घराच्या सजावटीला काय लागतं? सुखी संसाराला काय लागतं असे प्रश्न विचारल्यावर त्या साऱ्यांचं उत्तर 'समाधान' असेल तर... सगळ्यांच्या बाबतीत तसं घडेलच असं नाही पण कवी चंद्रशेखर गोखले आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री उमा गोखले यांच्यासाठी मात्र हे उत्तर नक्कीच लागू पडतं...
खरं सांगायचं तर 'घर' याविषयावर मी कितीही तास बोलू शकतो. कारण ज्या कविता, चारोळ्या मी केल्या त्याची सुरुवात घरातूनच झाली. शेवटी घर, घर म्हणजे तरी काय...
इमारत बनायला वेळ लागत नाही
घर बनायला वेळ लागतो
घरासाठी दोन जीवांचा
खराखुरा मेळ लागतो
इथे राहायला येण्याआधी पवई हिरानंदानीमध्ये म्हाडाच्या घरात राहत होतो. पण तिकडे पाण्याची काहीच सोय नव्हती. १२ ही महिने टँकरच्या पाण्यावर राहावं लागायचं. त्यात उमा गातेही, त्यामुळे तिच्या गळ्यावर त्याचा परिणाम व्हायला लागला. त्यानंतर आम्ही ते घर सोडण्याचा विचार केला. घर शोधत असताना आम्हाला कांदिवलीचा हा परिसर इतका आवडला की पाहताचक्षणी ठरवलं की इथेच घर घ्यायचं ठरवलं.
पावसाळ्यात हा परिसर खूप सुंदर बनतो. मी आणि उमा दोघंही मासेखाऊ आहोत. इथे अनेक ठिकाणी मच्छिबाजार भरतो. इथे घर घेण्यासाठी हे कारण आम्हाला पुरेसं वाटलं. सध्या इथे रिडेव्हलपमेण्टचे वारे वाहू लागलेत. पण दुसरीकडे राहायला जायचं तरी चारकोप सोडून जाणार नाही, एवढे आम्ही या परिसराशी एकरूप झालो आहोत.
माझं बालपण पार्ल्यातलं. तिथे आमचं घर होतं. पण त्या घराची ऊब मला कधी जाणवली नाही. काही माझ्या चुका असतील तर काही आई-वडिलांच्या. त्यामुळेच कदाचित माझ्या कवितांमधून घराबद्दलचा एक ओलावा प्रकर्षाने जाणवतो. लहानपणी न मिळालेल्या घराच्या प्रेमातून असेल कदाचित मला घराच महत्त्व अगदी सुरुवातीपासूनच पटलं. त्यामुळेच अनेक ठिकाणी भाड्याने राहून, अनेकदा बेघर होऊन जेव्हा पवईच्या घराची किल्ली आम्हाला मिळाली तो क्षण मला आजही आठवतो. कित्येक तास मी आणि उमा फक्त भिंतींना टेकून काहीही न बोलता बसलो होतो. ती शांतता भंग करत उमा मला म्हणाली होती, 'गोखले, इथून कोणीही 'ऊठ' म्हणणार नाही'. तो दिवस आम्ही कधीच विसरू शकणार नाही.
घर दोघांचं असतं
ते दोघांनी सावरायचं
एकाने पसरवलं तर
दुसऱ्याने आवरायचं असतं
आम्ही दोघं जगत आलो. उमेदीच्या काळात घरासाठीचे, अनेक चढउतार पाहिले. उमाच्या साथीशिवाय हे शक्यच नव्हतं. संघर्षाच्या काळात ती खंबीरपणे माझ्याबरोबर उभी होती. कधीही मान खाली जाऊ दिली नाही. कर्तृत्ववान बायको मिळाल्याचा मला नेहमीच अभिमान होता आणि आहे.
तुला शांत निजलेली पाहिलं
की मी निवांत होतो मनातल्या मनात
मला वाटतं हीच सुखाची सावली आहे
बाहेरच्या रणरणत्या उन्हात
आमच्या या घराला साथ मिळाली ती उमाच्या आईची. मी, उमा आणि आई. तिघांच्या या घरात तिघं कधीच नसतो. आमच्याकडे पाहुण्यांची वर्दळ खूप असते. घर कसं असावं असा जेव्हा मला कोणी विचारतं तेव्हा मी ते माझ्या घरासारखं असावं असंच सांगतो. कारण आमच्या घरी दोघांचं जेवण बनलेलं असेल आणि अचानक घरी पाहुणे आले तरी पाचजण तृप्त होऊन जेवतील असं अनेकदा घडलं आहे. घर मुळात समाधानी असलं की तुम्हाला आनंदी राहायला फार काही लागत नाही हा माझा एवढ्या वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत जेवढी घरं बदलली ती आम्ही बदलली, कोणीही आम्हाला जा म्हणून सांगितलं नाही. सुखी, समाधानी होतो. या संपूर्ण प्रवासात जिवाला जीव देणारी माणसं भेटली.
अनेकदा उमांच्या मालिकांमध्ये काम करणारी नवीन मुलं आमच्याकडे काही महिने, वर्षं राहून जातात. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं मानधन घेत नाही. फक्त या घरात राहताना हसतखेळत राहणं ही एकच अट असते. मला माणसांत गुंतवणूक करायला जास्त आवडते, जी मी आत्तापर्यंत करत आलो आहे. शिवाय मला सोनंही आवडतं. सोन्याची काही ना काही गोष्ट मी घेत असतो.
तुझी हिशोबाची वही का ठेवलीस?
माझ्या कवितेच्या वहीवर
त्या दोघांना एकत्र बघून
मला दाटून आला गहिवर
अशी माझी अवस्था होते. मी फक्त कविता करतो. सेव्हिंग माझा प्रांत नाही. गुंतवणुकीची सगळी जबाबदारी उमा आणि माझा मेव्हणा सांभाळतात. मासे खाणं, फिरणं, कविता करणं, लोकांचं स्वागत करणं यासारख्या गोष्टी मला जास्त चांगल्या जमतात. महाबळेश्वर आणि पन्हाळ्याला तर आम्ही दोघं वर्षातून चार ते पाच वेळा जातोच. शिवाय एका वृद्धाश्रमातही आम्ही पैसे भरायला सुरुवात केली आहे.
माझं स्वप्नातलं घर गोव्यात केरी (सत्तरी) गावी असेल. नयनरम्य असं ते गाव आहे. तीन बाजूंना डोंगर आणि एका बाजूला नदी यामध्ये वसलेलं हे छोटंसं गाव. शेतीवर उदरनिर्वाह होणाऱ्या याठिकाणी आम्हाला राहायला नक्कीच आवडेल. एखादं घर बांधायचं ठरवलं तर गोव्यातल्या या छोट्या गावीच बांधू हे नक्की.
मी आणि जग यामध्ये
माझ्या घराचा उंबरठा आहे
आणि छतापेक्षा मला
त्याचाच मोठा आधार आहे.
या घराच्या बाबतीत माझ्या काही अशाच भावना आहेत. कारण जो या घरात येतो तो रमतो. लहानपणी ज्या सुखासाठी धडपड चालली होती ती या घरात पूर्ण झाल्याने मला घरात राहण्याचा कधी कंटाळा येत नाही. साथीदाराची सोबत असली की कोणतंही घर बनवणं आणि त्याचं नंदनवन करणं फारसं कठीण नसतं असंच मला वाटतं.
शब्दांकन - मधुरा नेरूरकर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट