बाब स्पष्ट आहे की मालकाच्या परवागीविना सोसायटीची स्थापना करता येणार नाही. तुम्ही स्थापन केलेली भाडेकरूंची संघटना ही केवळ एक नाममात्र औपचारिक संस्था असून त्याला कोणताही कायदेशीर स्थान नाही आणि मालमत्तेवर कोणताही अधिकार नाही.
‘हाऊसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न
‘हाऊसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न पाठवताना आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील इमारतींची संख्या, मजले, सदनिकांची संख्या, सदनिकांचे चटईक्षेत्र, प्रश्नाचे नेमके स्वरूप इत्यादी आवश्यक तो तपशील न चुकता नमूद करावा. मजकूर शक्य तो टाइप केलेला, अन्यथा किमान सुवाच्च हस्ताक्षरांत असावा. पाकिटावर ‘हाऊसिंग सोसायटी सदरासाठी’ असे स्पष्ट लिहावे. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स टॉवर, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाउन्ड, लोअर परळ, मुंबई- ४०० ०१३. आपण आपले प्रश्न mtaskquestions@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट