स्वयंपुनर्विकासाचे अनेक प्रकल्प यशस्वी चंद्रशेखर प्रभू आपल्या स्तंभातून आपण सतत स्वयंपुनर्विकासावर भर देताना आढळता. तुम्ही मुंबई-पुण्यातील स्वयंपुनर्विकासाचे असे एखादे उदाहरण देऊ शकाल का? असा एखादा प्रकल्प पूर्ण झाल्याचे अद्याप माझ्या तरी ऐकण्यात नाही. असे का? कृपया समजावून सांगावे. रा. रा., वरळी हे आपले अज्ञान आहे. संपूर्ण मुंबईची वाढ ही स्वयंपुनर्विकासातूनच झाली आहे. १९१५मध्ये पहिली खासगी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापण्यात आली. त्यांनी जमिनी खरेदी केल्या. वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले. आर्किटेक्ट, काँट्रॅक्टर नेमले आणि इमारती बांधल्या. तेव्हापासून जवळजवळ १९६५पर्यंत बिल्डर नावाची संस्था ही अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे मूळ मुंबईचा विकास हा स्वयंपुनर्वकासातूनच झाला याची आपल्याला आठवण करून द्यावीशी वाटते. १९६५पासून हळुहळू विकासक मजबूत होत गेले. सुरुवातीला त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना निवडणुकीत आर्थिक मदत केली. कालांतराने राजकीय पुढाऱ्यांकडे भ्रष्टाचारातून जमा झालेली माया विकासकाकडे गुंतवणूक म्हणून देण्याची प्रथा सुरू झाली. त्यातून पुढारी, विकासक आणि अधिकारी यांची अभद्र युती झाली. काही काळाने पुढाऱ्यांना लक्षात आले, की आपल्यामुळे बिल्डर मोठे झाले, त्यामुळे पुढारी बिल्डरांचे भागीदार झाले व नफ्याचे वाटेकरीही झाले. काही काळाने पुढाऱ्यांना वाटले, की आपल्या पैशाने बिल्डर मोठा होतो, पण नफ्यातला केवळ अमुक वाटाच मिळतोय. त्यामुळे पुढाऱ्यांनीच बिल्डर म्हणून उडी टाकली. आपल्या नातेवाईकांना बिल्डरच्या कंपनीत संचालक करावे ही अट टाकण्यात आली. हे पाहिल्यावर बिल्डर सावध झाले. त्यांना वाटले, की पुढारीच जर बिल्डर झाले तर आपला धंदा कसा चालेल... आणि मग बिल्डरच पुढारी झाले. वेगवेगळ्या बिल्डरांनी वेगवेगळ्या पक्षांत प्रवेश केला आणि त्या पक्षातून निवडणुका लढण्यासाठी तिकीटे विकत घेतली. आज अनेक पक्षांचे लोकप्रतिनिधी हे बिल्डरच आहेत. विविध पक्षांतले बिल्डर हे एकमेकांच्या संपर्कातच असतात.. इतकेच नव्हे, तर ते एकत्रित कारवायाही करत असतात. विक्रीचा दर भरमसाट वाढवणे, खरेदीदारांची फसवणूक करणे, त्याहूनही अधिक शासनाची फसवणूक करणे या सर्व गोष्टी बिल्डर सहज करतात. ते जरी असले, तरी स्वयंविकास होतच राहिला. मुंबईतल्या वरळीत स्वयंविकासाने बांधलेल्या अंदाजे ४० इमारती आहेत. आपला पत्ता वरळीचा आहे नि आपणास याची माहिती नसावी याचे आश्चर्य वाटते. बिल्डरांच्या मदतीशिवाय गेल्या २०/२५ वर्षांत स्वयंविकास केलेल्या इमारतींची नावे अशी.. सागर तरंग, स्पोर्टस् फिल्ड, वरळी सागर, पूर्णा, वैतरणा, गोदावरी, वैनगंगा, वेण्णा इत्यादी नद्यांच्या नावाने बांधलेल्या इमारती या स्वयंविकासात बांधलेल्या आहेत. तसेच सुखदा व शुभदा, पौर्णिमा, प्रिया या सर्व इमारती वरळी सी फेस येथे स्वयंविकासाने बांधलेल्या आहेत. यापैकी एकाही इमारतीच्या विकासात बिल्डरांचा दुरान्वयानेही संबंध नव्हता. आता अलीकडे स्वयंविकासातल्या इमारतींची नावे पाहा... गोरेगावची अजितकुमार सोसायटी (बांधकाम पूर्ण), तसेच जिंद प्रेम, म्हाडाच्या जमिनीवर असणाऱ्या शेल कॉलनी येथे चित्रा सोसायटी, पंतनगर घाटकोपर येथे साईधाम सोसायटी, मुलुंड येथे पूर्वरंग सोसायटी, बांद्रा पू. येथे श्रीराम सोसायटी, आश्रय सोसायटी तसेच गांधीनगरमधील समाधान सोसायटी या सगळ्या सोसायट्यांमध्ये स्वयंविकासाचा मार्गच मंजूर केलेला आहे. आणखी २०/२५ सोसायट्या आहेत, पण जागेअभावी देत नाही. गेल्या वर्षभरात ५३७ सोसायट्यांनी पुनर्विकासाचे ठराव केले. विशेष म्हणजे, नवीन टिळकनगर येथील पत्रकार सोसायटी, गोरगाव प. येथील पत्रकार सोसायटी, तसेच मागाठाणे येथील पत्रकार सोसायटी या सर्वांनी स्वयंविकास अवलंबला. पत्रकार असल्यामुळे त्यांना स्वयंपुनर्विकासाची पूर्ण माहिती उपलब्ध होती व याच्या आधारे आकलनामुळे त्यांनी स्वत:चा फायदा करून घेण्याचा निर्णय घेतला. थोडक्यात माहितगार आणि हुशार सभासदांनी स्वयंविकासच्या मार्गातून स्वत:चा योग्य फायदा करून घेतला व काही जण मात्र स्वयंपुनर्विकासाच्या पर्यायावरच शंका घेतात. नागरिकांमध्ये आता स्वयंपुनर्विकास रुळला आहे व सर्वच ठिकाणी लोक बिल्डरांना व दलालांना आपली जागा दाखवत आहेत. समाजात ही एक प्रकारची नवी चळवळ निर्माण झाली आहे. आम्ही केवळ प्रबोधनाचे काम करतो. केवळ योग्य मार्ग कोणता, हे आमच्या स्तंभाच्या माध्यमातून लोकांना सांगतो. पुढील निर्णय मात्र सहकारी गृहनिर्माण सोसायटी घेते. संस्थांनी स्वयंपुनर्विकासाचा निर्णय घेतला, तर आम्ही त्यांना विनामूल्य सल्ला व लागेल तितकी मदत देण्याचे जाहीर मान्य केले आहे. प्रश्न पाठवताना... 'पुनर्विकास' सदरासाठी प्रश्न पाठवताना पुढील तपशील देणे अत्यावश्यक आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ, रस्त्याला लागून आहे किंवा कसे, रस्त्याची रुंदी, रहिवासी किती, प्रत्येकाच्या सदनिकेचे चटईक्षेत्र, दुकाने वा गाळे किती, अधिकृत की अनधिकृत, मुंबई बेट की उपनगर, जमिनीची मूळ मालकी, भाडेपट्टा कोणाच्या नावे, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा कसे, हे स्पष्ट असावे. तरच अचूक मार्गदर्शन मिळू शकेल. अन्य अनावश्यक तपशील वगळावा. प्रश्न शक्य तो टाइप केलेले, किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावेत. पाकिटावर 'पुनर्विकास सदरासाठी' असा स्पष्ट उल्लेख न चुकता करावा. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया इमारत, दुसरा मजला, डी. एन. रोड, मुंबई ४००००१. आपण आपले प्रश्न mtaskquestions@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट