या कामात कार्गो टर्मिनल इमारत, दोन समांतर (३७०० मी.लांब व ६० मी. रूंद) धावपट्ट्या, टॅक्सीचं एप्रन क्षेत्र, देखभाल क्षेत्र, कार पार्किंग, वीजपु्रवठा केंद्र, जलशुद्धीकरण केंद्र, विमानतळाला जोडून दोन मुख्य रस्ते असणार आहेत. हा विमानतळ प्रकल्प २०३० पर्यंत ४ टप्प्यांमध्ये पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यात ४ टप्प्याने अनुक्रमे १०, २५, ४५, ६० दशलक्ष प्रवासी क्षमतेची असतील. पहिला टप्पा पहिल्या अंदाजाप्रमाणे २०१६ मध्ये सुरू होऊन २०१९ मध्ये पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व परवानग्या (फक्त वनप्रदेशाची २५० हेक्टर सोडून) मिळाल्या आहेत.
या प्रकल्पामुळे १ लाख ४२ हजार प्रत्यक्ष तर २ लाख अप्रत्यक्ष नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. प्रतीक्षा यादीत चार विकासकांची नावं पुढे आली आहेत. ती अशी- जीव्हीके, जीएमआर, हिरानंदानी कन्झॉर्टियम, टाटा कन्झॉर्टियम.
विमानतळाच्या कामासाठी विकासक नेमण्यापूर्वीची काही कामं बाकी आहेत. त्यात उच्च दाबाच्या विजेच्या वाहिन्या हटवणं, उलवे टेकडी (९८ मी उंच व ३.५ किमी लांब) तोडणं, जमीन सपाट करणं, नद्याचे प्रवाह वळवणं, नाश होणाऱ्या खारफुटी अन्यत्र लावणं, जास्त मोबदला मागणाऱ्या जमीन मालकांचं समाधान करणं आदी कामांचा समावेश आहे.
पर्यावरणतज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे मोठा राखीव वन्यप्रदेश (१४१ हेक्टर) आणि खारफुटी क्षेत्र (१०८ हेक्टर) बाधित होईल. उर्वरित जमीन पाणथळींची आहे. त्यामुळे जे चेन्नईमध्ये घडलं ते विमानतळ परिसरात घडण्याची शक्यता आहे. किनारा नियमन विभागात ही पाणथळ क्षेत्रं मोडतात. सिडकोने प्रकल्प जमिनीमध्ये २२५४९ हेक्टर जमीन वन्यप्रदेश दाखवला आहे. वन्यप्रदेश खात्याच्या मंत्र्यांनी पुष्पक नगरची परवानगी नाकारली आहे. तिथे विमानतळ बांधू नये असं तज्ज्ञांनी मत नोंदवलं आहे. कारण हा एक पर्यावरणीय अनर्थ होईल. पर्यायी ठिकाणं कल्याण वा मांडवा इथे शोधण्याची गरज सांगितली आहे.
मुंबई क्षेत्रात विमानतळाची क्षमता वाढवण्याकरता काय करायला हवं?
> मुंबई विमानतळाभोवती सुमारे ९०,००० झोपड्या पसरल्या आहेत. त्यामुळे मुंबईतल्या विमानतळाच्या क्षमता वाढू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे देशातल्या हवाई वाहतुकीसाठी कल्याणला विमानतळ बांधावं आणि मुंबईच्या टी-१ आणि टी-२ मध्ये बदल करावेत.
> 'मायल'नी ३ वर्षांपूर्वी बांधलेला नवीन मनोरा दुसऱ्या जागी फिरवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे जेणेकरून टी-१ला टी-२ मध्ये परिवर्तित करून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीसाठी तो वापरता येईल.
> भविष्यात म्हणजे २०३० मध्ये मुंबई ४० दशलक्ष प्रवासी + नवी मुंबईचा विमानतळ २०३० मध्ये पूर्ण झालं असं धरलं तर ६० दशलक्ष प्रवासी मिळून मुंबईची प्रवासी वाहतूक क्षमता १०० दशलक्ष होईल.
> दिल्लीचा टी-३ २०३० मध्ये पूर्ण झाल्यावर आणखी १०० दशलक्ष प्रवासी क्षमतेत भर पडेल.
> दुबई विमानतळाची २०२७ मध्ये १६० ते २६० दशलक्ष प्रवासी क्षमता होईल.
- अच्युत राईलकर
(लेखक ज्येष्ठ अभियंते असून त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जलविभागात काम केलेलं आहे.)
mtartnedit@timesgroup.com
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट