स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माझी तीन लाख रुपयांची एक मुदत ठेव असून तिची मुदत २७ ऑगस्ट २०१८ रोजी संपली आहे. या मुदत ठेवीस मी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. एप्रिल २०१८ मध्ये मी बँकेला १५ एच हा अर्ज भरून दिला आहे. तरी, पुढील वर्षी ही मुदत ठेव परिपक्व होईल त्यावेळी टीडीएस कापला जाऊ नये यासाठी मला पुन्हा १५ एच अर्ज भरावा लागेल का, हे कृपया सांगावे.
- एक वाचक
१५ जी व १५ एच हे अर्ज आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिलमध्येच भरून देणे आवश्यक असते. संबंधित आर्थिक वर्षात टीडीएस कापला जाऊ नये यासाठी हे अर्ज वेळेवर सादर करणे गरजेचे असते. शिवाय, हे अर्ज प्रत्येक आर्थिक वर्षासाठी नव्याने द्यावे लागतात हे लक्षात घ्यावे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस १५ एच हा अर्ज भरून देणे योग्य ठरेल.
एक सरकारी बँक पुढील आर्थिक वर्षासाठीचे १५ जी/१५ एच हे अर्ज आधीच्या आर्थिक वर्षातील जानेवारीमध्येच भरून घेते. (उदा. आर्थिक वर्ष एप्रिल २०१८ ते मार्च २०१९साठीचे अर्ज जानेवारी २०१८मध्येच भरून घेणे) ही बाब कायदेशीर दृष्टीने योग्य आहे का व ठेवीदारांनी हे अर्ज जानेवारीमध्ये भरून द्यावेत का, याविषयी कृपया माहिती द्यावी.
- विजय त्र्यंबक गोखले, डोंबिवली
नियमानुसार हे अर्ज एप्रिलमध्ये द्यावे लागतात. चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजे एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या वर्षासाठीचे हे अर्ज एखाद्या बँकेने जानेवारी २०१८मध्येच भरून घेतले असतील तर ते शेवटच्या क्षणी होणारी घाई, गडबड टाळण्यासाठी केले असण्याची शक्यता आहे. जानेवारीत भरलेल्या या अर्जांची तुम्हाला योग्य पोचपावती मिळाली असेल तर असा अर्ज भरून देण्यात अडचण नसावी.
- मी एक अनिवासी भारतीय आहे. भारतात राहाणाऱ्या माझ्या भावाला पाच लाख रुपयांची गरज आहे. ही रक्कम एनआरई खात्याच्या माध्यमातून मी त्याला देऊ इच्छितो. माझा भाऊ सहा महिन्यांच्या कालावधीत एनआरओ खात्यामार्फत या रकमेची परतफेड करण्यास तयार आहे. तरी, परतावा झालेल्या या रकमेवर प्राप्तिकर वा अन्य कर आकारला जाईल का, हे कृपया सांगावे.
- एक वाचक
या व्यवहारातील मुद्दल रकमेच्या (पाच लाख) परताव्यावर प्राप्तिकर लागू होणार नाही. त्यामुळे तुमचा भाऊ केवळ मुद्दलाच्या रकमेची परतफेड करणार असेल तर काहीच अडचण येणार नाही. परंतु या व्यवहारात तुम्हाला व्याज मिळणार असेल तर मात्र ते व्याज करपात्र ठरेल.
प्रश्न पाठवताना...
आपण 'पैसा झाला मोठा' सदरासाठी प्रश्न पाठवू शकता. प्रश्नाचा मजकूर शक्य तो टाइप केलेला किंवा किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावा. पाकिटावर 'पैसा झाला मोठा सदरासाठी' असे स्पष्ट लिहावे. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया इमारत, दुसरा मजला, डी. एन. रोड, मुंबई ४००००१. आपण आपले प्रश्न mtaskquestions@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट