उत्तरः आपण पाच विकासकांना निवडण्यासंबंधीचा इतिहास नीट मांडलात, पण त्या पाचपैकी एक विकासक निवडला की कसे, याविषयी माहिती दिलेली नाही. असा विकासक निवडून त्याच्याशी करार झाला का? याविषयीही माहिती नाही. तुम्ही जर एक विकासक निवडला नसेल किंवा कोणत्याही विकासकाशी करार केला नसेल तर नवीन निविदा मागवणे हाच योग्य मार्ग राहील. नवीन निविदा मागवताना आधी ठरवलेले क्षेत्रफळ देणे बंधनकारक राहील अशी अट त्या निविदेमध्ये टाकावी, जेणेकरून किमान ४० टक्के अधिक क्षेत्रफळ मिळण्याची खात्री होईल व त्यापेक्षा कमी देणाऱ्यांच्या निविदा येणारच नाहीत. हा झाला विकासक नेमलेला नसेल तेव्हाचा मार्ग. आता आपण विकासक नेमलाच असेल व त्याच्याशी करारही केला असेल, मात्र आपल्या पत्रात त्याविषयी उल्लेख केलेला नसेल तर आम्ही आपणास काय उत्तर द्यावे? एका बाजूला पाच विकासकांपर्यंतची आपली वाटचाल कायद्याला धरून असल्याचे वाटते. नंतरच्या भागात मात्र ४० टक्के अधिक चटईक्षेत्र कोणी देऊ केले आणि ते २० टक्क्यांपर्यत खाली कोणी आणले याविषयी आपल्या पत्रात स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे करार झाला असेल तर तो कसा झाला, त्यातील तरतुदी काय, या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करूनच पुढील निर्णय घेणे आवश्यक आहे. एरवी, बँकांकडून कर्ज घेऊन पुनर्विकासाची सुरूवात केल्यास ५० टक्क्यांपर्यंतही अधिक जागा मिळू शकेल. मात्र हा मार्ग घ्यावा किंवा कसे हा निर्णय सर्वसाधारण सभेत घ्यावा लागेल. बिल्डरधार्जिणा पुनर्विकास आणि स्वयं पुनर्विकास यातील फायदेतोटे नीट समजूनच निर्णय घेतला तर तो सर्व सभासदांच्या हिताचा राहील.
( या सदरातील उत्तरे ही प्रश्नकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिलेली असतात. संबंधितांनी कोणतीही कृति करण्यापूर्वी आपल्या वकिलाचा सल्ला घ्यावा.)
पुनर्विकासः प्रश्नकर्त्यांना सूचना 'पुनर्विकास' सदराकरिता प्रश्न पाठविताना पुढील तपशील देणे अत्यावयक आहेः भूखंडाचे क्षेत्रफळ, रस्त्याला लागून आहे किंवा कसे, रस्ता किती रुंद आहे, रहिवासी किती, प्रत्येकाच्या सदनिकेचे चटईक्षेत्र किती, दुकाने वा गाळे किती, अधिकृत किंवा अनधिकृत याबाबत स्पष्टता, मुंबई बेट किंवा उपनगर, जमिनीची मूळ मालकी कोणाची, भाडेपट्टा कोणाच्या नावे, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहे किंवा कसे, हे स्पष्ट असावे. तरच अचूक मार्गदर्शन मिळू शकेल. अन्य अनावश्यक तपशील मात्र कटाक्षाने वगळावा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट