१२० वर्षं जुन्या असणाऱ्या खत्री चाळीचं बांधकाम अजूनही भक्कम आहे. या चाळीच्या बांधकामामध्ये चुना, गूळ आणि काथा यांच्या मिश्रणाचा वापर करण्यात आला होता, असं इथले रहिवासी सांगतात. अस्सल सागवानी लाकडाचा वापरही या चाळीत करण्यात आला आहे. बांधकामातला इतका भक्कमपणा आता दुर्मिळ बनला आहे.
ग्रॅण्टरोड आणि चर्नीरोड दोन्ही रेल्वे स्टेशनपैकी कोणत्याही रेल्वे स्टेशनला उतरलात तरी साधारण दहा मिनिटांत आपण खत्री चाळीत पोहोचतो. इम्पिरिअल नावाचं चित्रपटगृह जिथे आहे, तिथे डाव्या हाताला वळून प्रसिद्ध दोन हत्ती शिल्प दृष्टीस पडतं. त्याच्या बाजूलाच खत्री चाळ नावाची चाळ आहे. ही चाळ १२० वर्षं जुनी आहे. या चाळीची एक कथा आहे.
श्री. साव यांनी ही चाळ बांधली आणि मग आपल्या मुलीच्या लग्नात ती आंदण म्हणून दिली. त्यामुळे श्री. साव यांचे जावई शंभू हे चाळीचे मालक बनले. तळमजला आणि वर दोन मजले अशी मूळ इमारतीची रचना होती. त्यापैकी तळमजला हा प्रामुख्याने व्यावसायिकांचा होता, तर वरचे दोन मजले मराठी कुटुंबांसाठी होते. चाळीचे जिने अजूनही लाकडी आहेत. अस्सल सागवानी लाकूड वापरून ही चाळ बांधली आहे. प्रत्येक खोलीचे क्षेत्रफळ २६० चौ. फूट आहे. या चाळीत प्रत्येक मजल्यावर ११ कुटुंबं राहतात. इथली गॅलरीही प्रशस्त आहे.
या चाळीचं वैशिष्ट्य म्हणजे काही वर्षांनंतर मालकांच्या म्हणजे शंभू कुटुंबियांसाठी चाळीवर तिसरा मजला बांधला. मालकांच्या घरी जाण्यासाठी इथे वेगळे जिने आहेत. बाकीच्या रहिवाशांना जाण्या-येण्यासाठी वेगळा जिना आहे. चाळीचं बांधकाम अजूनही मजबूत आहे. चुना, गूळ आणि काथा यांच्या मिश्रणाचा वापर करून या भिंतींचं बांधकाम करण्यात आलं आहे, असं इथले रहिवासी सांगतात. या चाळीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इथे तळमजल्याला हिंदू महासभेचं कार्यालय होतं. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचंसुद्धा काही काळ या चाळीत वास्तव्य होतं. या चाळीतले प्रसिद्ध रहिवासी म्हणजे गिरगावातल्या श्रीधर भालचंद्र आणि कंपनीचे मालक आणि ‘हिन्दविजय स्टोअर्स’चे मालक लघाटे कुटुंबीय! तळमजल्यावर भावे आणि नाफडे यांची किराणा मालाची दुकानंसुद्धा होती. सुप्रीम कोर्टातले सीनिअर अॅडव्होकेट शेखर नाफडे हेदेखील इथले रहिवासी.
या चाळीजवळ पूर्वी मालकांचा गोठा होता, तसंच चाळीच्या परिसरातच मोठं मैदान होतं. त्या मैदानात क्रिकेटचे सामने आयोजित केले जायचे. पूर्वीपासून असणारी विहीर तिथे आजही आहे. आज या चाळीच्या तळमजल्यावर ऑटोमोबाइल स्पेअर पार्टसची दुकानं आहेत. पूर्वी इथे सार्वजनिक गणेशोत्सवाचं आयोजन होत होतं. हा उत्सव ५० वर्षांपर्यंत चालंला. तसंच श्रीकृष्ण जन्मोत्सवसुद्धा इथे साजरा होत होता. पण आता बरीच मराठी कुटुंबं स्थलांतरित झाली आहेत, तर काही जागा अमराठींनी विकत घेतल्या आहेत. चाळीचं भक्कम सागवानी बांधकाम विशेष लक्षात राहतं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट