Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

निवडणुकीला आव्हान दिले जाऊ शकते

$
0
0

अॅड. राजीव वाघ, ज्येष्ठ वकील

प्रश्नः मी सदस्य असलेल्या मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक फेब्रुवारी २०१५ मध्ये घेण्यात आली, पण निवडणुकीपूर्वी सभासदांची यादी संस्थेच्या सूचना फलकावर लावण्यात आली नव्हती. प्रत्यक्ष निवडणुकीत ६ च सदस्य निवडून आले, पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ११ सदस्य निवडून आल्याचे लेखी जाहीर केले. निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक उपनिबंधक यांनी संगनमताने हा प्रकार केला. या संदर्भात निवडणूक कार्यालय, पुणे यांच्याकडे लेखी तक्रार केली असता निवडणूक प्राधिकरणाने ‘ही निवडणूक बेकायदेशीर आहे, आपण संस्थेवर कारवाई करावी व संस्थेवर प्रशासक नेमण्यात यावा’ असा आदेश दिला. परंतु, उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडून कसलीच कारवाई होत नाही. निवडणूक झाल्यापासून आजतागायत संस्थेची व्यवस्थापकीय समिती बेकायदेशीररीत्या कार्यरत आहे. सहकार खात्याअंतर्गतच आदेशाचे पालन केले जात नाही. याबाबत आम्ही सदस्य आता कोणता मार्ग अवलंबू शकतो?
- व्ही. के. व्ही., मुंबई.

उत्तरः हे उघड आहे की ज्या प्रकारे व्यवस्थापकीय समिती निवडण्यासाठी निवडणूक घेण्यात आली आणि निकाल जाहीर करण्यात आले ते खूपच वादग्रस्त आणि संशयास्पद आहेत. ही निवडणूक रद्द ठरवून नव्याने निवडणूक घेण्याची आवश्यकता आहे. पण, ‘महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज अॅक्ट, १९६०’मधील तरतुदींप्रमाणे व्यवस्थापकीय समिती किंवा तिच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीला आव्हान द्यावयाचे असल्यास ते उपनिबंधक, सहकारी संस्था, यांच्याकडे नेण्याची गरज नाही. या कायद्याच्या कलम ९१ अन्वये, ‘सोसायटी’ व तिचे सदस्य यांच्यातील व्यवस्थापकीय समिती व पदाधिकारी यांच्या निवडणुकीबाबतचा विवाद हा सहकार न्यायालयात सादर केला जाऊ शकतो. मी असे सुचवीन की तुम्ही याबाबत सक्षम वकिलाचा सल्ला घ्यावा व निवडणुकीला आव्हान द्यावे.
प्रश्नः पालघर जिल्ह्यातील आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची इमारत जुनी असून, इमारतीच्या परिसरात वाहने ठेवण्यासाठी तयार केलेल्या पार्किंगच्या जागा नाहीत. इमारतीच्या आवारात असलेल्या मोकळ्या जागेत काही सदस्य त्यांच्या दोन, काहीजण तीन चारचाकी मोटारी ठेवतात. आता ‘सोसायटी’चे पदाधिकारी पार्किंगसाठी खास व्यवस्था करू इच्छित आहेत व त्याचा खर्च ‘सोसायटी’कडून केला जाऊन तो सर्व सभासदांकडून वसूल केला जाणार आहे. पार्किंगसाठी अशी खास व्यवस्था केल्यास इमारतीभोवती मोकळी जागा राहणार नाही. केवळ काही मोटारधारक सदस्यांच्या सोयीसाठी अन्य सदस्यांना असा खर्च सोसावा लागणे कायद्याला धरून आहे का?
- एक ‘मटा’ वाचक.

उत्तरः पुरेशा तपशिलाअभावी तुमच्या प्रश्नाचे नेमके उत्तर देणे शक्य नाही. तुमच्या ‘सोसायटी’मध्ये किती सदस्य आहेत? वाहने ठेवण्याच्या किती जागा निर्माण केल्या जाणार आहेत? सदस्यांना पार्किंगच्या जागा उपलब्ध करून देणे हे निश्चितच हाउसिंग सोसायटीचे काम आहे आणि त्यासाठी पैसे खर्च करण्याचा ‘सोसायटी’ला अधिकार असतो. शिवाय, उपविधींप्रमाणे सर्व सदस्यांना (केवळ मोजक्याच सदस्यांना नव्हे) पार्किंगच्या जागा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत. जेव्हा एखादा सदस्य कार विकत घेतो तेव्हा तो पार्किंगची जागा मिळण्यासाठी ‘सोसायटी’कडे मागणी करू शकतो. पार्किंगच्या जागा अपुऱ्या असतील तर जागांचे वितरण सोडत काढून केले जाऊ शकते.
# # #

‘हाउसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न
‘हाउसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न पाठविताना आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील इमारतींची संख्या, मजले, सदनिकांची संख्या, सदनिकांचे चटईक्षेत्र, प्रश्नाचे नेमके स्वरूप इत्यादी आवश्यक तो तपशील न चुकता नमूद करावा. मजकूर शक्य तो टाइप केलेला, अन्यथा किमान सुवाच्य हस्ताक्षरांत असावा. पाकिटावर ‘हाउसिंग सोसायटी सदरासाठी’ असे स्पष्ट लिहावे. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स टॉवर, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाउन्ड, लोअर परळ, मुंबई- ४०० ०१३.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>