केंद्रीय पर्यावरण विभागाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला ग्रीन सिग्नल दिल्याने आता विमानतळाची निविदा प्रक्रिया पार पाडणं सिडकोला सोपं जाईल.
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंगळवारी हिरवा कंदील दाखवल्याने विमानतळाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. यासंदर्भात सोमवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय पर्यावरण विभागाच्या बैठकीत सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा यांनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाबाबत सादरीकरण केलं होतं. या बैठकीत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली असून मंजुरीचं पत्र येत्या १५ दिवसांत सिडकोला मिळणार आहे. या मंजुरीमुळे विमानतळ उभारणीस आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या सिडकोला प्राप्त झाल्या आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याला तीन वर्षांपूर्वी मंजुरी देताना केंद्रीय पर्यावरण विभागाने खारफुटी उद्यानाची उभारणी, गाढी नदीचा प्रावाह बदलणं, उच्च दाबाच्या वाहिन्या भूमिगत करणं आदींसह जवळपास ३० अटींची पूर्तता करण्यास सिडकोला सांगितलं होतं. त्यानंतरच सिडकोला विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाची मंजुरी मिळणार होती. केंद्रीय पर्यावरण विभागाने सांगितलेल्या अटींची पूर्तता करत विमानतळ प्रकल्पाला केंद्राकडून हिरवा कंदील प्राप्त करून घेण्यास सिडकोला यश आलं आहे.
नवी मुंबईत देशातला पहिला ग्रीनफिल्ड विमानतळ उभं राहणार आहे. यासाठी पनवेल तालुक्यातल्या २२६८ हेक्टर जमीन वापरली जाणार आहे. यात ३५० हेक्टर जमीनीवर खारफुटीचं जंगल आहे. ते अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची अट केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घातली आहे. तसंच गाढी नदीचा प्रवाह बदलताना तो कशा प्रकारे बदलण्यात यावा, याबाबतही मार्गदर्शक तत्वं सिडकोला घालून दिलेली आहेत. याशिवाय पक्षी अभयारण्य, अन्य जैव विविधता यांची जपणूक करण्याचा सल्ला पर्यावरण मंत्रालयाने सिडकोला दिला आहे.
वरील अटींची पूर्तता न झाल्याने विमानतळास तब्बल पाच वर्षं परवानगी मिळत नव्हती. सिडकोने या सर्व अटींची पूर्तता करण्याचं आश्वासन दिल्यानंतर नोव्हेंबर २०१२ रोजी विमानतळाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. त्याचवेळी ही तातुपरती मंजुरी असल्याचं स्पष्ट करून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ३० अटी घातल्या होत्या. या अटींची सिडको कशा प्रकारे पूर्तता करणार आहे, याबाबतचं सादरीकरण करण्यात आल्यानंतरच दुसऱ्या टप्प्याला मंजुरी प्राप्त झाली आहे.
प्री-डेव्हलपमेण्ट वर्क
केंद्रीय पर्यावरण विभागाचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाल्याने सिडकोला आता विमानतळाची निविदा प्रक्रिया पार पाडणं सोयीस्कर होणार आहे. सिडकोच्या दृष्टीने हा मैलाचा दगड असून लवकरच अंतिम निविदाधारकाची निवड करून डिसेंबर २०१६ अखेरीस विमानतळाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. तोपर्यंत सिडकोने प्री-डेव्हलपमेण्ट वर्क अंतर्गत जमीन सपाटीकरण, टेकडीची कटाई आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची कामं सिडको पूर्ण करणार असल्याचं सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा यांनी सांगितलं आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट