Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

आराखड्यात बदल करणाऱ्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते

$
0
0

राजीव वाघ

प्रश्न - मी मुलुंडमधील एका सोसायटीत १७ वर्षे राहात आहे. दुर्दैवाने आतापर्यंत आम्हाला निवासी प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्याला एक कारण म्हणजे मुख्य बिल्डरचे निधन झाले आणि त्याच्या कुटुंबात मालमत्तेवरून वाद निर्माण झाला. दरम्यान सहा ते आठ सदस्यांनी आपल्या फ्लॅटमध्ये बदल केले. त्यांनी आतील भिंत पूर्ण पाडून बाहेरच्या भिंतीपर्यंत जागा वाढवून घेतली आहे. हे व्यवस्थापकीय समितीला कल्पना न देता केले आहे. आता नव्या बिल्डरने मालमत्तेचा ताबा घेतला असून त्याला हे सगळे फ्लॅट मूळ आराखड्यानुसार बदलायचे आहेत, परंतु हे सदस्य सहकार्य करत नाहीत. सोसायटी या सदस्यांच्या विरोधात कोणती कायदेशीर कारवाई करू शकते?

उत्तर - नागरी प्रशासनाने मान्यता दिलेल्या आराखड्यामध्ये सोसायटीच्या आणि प्रशासनाच्या परवानगीविना बदल केला तर अशा सदस्याविरुद्ध कारवाई करता येते. नागरी प्रशासन फ्लॅटमध्ये केलेले बेकायदा बदल सदस्यांच्या खर्चाने उद्ध्वस्त करून प्लॅननुसार फ्लॅट मूळ रूपात आणू शकते. सोसायटीने नागरी प्रशासनाला ही बाब लेखी कळवून त्यावर तातडीने कारवाई करण्याचा आग्रह धरला पाहिजे. सोसायटीला अशा बदलांमुळे निवासी प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येत असेल आणि सोसायटीच्या एकंदर सदस्यांच्या हितसंबंधांना बाधा येत असेल तर सोसायटी अशा सदस्यांना त्यांचे सदस्यत्व रद्द का करू नये, अशी नोटीस पाठवू शकते. अशी कृतीमुळे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते. तथापि, हे पाऊल टोकाचे असून सोसायटीने कायद्याचे काटेकोर पालन करत आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार ही कारवाई करायला हवी. सोसायटीने सक्षम वकिलाचा सल्ला घेणे उत्तम.

सोसायटींना दोन मुलांचा नियम नाही

प्रश्न दोनपेक्षा अधिक मुले असलेल्यांना सोसायटीची निवडणूक लढवता येत नाही, असा सोसायटी कायद्यात किंवा आदर्श उपविधीमध्ये कोणता नियम आहे का, असल्यास तो बंधनकारक असतो की पर्यायी. सर्वसाधारण सभा बहुमताने हा कायदा चुकवू शकते का?

उत्तर - कोणत्याही सदस्याला सोसायटी व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी उभे राहण्याकरिता अपात्र ठरणाऱ्या बाबी (मॉडेल बायलॉज) आदर्श उपविधीच्या कलम ११६मध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. एखाद्या सदस्याला दोनपेक्षा अधिक मुले असल्यास त्या सदस्याला निवडणुकीसाठी उभे राहता येत नाही, असे त्यात नमूद केलेले नाही. महाराष्ट्र सहकारी सोसायटी कायदा १९६० किंवा त्या कायद्याच्या अंतर्गत केलेले नियम यामध्ये असे कोणतेही निर्बंध नाहीत. कोणी तो नियम उधृत करीत असेल तर त्याला तो दाखवायला हवा.

सोसायटी चक्रवाढदराने व्याज आकारू शकत नाही

प्रश्न - विक्रोळीत माझी एक व्यावसायिक मालमत्ता आहे. माझ्या हिशोबाने मी सगळी थकबाकी भरलेली आहे. परंतु सोसायटी ते मान्य करत नाही. कारण त्यांनी चुकीचा हिशोब केला आहे. सोसायटी चक्रवाढदराने व्याज आकारू शकते का? मी भरलेली रक्कम सोसायटीने थकित व्याजापोटी जुळवून घेतली. हे न्याय्य आहे का?

उत्तर - सहकारी सोसायटीला चक्रवाढव्याज आकारण्याची परवानगी नाही आणि तशी आकारलेली रक्कम भरायची आवश्यकता नाही. सदस्याने भरणा न केलेल्या रकमेवर सर्वसाधारण सभेने संमत केल्यानुसार कमाल २१ टक्क्यांपर्यंत सरळव्याज आकारण्याचा सोसायटीला अधिकार आहे. केवळ बँकांसारख्या निवडक संस्थांना चक्रवाढव्याजाचे अधिकार आहेत. तुम्ही देय असलेले मुद्दल आणि व्याज भरायला हवे. मुद्दल आणि व्याज याचा तपशील न देता रक्कम भरली तर सोसायटीला ती रक्कम बाकी व्याजाच्या पोटी भरणा करून घेण्याचा अधिकार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>