मुंबई प्रॉपर्टी मार्केटमधल्या घरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना अजूनही म्हणाव्या त्या प्रमाणात गती मिळालेली नसली तरी चालू वर्षात घरांच्या किमतींमध्ये साधारणतः ६ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
प्रॉपर्टी कन्सल्टण्ट असणाऱ्या 'जोन्स लँग लासेल'च्या अहवालात या अभ्यासातून मिळालेले निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. २०१६ मध्ये मुंबई आणि उपनगरातल्या घरांच्या किमतींमध्ये ६ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. २०१५ मध्ये ही वाढ ३.३ टक्के तर २०१४ मध्ये ७ टक्क्यांनी झाली होती.
जागतिक आर्थिक संकटाच्या आधी घरांच्या किमतींमधली वाढ ही दोन अंकी होती. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून ती मंदावली आहे. वास्तविक पाहता राहण्यासाठी घर घेणाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. परंतु गुंतवणूकदारांसाठी मात्र ती नाही.
२०१५ मध्ये सरासरी ६ ते ७ टक्के वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात झाली तर केवळ ३.३ टक्क्यांनी. सब-मार्केट दक्षिण-मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांमध्ये ही वाढ अनुक्रमे ४.३ आणि ४ टक्क्यांनी नोंदली गेली होती. त्यानंतर उत्तर मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये अनुक्रमे ३.९ आणि ३.५ टक्क्यांची वृद्धी झाली होती. मुंबई महानगर विभागामध्ये ठाण्यात ३ टक्क्यांनी तर नवी मुंबईत ६ टक्क्यांनी घरांच्या किमतींमध्ये वाढ झाली होती. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की, नवी मुंबई मुंबईपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. कारण नवी मुंबईत विक्री न झालेल्या घरांची संख्या मोठी आहे. नवी मुंबईच्या ठराविक भागांची कामगिरी मात्र चांगली आहे. २०१५ च्या चौथ्या तिमाहीतली आकडेवारी बघितली तर मुंबईची (१०.१%) कामगिरी नवी मुंबईपेक्षा (५.५%) अधिक चांगली होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट