- स. ज.
> आपले पत्र वाचून थोडे आश्चर्य वाटले. आपण म्हटले आहे, की आपल्या गृह सोसायटीची इमारत ज्या स्वमालकीच्या भूखंडावर उभी आहे, त्या भूखंडाचे क्षेत्रफळ १६.६०.०० आर. चौ. मी. इतके आहे. या हिशेबाने आपल्या भूखंडाचे क्षेत्रफळ १,६६,०००चौ. मी. इतके होते! ३६ कुटुंबांसाठी या इतक्या क्षेत्रफळाची जमीन यावर विश्वास बसणे कठीण आहे. चौरस मीटरऐवजी चौरस फूट म्हणायचे असेल असे वाटते. तरीही तुम्ही दिलेले आकडे असल्याने हे क्षेत्रफळ गृहीत धरणे भाग आहे. आपल्या इमारतीतील रहिवाशांना किमान एक हजार चौरस फुटांची किंवा अधिकही जागा मिळू शकते. पुनर्विकासासाठी होणाऱ्या बांधकामाचा खर्च भागवण्याकरता आपणास काही अधिक सदनिका बांधाव्या लागतील व त्या विकून तुम्हाला पुनर्विकासाचा खर्च भागवता येईल. खरे तर इतक्या मोठ्या जमिनीचे मालक असताना कोणाही बिल्डरच्या भानगडीत आपण पडू नये असा माझा सल्ला आहे. योग्य ते आर्किटेक्ट निवडावेत व कायदेशीर सल्ला घ्यावा व पुनर्विकास करावा. बांधकामाकरता लागणारा खर्च बॅँकेकडून कर्जरूपात मिळेल. अधिकच्या सदनिका विकून कर्ज परस्पर भागवता येईल. आपल्याला आपले घर तर मोफत मिळेलच, पण पुढील देखभालखर्चासाठी भरमसाठ कॉर्पस निधीही मिळेल. हे सर्व करून पुढच्या पिढीकरता भरपूर जमीन शिल्लक राहील. इतक्या मोठ्या जमिनीचे मालक असल्यानंतर आपल्यावरील जबाबदारीही वाढते. त्यामुळे आपल्या घरांच्या पुनर्विकासासाठी जितकी जमीन आवश्यक आहे, तितकीच विकसति करून उर्वरित राखून ठेवावी. काही वर्षांनी पुढील पिढीला त्याचा उपयोग करता येईल. पुनर्विकासास योग्य अशा क्षेत्रफळामध्ये वास्तू उभारून आपणास सध्यापेक्षा किमान दुप्पट आकाराच्या सदनिका मिळू शकतील. देखभालखर्चासाठी कॉर्पस निधीही मिळेल. उत्तम आराखडा व उत्तम दर्जाचे बांधकाम असेल असे पाहा. सावधगिरीने पावले उचला व सोसायटीच्या माध्यमातून स्वयंपुनर्विकास करा. मुंब्ई महानगर विभागात तसेच पुणे महापा लिका विभागात काही प्रमाणात स्वयंपुनर्विकासाची लाट दिसत आहे. नाशिकमध्ये देखील असे बांधकाम करू शकलात, तर आदर्श पुनर्विकासाचा नमूना म्हणून ही योजना इतरांनाही मार्गदर्शक ठरेल. मात्र कामाचा दर्जा उत्तम असावा तसेच आराखडाही उत्तम असावा याची दक्षता घ्यावी. या पुनर्विकासात आपणास कार पार्किंग, स्विमिंग पूल, मुलांसाठी खेळबगीचा तसेच एखादे छोटे मैदान, वयोवृद्धांसाठी विरंगुळा केंद्र, सामुदायिक किचन...ज्याचा लाभ नोकरदार कुटुंबे घेऊ शकतील. अशा सर्व सुविधा निर्माण करता येतील. आपल्या पुनर्विकासास शुभेच्छा.
‘पुनर्विकास’ सदरासाठी प्रश्न
‘पुनर्विकास’ सदरासाठी प्रश्न पाठविताना पुढील तपशील देणे अत्यावश्यक आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ, रस्त्याला लागू आहे किंवा कसे, रस्ता किती रुंद आहे, रहिवासी किती, प्रत्येकाच्या सदनिकेचे चटईक्षेत्र किती, दुकाने वा गाळे किती, अधिकृत की अनधिकृत याबाबत स्पष्टता, मुंबई बेट किंवा उपनगर, जमिनीची मूळ मालकी कोणाची, भाडेपट्टा कोणाच्या नावे, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा कसे, हे स्पष्ट असावे. तरच अचूक मार्गदर्शन मिळू शकेल. अन्य अनावश्यक तपशील मात्र कटाक्षाने वगळावा. प्रश्न शक्य तो टाइप केलेले, किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावेत. पाकिटावर ‘पुनर्विकास सदरासाठी’ असा स्पष्ट उल्लेख न चुकता करावा. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स टॉवर, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाउन्ड, लोअर परळ, मुंबई- ४०० ०१३. आपण आपले प्रश्न mtaskquestions@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट