प्रश्नः
आम्ही मुंबई बेटातील गिरणगावातील एका चाळीचे रहिवासी असून, चाळीचे एकूण चटई क्षेत्रफळ सहा हजार ९०० चौरस मीटर आहे. या जागेवर सहा चाळी असून सार्वजनिक स्वच्छतागृह व नळ आहे. आम्ही एकूण ८२ रहिवासी असून मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत भाडेकरू आहोत. सर्व चाळींतील खोल्या १० X १२ फुटांच्या व मध्ये ओसरी अशा असून या कौलारू बैठ्या चाळी आहेत. चाळींमध्ये १२ फुटांचे अंतर असून एकही दुकान नाही. सर्व रहिवासी गरीब असल्यामुळे, ४-५ भाडेकरू भाडे भरू न शकल्यामुळे महानगरपालिकेने ते राहत असलेल्या खोल्या ताब्यात घेऊन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना भाड्याने दिल्या आहेत. चाळीसमोर २० फुटी रस्ता असून तो जवळच्या मुख्य रस्त्याला जोडलेला आहे. आम्ही भाडेकरूंनी पुनर्विकासासाठी एका विकासकाची नियुक्ती केली. त्यानुसार, महानगरपालिका, रहिवासी व विकासक यांच्यात करार होऊन विकासकाने करारात पुढील गोष्टी मान्य केल्याः १) प्रत्येक रहिवाशाला ५५० चौरस फूट चटईक्षेत्राची सदनिका देण्यात येईल. २) संक्रमण शिबीर चाळीच्या आवारात बांधण्यात येईल. ३) इमारतीच्या देखभालीकरिता अडीच कोटी रु.चा निधी देण्यात येईल. ४) आवश्यक असल्यास सात मजली इमारतीचे तीन विभाग (‘विंग’) बांधण्यात येतील. नंतर बऱ्याच खोल्या विकासकाने विकत घेतल्या व त्याने तीनऐवजी दोनच ‘विंग’ सात मजली बांधल्या.
सदनिका कमी, रहिवासी जास्त, यामुळे विकासकाने रक्कम वाढवून, प्रति सदनिका २५ लाख रुपये देऊ करून खोल्या विकत घेण्याचा प्रयत्न केला, तरीही सदनिका कमी पडल्या. चाव्या वाटपाच्या वेळी स्थानिक आमदार व चाळ कमिटी सदस्यांसमोर विकासकाने सांगितले, ‘जे कोणी सहा रहिवासी थांबण्यास तयार असतील त्यांना माझ्या मुक्त विक्रीच्या टॉवरमध्ये तेवढ्याच क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येतील.’ चाव्या वाटपाच्या समारंभाच्या गोंधळात कोणी सहा जणांनी होकार दिला ते कळले नाही. बाकीच्या लोकांना चाव्या वाटण्यात आल्या. आम्ही सहा भाडेकरू २००६पासून बाहेर असून विकासकाने त्या जागेवर बांधकाम सुरू केलेले नाही. याबाबत माहिती अधिकारात मुंबई महानगरपालिकेकडे विचारणा केली असता काहीही उत्तर मिळाले नाही. ‘चाळ कमिटी’कडे दाद मागण्यास गेलो असता ते म्हणतात, ‘आम्ही तुम्हाला थांबण्यास सांगितले नव्हते.’ सहा वर्षांपासून विकासक आम्हाला २० हजार रुपये भाडे देत आहे. भाडे वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला तर तो म्हणतो, ‘देऊ शकत नाही. तुमची राहण्याची व्यवस्था ट्रान्झिट कॅम्पमध्ये करतो. काय करावे?
-अन्यायग्रस्त चाळ भाडेकरू, मुंबई.
उत्तरः
वास्तविक, मी नेहमी भाडेकरूंना झुकते माप देत असतो. पण, बिल्डरांच्या आहारी गेलेल्या भाडेकरूंच्या बाबतीत सहानुभूती दाखवणे मला तरी शक्य नाही. आपल्या पत्रात अनेक गोष्टी अस्पष्ट आहेत. उदाहरणार्थ, आपण म्हणता की चाव्या वाटपाच्या समारंभाच्या गोंधळात कोणी सहा जणांनी होकार दिला ते कळले नाही. हे विधान पटण्यासारखे नाही. कोणी थांबायचे हे जर कळले नसेल, तर केवळ तुम्हालाच थांबायला का सांगितले गेले? वस्तुस्थिती काही वेगळी दिसते. अशा बाबतीत माझा अनुभव असा आहे, की बिल्डर काही लोकांना अनेक आमिषे दाखवून आपल्या बाजूने करून घेतात आणि विक्रीच्या इमारतीत सदनिका मिळणार म्हणजे दुप्पट फायदा, असे समजून त्या आमिषाला लालची भाडेकरू बळी पडतात. मुंबईत अनेक ठिकाणी असे झाले आहे. आपल्या ठिकाणी काय झाले हे आपल्यालाच ठाऊक. बिल्डरशी हातमिळवणी केलेल्या भाडेकरूंचे इतर भाडेकरूंशी संबंध बिघडतात आणि म्हणूनच बिल्डरधार्जिणे भाडेकरू जेव्हा अडचणीत येतात त्या वेळेला इतर भाडेकरू त्यांना मुळीच मदत करीत नाहीत. हेही आम्ही अनेक ठिकाणी अनुभवले आहे.
आपल्या पत्रात बिल्डरने आपल्याला विक्रीत इमारतीत सदनिका देण्याचे मान्य केल्याचा करारनामा झाल्याचा कुठेही उल्लेख नाही. पण, बिल्डर आपल्याला भाडे देतो असे आपण म्हणता, याचा अर्थ काहीतरी करार झालाच असावा. असा करार जर झाला असेल, तर त्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी त्या बिल्डरवर खटला दाखल केला जाऊ शकतो. यास कायदेशीर भाषेत ‘स्पेसिफिक परफॉर्मन्स’ म्हणतात. पण त्याकरिता आपल्या करारात आपण बिल्डरवर कोणत्या अटी टाकल्या आहेत यावर निकाल अवलंबून राहील. आपण आपल्या पत्रात करार किंवा अटी या बाबतीत कोणताही उल्लेख केलेला नाही. पण, असा करार असल्यास त्याचा नीट अभ्यास करून व कायदेशीर सल्ला घेऊन पुढील वाटचाल करावी.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट