Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

हेरिटेज खोताची वाडी

$
0
0

- गणेश आचवल

एखाद्या वाडीमध्ये चार ठिकाणाहून प्रवेश करता येतो, हे कळल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही आश्चर्यकारक वाडी म्हणजे गिरगावातली 'खोताची वाडी'. १५० हून अधिक वर्षांचा इतिहास या वाडीला आहे. वाडीच्या चार प्रवेशमार्गांपैकी एक गिरगावातल्या 'मॅजेस्टिक' समोरून आहे, दुसरा गिरगावातल्या जैन क्लिनिक इथून, तिसरा प्रार्थना समाज इथून तर चौथा गिरगावातल्या अमृत वाडी इथून आहे. नवखा माणूस इथे आत शिरला की हमखास गोंधळतो आणि या भूल भुलय्यामध्ये अडकतो. नेमकं बाहेर कुठून पडायचं हेच त्याला कळत नाही.

खोताच्या वाडीचे मूळ मालक दादोबा वामन खोत. त्यांनी १८ व्या शतकात ही जमीन विकत घेतली. इथल्या जागा त्यांनी ईस्ट इंडियन लोकांना विकल्या, असं सांगितलं जातं. त्यामुळे खोताच्या वाडीतल्या घरांमध्ये वैविध्य आढळतं.

'मॅजेस्टिक'समोरच्या प्रवेशमार्गाने आत गेल्यास अनेक बंगले दृष्टीस पडतात. या बंगल्यांच्या बांधकामावर इंडो-पोर्तुगीज शैलीचा प्रभाव जाणवतो. हे बंगले प्रामुख्याने ख्रिश्चन आणि कॅथलिक लोकांचे आहेत. इथे एक चॅपल (छोटे चर्च) आहे. या संदर्भात असं सांगतात की जेव्हा १८व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईत प्लेगची साथ आली होती तेव्हा त्यातून सर्वांचं रक्षण व्हावं, अशी प्रार्थना केली गेली. ती प्रार्थना फळाला आल्याने हे चॅपल बांधण्यात आलं. इथे येताच तुम्हाला गोव्यात आल्यासारखं वाटतं.

'परेरा हाऊस' हा खोताच्या वाडीतला बंगला एक. प्रसिद्ध फॅशन डिझायनर जेम्स परेरा इथे राहतात आणि हा बंगला अनेक जाहिराती आणि चित्रपटांच्या शूटिंगसाठी वापरला जातो. १८९४ मध्ये इथे स्थापन झालेला 'गिरगाव कॅथलिक क्लब' आजही अस्तित्वात आहे.

पूर्वी 'खोताच्या वाडी'त ६५ बंगले होते, असंही म्हणतात. आता मात्र या बंगल्यांची संख्या २० पर्यंत आली आहे. बंगल्यांची जागी आता मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. या वाडीची आणखी एक खासियत म्हणजे इथे ख्रिश्चन आणि मराठी अशा दोन संस्कृतींचं दर्शन घडतं.

'खोताच्या वाडी'ने ग्लॅमरचाही भरपूर आनंद घेतला आहे. 'मुंबईचा जावई', 'सगळीकडे बोंबाबोंब' या चित्रपटाचं तसंच 'बेरीज वजाबाकी' या सीरिअलचं शूटिंगही इथे झालं होतं. इथल्या इमारतींची रचना तळमजला अधिक तीन मजले अशी आहे. काही चाळी या तळमजला आणि वर एक किंवा दोन मजले अशा स्वरूपाच्या आहेत. 'खोताची वाडी' आणि खडपे यांचं 'अनंताश्रम' हे समीकरणच बनलं होतं. गिरगावात साहित्य संघात नाटकाचा प्रयोग झाला की कलाकार इथे जेवायला यायचे. प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनेसुद्धा एका मुलाखतीत आवडतं हॉटेल म्हणून 'अनंताश्रम'चा उल्लेख केला होता. वि.आ.बुवा यांच्या एका पुस्तकातसुद्धा 'अनंताश्रम'चा उल्लेख आहे. तसंच या वाडीतली 'शानबाग खानावळ'देखील प्रसिद्ध होती. पण आता या दोन्ही गोष्टी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.

मुंबई बाहेरचे कलावंत मुंबईत शूटिंगसाठी आले किंवा नाटकासाठी आले की वाडीतल्या 'गिरगाव लॉज'मध्ये राहायला असायचे. खोताच्या वाडीतले 'आयडिअल वेफर्स' प्रसिद्ध आहे. पूर्वी याच वाडीतली सर नारायण चंदावरकर प्राथमिक शाळा खूप प्रसिद्ध होती. पहिली ते चौथी अशा इयत्तांचे वर्ग तिथे भरायचे. 'खोताची वाडी'ला हेरिटेज दर्जा प्राप्त झाल्याने इथे अनेक परदेशी पर्यटकांची वर्दळ असते. इथले बंगले 'अ' दर्जात येतात, तर बाकीची वाडी 'ब' दर्जाच्या हेरिटेजमध्ये येते. 'ब' दर्जाच्या हेरिटेजमध्ये आल्याने इथला पुनर्विकास होऊ शकतो. पण इथे सात मजल्यांपेक्षा जास्त उंच इमारत बांधली जाऊ शकत नाही .या वाडीतली लोकवस्ती १,८०० ते २,००० आहे .

ख्रिश्चन आणि मराठी संस्कृतीचा संगम असणारी ही खोताची वाडी दोन्ही परंपरा टिकवून आहे हे नक्की.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>