टाइम्स वृत्त, नवी दिल्ली गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने तसेच, या पर्यायांतून अधिक परतावा मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत सोनेखरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. मात्र सोनेखरेदीला डिजिटल व्यवहारांनी हात दिला असून सोन्याची ऑनलाइन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा वाढता कल असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, डिजिटल पर्यायामुळे ग्राहकांना कमीत कमी एक रुपयाचे सोनेही खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे. डिजिटल पद्धतीने सोनेविक्री करणारे अनेक पर्याय सध्या बाजारात उपलब्ध असून या माध्यमातून ग्राहकाला एक रुपयांपासून कितीही रुपये किंमतीचे सोने विकत घेता येते. ग्राहकांनी भरलेली ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाते व या रकमेने ३,२०० रुपयांचा आकडा गाठल्यानंतर ग्राहकांना एक ग्रॅम सोने घरपोच मिळते. याविषयी सेफगोल्ड या डिजिटल सोनेविक्री केंद्राचे गौरव माथूर यांनी सांगितले की, 'या सुविधेचा अनेक नागरिक लाभ घेत असून यातील अनेक जण एक रुपयापासून सोनेखरेदी करत आहेत. या व्यवहारात जोखीम नसल्याने हा ट्रेण्ड वाढताना दिसत आहे.' सेफगोल्डने फ्लिपकार्टच्या फोन पे या पेमेंट माध्यमाशी भागीदारी केली असून त्याद्वारे ही सोनेविक्री केली जाते. ३० लाख ग्राहक गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या या सुविधेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असून आतापर्यंत ३० लाख ग्राहकांनी या माध्यमातून सोने विकत घेतले आहे. पुढील वर्षापर्यंत ही ग्राहकसंख्या दीड कोटींपर्यंत वाढेल, असा सेफगोल्डला विश्वास आहे. कठोर नियमांमुळे घट सोनेखरेदीच्या माध्यमातून काळा पैसा जमा होत असल्याने केंद्र सरकारने सोन्याविषयी विशिष्ट नियम लागू केले आहेत. सोन्याची विक्री घटण्यास हे नियमही कारणीभूत ठरले आहेत. भारतातील सोन्याची गरज ही प्रामुख्याने आयातीतून पूर्ण केली जाते. गुंतवणुकीचे अन्य पर्याय व सरकारचे कठोर नियम यामुळे गेल्या वर्षी सोन्याच्या मागणीत तब्बल २३ टक्क्यांनी घट आली. चालू वर्षी सप्टेंबरपर्यंत भारताने ५२४ टन सोनेखरेदी केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट