Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

सोसायटीच्या परवानगीशिवाय बदल नाही

$
0
0

प्रश्नः

ठाणे जिल्ह्यातील एका नगरपालिकेच्या शहरात आमची सहकारी गृहनिर्माण संस्था असून तिचे आठ विभाग (‘विंग्ज’), त्यांत १२१ सदनिका व तीन गाळे (दुकाने) आहेत. प्रश्न असाः आमच्या संस्थेचे पदाधिकारी संस्थेचे हिशेब तपासून अहवाल तयार करून घेण्याकरिता लेखापरीक्षकांना संस्थेच्या कार्यालयात न बोलावता स्वतःच त्या लेखापरीक्षकांच्या कार्यालयात ताळेबंद तपासून घेणे पसंत करतात. हे नियमांना, कायद्याला धरून आहे का? याबाबत नियम काय आहे?

- आर. व्ही. बी.

उत्तरः

कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही ज्यात हिशेब तपासनिसांनी (‘ऑडिटर’) सोसायटीचे हिशेब तपासण्यासाठी त्या सोसायटीच्या कार्यालयातच गेले पाहिजे आणि पदाधिकारी ‘ऑडिटर’च्या कार्यालयात जाऊ शकत नाहीत. हे अधिक चांगले झाले असते, की तुम्ही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनाच हे विचारले असते, की ही पद्धत त्यांनी का अवलंबली. पण पुढे मी असेही सांगू शकतो, की साधारणतः हिशेब तपासनीस हे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कार्यालयांना भेटी देतात, कारण सर्व नोंदी (‘रेकॉर्ड्स’) या तेथेच सांभाळून ठेवलेल्या असतात. तुमच्या सोसायटीचे पदाधिकारीच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील, की ते हिशेब तपासनीसाच्या कार्यालयात का जातात.

प्रश्नः

मुंबईच्या पश्चिम उपनगरात आमची सहकारी गृहनिर्माण संस्था असून इमारत चार विभागांची (‘विंग्ज’), तळमजला + दोन मजले अशी आहे. संस्थेत २७ सदस्य व एकूण ३२ सदनिका (काही सदनिका जोडून आहेत) आहेत. इमारतीतील एका विभागाच्या तळमजल्यावर एका सदस्य डॉक्टरचा दवाखाना सोसायटी स्थापन होण्यापूर्वीपासून आहे. याच डॉक्टर सदस्याने इमारतीच्या दुसऱ्या एका विभागातील तळमजल्यावरील एक सदनिका विकत घेऊन, तीत मोठे फेरबदल करून दुसऱ्या एका डॉक्टरला दिली व याच सदनिकेच्या भागात डॉक्टर सदस्य बसतात. दोन्ही डॉक्टरांचे मोठे फलक सदनिकेवर लावण्यात आलेले आहेत. सोसायटीने सदस्य डॉक्टरांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी ‘दुसरे डॉक्टर माझे नोकर आहेत’ असे लेखी उत्तर दिले. सदस्य डॉक्टर सदनिकेत राहत नाहीत, अन्यत्र राहतात व एका इस्पितळात नोकरी करतात, अशी माहिती आम्हाला मिळाली. ते सोसायटीच्या सर्वसाधारण सभांना कसलीही कारणे न देता गैरहजर राहतात. माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज करून आम्ही बराच पाठपुरावा करून माहिती मिळवल्यानंतर आम्हाला कळाले की डॉक्टर सदस्य महाशयांनी महानगरपालिकेकडे डॉक्टरी व्यवसाय करण्यासाठी परवानगीकरिता अर्ज केलेला नाही व परवानगीशिवायच ते व्यवसाय करीत आहेत. हे प्रकरण change of user या कलमात येते का? संस्थेचे पदाधिकारी व डॉक्टर सदस्य यांचे संगनमत असावे असे वाटते. या बाबतीत कोठे तक्रार, कारवाई करावी?

- रेखा एम. के., पुणे.

उत्तरः

कायदा कोणत्याही व्यक्तीला त्याची संपूर्ण निवासी जागा ही निवासाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामासाठी वापरण्याची परवानगी देत नाही. डॉक्टर किंवा वकील यासारखा व्यावसायिक त्याच्या निवासस्थानाचा एक भाग त्याच्या व्यावसायिक कामासाठी वापरू शकतो जर तो त्याच निवासस्थानात राहत असेल तर. तुमच्या सोसायटीतील प्रकरण हे अगदी स्पष्टपणे ‘चेंज ऑफ युजर’चे आहे आणि निवासी जागेच्या वापरात स्थानिक पालिकेच्या आणि सोसायटीच्या परवानगीशिवाय बदल केला जाऊ शकत नाही. तुम्ही स्थानिक पालिकेकडे तक्रार नोंदवू शकता. तुमची सोसायटीही योग्य त्या न्यायालयात प्रकरण सादर करू शकते. न्यायालयाकडून त्या डॉक्टरला संपूर्ण निवासी जागेचा त्याच्या व्यवसायासाठी वापर करण्यास मनाई करणारा आदेश देण्याची विनंती करू शकते.

‘हाउसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न

‘हाउसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न पाठविताना आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील इमारतींची संख्या, मजले, सदनिकांची संख्या, सदनिकांचे चटईक्षेत्र, प्रश्नाचे नेमके स्वरूप इत्यादी आवश्यक तो तपशील न चुकता नमूद करावा. मजकूर शक्य तो टाइप केलेला, अन्यथा किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावा. पाकिटावर ‘हाउसिंग सोसायटी सदरासाठी’ असे स्पष्ट लिहावे. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स टॉवर, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाउन्ड, लोअर परळ, मुंबई- ४०० ०१३.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>