नवीन घर घ्यायचं असेल तर रिअल इस्टेट एजंटला गाठायचं. मग तो घरी येणार. नेमकं कसं घर हवं आहे याची आपल्याकडून माहिती घेणार. त्यानंतर जो घर विकणार आहे त्याची वेळ घेणार आणि ते घर दाखवणार... ही कसरत घर ग्राहकांना काही नवीन नाही. परंतु दिवसेंदिवस वाढत असलेल्या इंटरनेटच्या प्रभावामुळे हे चित्र बदलत आहे. आपलं स्वप्नातलं घर शोधणं आता सोपं झालं आहे. इंटरनेटमुळे घर विकत घेण्यापासून ते विकण्यापर्यंत तसंच लिव्ह-लायसन्सपासून अगदी भाड्याने घर देण्यापर्यंतचे सर्व पर्याय कोणत्याही 'मिडल मॅन'शिवाय घर ग्राहकांना खुले झाले आहेत. कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणं विकत घेण्याबरोबरच घर आणि इतर प्रॉपर्टीज घेण्यासाठीदेखील ई-कॉमर्स हे एक चांगलं व्यासपीठ बनलं असून याचा परिणाम रिअल इस्टेट मार्केटवर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
ऑनलाईन प्रॉपर्टी शोधणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढली आहे. हे प्रमाण गेल्या तीन तिमाहीत २० टक्क्यांनी वाढले आहे. असं असलं तरी जेव्हा अंतिम व्यवहार करायची वेळ येते तेव्हा मात्र ग्राहक प्रत्यक्ष भेटीगाठी करूनच व्यवहार पूर्ण करण्यास पसंती देतात. त्यामुळे घर विकत घेण्याची प्रक्रिया अजून तरी ऑफलाइनच आहे.
प्रॉपर्टी वेबसाइट्सवर बिल्डर्स, विकासक तसंच त्यांचे चालू आणि येऊ घातलेले प्रकल्प याविषयी सविस्तर माहिती दिलेली असते. या व्यतिरिक्त घरबसल्या ग्राहकांना सॅम्पल फ्लॅटदेखील बघता येतो. म्हणूनच ऑनलाइन प्रॉपर्टी बघणं हा उत्तम पर्याय ठरतो. तसेच तो सोयीचा असल्याने ग्राहकांकडून निवडला जातो. अनिवासी भारतीय किंवा ज्यांना राज्यात दुसऱ्या ठिकाणी अथवा परराज्यांत घर घ्यायचं आहे अशांमध्ये खासकरून हा पर्याय अधिक लोकप्रिय झाला आहे.
नुकतंच पुण्यात घर घेतलेल्या शैलजा मादुस्कर सांगतात,
'मला पुण्यात घर घ्यायचं होतं. पण दर वीकएण्डला मुंबईहून पुण्याला येऊन इस्टेट एजंट्सना भेटणं आणि प्रकल्पांना भेटी देणं मला शक्य नव्हतं. अशावेळी ऑनलाइन प्रॉपर्टी पोर्टल्सचा खूप फायदा झाला. वेगवेगळ्या डेव्हलर्पसचे तीन रेडी प्रोजेक्ट निवडून त्याची यादी बनवली. केवळ दोनदा पुण्यात येऊन घर विकत घेतलं आणि त्याचं रजिस्ट्रेशनही पूर्ण केलं. महत्त्वाचं म्हणजे यात मला कोणाला कमिशनदेखील द्यावं लागलं नाही.'
रिअल इस्टेट क्षेत्रामधल्या तज्ज्ञांनुसार साधारणत: ३० ते ४५ वयोगटातल्या लोकांकडून इंटरनेटवर प्रॉपर्टीज बघितल्या जातात.
दिवसेंदिवस इंटरनेट आणि ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढणारा प्रभाव लक्षात घेता येणाऱ्या काही वर्षांत प्रॉपर्टीची विक्री ऑनलाइन होण्याचं प्रमाण ३० टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा विकासक बाळगून आहेत. एका आघाडीच्या विकासकाने सुमारे ४०० कोटी रुपये मूल्याची ७०० पेक्षा जास्त घरं ऑनलाइन विकली आहेत तर आणखी एका विकासकाने इंटरनेटवर दर दोन दिवसाला एक याप्रमाणे घरं विकल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
प्रॉपर्टीविषयी चौकशी करणाऱ्या लोकांचं प्रमाण निश्चितच वाढले आहे, ही इंडस्ट्रीसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. ग्राहकांना आपल्या अवतीभवती चालू असलेल्या प्रकल्पांविषयी कल्पना येते. तसंच ऑनलाइन प्रॉपर्टी पोर्टल्सवर उपलब्ध करून दिलेली माहिती ग्राहकांच्या घर विकत घेण्याच्या निर्णयात महत्त्वाची भूमिका पार पाडते. तसंच प्रॉपर्टी पोर्टल्सवर लिहिलेली परीक्षणं वाचूनदेखील ग्राहक सहज निर्णय घेऊ शकतात. याशिवाय चौकशीसाठी कंपनीच्या सेल्स टीमशीदेखील ऑनलाइन संवाद साधता येतो. ज्यांना फक्त चौकशी करण्यासाठी प्रकल्पाला भेट देणं शक्य नसेल त्यांच्यासाठी ऑनलाइन प्रॉपर्टी पोर्टल्स अतिशय फायदेशीर आहेत.
इंटरनेटच्या माध्यमातून विकासकांनी ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी अर्थातच एक नवीन मार्ग शोधला आहे. आताच्या काळात विकासक इंटरनेटकडे प्रभावी माध्यम म्हणून पाहतात. अलिकडेच झालेल्या परीक्षणानुसार गेल्या काही वर्षांत घर आणि प्रॉपर्टीसंबधित सुमारे ४३ कोटी डॉलरचे आर्थिक व्यवहार हे इंटरनेटवरून शोधलेल्या घरांच्या आधारे झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकट्या भारतात सुमारे ८० लाख लोक इंटरनेटवर रिअल इस्टेटबद्दल माहिती बघतात.
सोयीस्कर असलं तरी जोखीमही तितकीच!
घर किंवा इतर प्रॉपर्टी ऑनलाइन विकत घेणं ग्राहकांच्या दृष्टीने सोयीस्कर असलं तरी जोखमीचं आहे. अनेकवेळा प्रॉपर्टी वेबसाइट्सवर टाकलेले फोटो आणि प्रत्यक्षात असलेली प्रॉपर्टीची स्थिती यात मोठी तफावत आढळते. आपण घर विकत घेण्यासाठी आयुष्यभराची पुंजी गुंतवतो. त्यामुळेच या क्षेत्रातली जाणकार मंडळी प्रत्यक्ष प्रॉपर्टी साइट पाहूनच अंतिम निर्णय घेण्याचा सल्ला देतात. कारण प्रश्न शेवटी आयुष्यभर कष्ट करून कमवलेल्या पैशाचा असतो. इंटरनेटच्या वाढत असलेल्या प्रभावामुळे प्रॉपर्टी एजंटच्या व्यवसायाला मात्र घरघर लागली आहे. असं असलं तरी देखील प्रॉपर्टी आणि एकूणच रिअल इस्टेट मार्केटसाठी इंटरनेट आता झपाट्याने वाढणारं माध्यम बनलं आहे, हे नाकारून चालणार नाही.
- टीम टाइम्स प्रॉपर्टी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट