- टीम टाइम्स प्रॉपर्टी
मुळशीत एकीकडे ताम्हिणी घाटाद्वारे थेट कोकणाचं दार उघडलं आणि दुसरीकडे कात्रज-देहूरोड बायपासमुळे पिरंगुट परिसर पुणेकरांच्या आणखी जवळ आला. सध्या इथे प्रचंड प्रमाणात औद्योगिक विकास झाला असून, हॉलिडे होम्ससह नियमित राहण्यासाठीही घरांची मागणी वाढू लागली आहे.
सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेला आणि ताम्हिणीमार्गे पुणेकरांना थेट कोकणाच्या उंबरठ्यावर आणून ठेवणाऱ्या मुळशी तालुक्याचा वेगाने विकास झाला नसता, तरच नवल. या मुळशी तालुक्यातल्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पिरंगुट परिसराला आता विकासाचं नवं केंद्र म्हणून नवी ओळख लाभली आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचं वरदान लाभलेल्या तालुक्यांमध्ये मुळशीचा समावेश होतो. प्रचंड पाऊस आणि निसर्गरम्य वातावरणामुळे पावसाळी पर्यटकांचं हे अल्पावधीतच आवडतं डेस्टिनेशन ठरलं. ताम्हिणीत ठिकठिकाणी उतरलेले ढग, कडेकपारीतून कोसळणारे शेकडो धबधबे, 'लवासा'सारखी लेक सिटी, टेमघर धरणाचा रम्य परिसर अशी अनेक पर्यटनस्थळं इथे विकसित झाली आहेत. तसंच इथून थेट सहारा सिटी-लोणावळ्याकडेही जाता येतं. अशा रमणीय परिसरात टुमदार फार्म हाऊस बांधण्याची क्रेझ पूर्वीपासून असल्याने अनेक मोक्याच्या ठिकाणी फार्म हाऊस उभी राहिली आहेत. त्यांचा उपयोग प्रामुख्याने हॉलिडे होम्स म्हणून होत असे. मुंबईतल्या अनेक नागरिकांनीही इथल्या प्रॉपर्टींमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. मात्र, कालांतराने याच परिसरात एकीकडे ताम्हिणी घाटाद्वारे थेट कोकणाचं दार उघडलं आणि दुसरीकडे कात्रज देहूरोड बायपासमुळे हा परिसर पुणेकरांच्या आणखी जवळ आला. त्यामुळे इथे प्रचंड प्रमाणात औद्योगिक विकास झाला आणि हॉलिडे होम्ससह नियमित राहण्यासाठीही इथे घरांची मागणी वाढू लागली आहे.
काही काळापूर्वी पिरंगुट परिसरात औद्योगिक नगरीची घोषणा झाली आणि कोकाकोला, किर्लोस्करसारख्या अनेक उद्योगांनी इथे आपले प्लाण्ट्स उभारले. त्यापाठोपाठ अनेक मोठे आणि लघुउद्योगही या परिसरात उभे राहू लागले. त्यानिमित्ताने येथे हजारो कामगारांची वस्ती होऊ लागली, तसंच वेगवेगळे उद्योग-व्यवसायही या परिसरात भरभराटीला आले. त्यामुळे एक नवी अर्थव्यवस्थाच इथे उभी राहिली आहे.
त्यानंतर या परिसराच्या विकासाचा एक नवा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा टप्पा जवळ आला, तो हिंजवडी आणि परिसरातल्या आयटी उद्योगांच्या भरभराटीमुळे. हिंजवडीतील आयटी पार्कमुळे बाणेर, बालेवाडी, पाषाण, बावधन तसंच पिंपरी-चिंचवडमधल्या लगतच्या परिसराचा चेहरामोहराच पालटून टाकला. या परिसरात अक्षरशः हजारो इमारती उभ्या राहिल्या. आता हा विकास पिरंगुटच्या दिशेने सरकला आहे. हिंजवडीपासून पिरंगुट अत्यंत जवळचे ठिकाण असल्याने हिंजवडीतल्या उद्योगांमधल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी हा परिसर निवासाचे नवे डेस्टिनेशन ठरला आहे. त्यामुळेच गेल्या काही काळात शहरातल्या आघाडीच्या बांधकाम कंपन्यांनी या विकासाच्या वाढत्या वेगाचा अंदाज घेऊन या परिसरात टाऊनशिप उभारण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत.
गेल्या काही काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात रेसिडेन्शियल झोन झाला आहे. त्यामुळे आगामी काळात इथे मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध होतील. त्यामध्ये अल्प उत्पन्न आणि मध्यमवर्गीयांसाठी परवडणाऱ्या घरांसह आयटीतल्या कर्मचाऱ्यांसाठी लक्झरी हाऊसचाही समावेश आहे.
पिरंगुट वेगवेगळ्या रस्त्यांनी जोडलं गेल्यामुळे या परिसराचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. मुंबई-सातारा-कोल्हापूर आणि बंगळुरू हायवेवरच्या कात्रज-देहूरोड बायपासपासून पिरंगुट हे काही किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या सर्व शहरांतून पिरंगुटला सहजपणे पोहोचणं शक्य आहे. तिथून पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेलाही काही वेळातच पोहोचता येतं. तसंच, ताम्हिणीमार्गेही मुंबई आणि कोकणातल्या नागरिकांना पिरंगुटला सहज येणं शक्य झालं आहे. पुणेकरांना तर कोथरूड-चांदणी चौकातून काही वेळातच पिरंगुटला जाता येतं. पिरंगुटमार्गे मुंबई-गोवा हायवेवरच्या माणगावकडे जाणारा रस्ता चार मार्गिकांचा करण्याचा प्रस्ताव आहे. त्याप्रमाणेच चांदणी चौकातही फ्लायओव्हर उभारण्याचं नियोजन पुणे महापालिकेने केलं आहे. यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे पुणे शहराच्या आसपास काढण्यात येणारा नियोजित रिंगरोड पिरंगुटच्या परिसरातूनच जाणार आहे. त्यामुळे हा परिसर अधिक जवळ येणार असून, पूर्वीचं गाव काही काळातच पुण्याचं उपनगर ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून इथे पीएमपीनेही नियमित बससेवा उपलब्ध करून दिली आहे. तसंच चांदणी चौकामार्गे किंवा बावधनमार्गे इथे अर्ध्या तासात पोहोचता येतं. या परिसराच्या विकासाचा एक नवा आयाम आता समोर येत आहे. पूर्वीच्या ग्रामपंचायतीबरोबरच आता या विकासाला पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) हातभार लाभणार आहे. त्यामुळे या भागात विकास आणि नागरी सुविधांचे अनेक प्रकल्प उभे राहणार आहेत. मुळातच पावसाचं वरदान लाभल्याने या परिसरात पाण्याची कमतरता नव्हती, त्यातच वाढत्या लोकवस्तीचा विचार करून आता या परिसरात मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून बारमाही भरपूर पाण्याचीही व्यवस्था उपलब्ध झाली आहे. या सर्व सोयीसुविधांमुळे येत्या काही काळात पिरंगुट हे पुण्याच्या पश्चिमेकडचे उपनगर म्हणून उदयास येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट