बहुतेक ठिकाणी आधी फर्निचर ठरतं अणि नंतर त्या कपाटांच्या मापांनुसार वस्तू मार्गी लावल्या जातात. घरातील माणसांच्या सोयींसाठी वस्तू असतात आणि या वस्तूंसाठी कपाटं. ही कपाटं वस्तूंच्या गरजेनुसार असतील तर आपोआपच माणसांची सोय होते.
खरंतर जेव्हा नवीन जागेत नव्यानं संसार थाटायचा असतो, तेव्हा नवीन काय-काय घेता येईल याबरोबरच जुनं काय-काय सोडता येईल, हे ठरवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजे हे फक्त फर्निचर बाबतीत नसून, ते अगदी कपड्यांपासून माळ्यावर ठेवलेल्या अडगळीपर्यंतच्या गोष्टींना लागू होतं. नवीन इंटिरियर करण्याआधी घरात कोणकोण राहणार, कोणासाठी कुठली खोली उपयुक्त आहे, हे जसं बघायला हवं, तसंच घरात काय-काय सामान असेल आणि गरजेनुसार ते कुठे ठेवणं इष्ट आहे याचाही विचार व्हायला हवा. जर या बाबतीत सुस्पष्टता असेल, तर पुढे फर्निचर डिझाइन करणं खूप सोयीचं जातं. कसं ते काही उदाहरणांनी बघू या.
मागील एका लेखात आपण शू-रॅक आणि आजुबाजुची जागा डिझाइन करताना काय माहिती असावं हे पाहिलं. त्याचप्रमाणे घरातल्या सर्वच भागांचा विचार करायला हवा. पहिलं म्हणजे आपणच आपली जीवनपद्धती समजून त्याप्रमाणे, नक्की काय हवं आणि काय नको, हे ठरवायला हवं. बऱ्याचदा किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी नंतर पंचाईत करू शकतात. अगदी घरातून दर महिन्याला रद्दी जात असेल, तर ती साठवायच्या जागेची योग्य आकाराची सोय फर्निचर (स्टोरेज) डिझाइन करतानाच केली गेली पाहिजे.
घरातील टी.व्ही. बरोबर अजून काय असणार आहे, डीव्हीडी प्लेयर असेल तर त्यासाठी साधारण किती जागा हवी? त्या व्यतिरिक्त अजून काही गॅझेट्स असतील का? स्पीकर्स हवेत का? हे सर्व आधीच ठरवावं.
घरातील मुलांच्या खेळाचं सामान, त्यांची दप्तरं, क्राफ्टचं सामान, पुस्तकं इत्यादी वस्तुंची प्रत्येक घरातली आवश्यकता वेगवेगळी असते. मोठ्यांचे लॅपटॉप, सामानाच्या पिशव्या, ऑफिस बॅग्ज किंवा रोजच्या वापरातल्या पर्स इत्यादी बाबत नेमकी माहिती पाहिजे.
घरात वाचनाची कितपत आवड आहे, त्याप्रमाणे भविष्यात लागणाऱ्या स्टोरेजचाही विचार केला तर उत्तम. याशिवाय घरात फाइल्स असतील का? असतील तर किती? कुठल्या? याचं विभाजन आधीच झालेलं चांगलं.
इतर स्टेशनरी, काही आवश्यक हत्यारं, जुने अल्बम, व्यायामाची आवड असल्यास त्याचं सामान अशा एक ना अनेक वस्तुंची सोय करावी लागते. या सगळ्यांबाबत पूर्वकल्पना असते, तेव्हा त्यानुसार डिझाइन करता येते.
काही घरांमध्ये शो-केसच्या नावाखाली काचेचे दार असलेली कपाटं असतात. पण आतमध्ये 'ते दार लाकडीच असतं तर बरं...' अशी अवस्था असते. आपल्याकडे डिस्प्ले करण्यासारखं काही आहे का? तशी आवड आहे का? काही ट्रॉफीज, मेडल्स आहेत का? अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आधीच शोधावीत.
आजकाल घराघरांत प्रवासाच्या बॅगा हा स्टोरेजसाठी मोठा विषय झालेला दिसतो. विविध कारणांसाठी लागणाऱ्या लहान, मोठ्या सूटकेस, हॅण्डबॅग यांचाही डाटा तयार पाहिजे. अन्यथा नंतर त्या इतस्थः पसरलेल्या दिसतात नाहीतर पलंगाखाली धूळ खात पडलेल्या दिसतात.
घरात वरच्या स्टोरेजमधलं सामान काढायला एखादं स्टूल किंवा फोल्डिंग लॅडर ठेवणार आहोत का?
जास्तिच्या उशा, पांघरुणं, गाद्या, सतरंज्या, पडदे, सोफा कव्हर्स, टेबल मॅट्स या सर्व कॅटेगरीबाबत आधीच ठरवलेलं चांगलं.
स्वयंपाक खोली आणि कपडे हे सर्वात जिव्हाळ्याचे विषय. प्रत्येकाच्या राहणीमानानुसार आणि जीवनशैलीनुसार यातल्या वस्तुंमध्ये जमीन-आस्मानाचा फरक दिसतो. या वस्तुंमध्ये किंवा वापरण्याच्या पद्धतीत काही बदल करावेसे वाटत असतील तर हे इंटिरियरचं काम करण्याआधी पुरेसा वेळ घेऊन, मनात रेंगाळणारे बदल घडवून आणण्याची ही नामी संधी ठरू शकते. उदाहरणार्थ जर स्वयंपाकाची जुनी शेगडी, भांडी, डबे खूप जुने असतील आणि मनात बाजारातील उपयुक्त असे काही पर्याय असतील तर, त्याचाही विचार करून बजेटमध्ये सोय करावी. हिच गोष्ट इतर गोष्टींमध्येही लागू होते. उगाचच साठवून ठेवलेल्या वस्तू काढून टाकायची ही उत्तम वेळ असते. थोडक्यात सांगायचं म्हणजे, त्याच माणसांबरोबर नव्याने संसार थाटायची संधी!
अशा प्रकारे नवीन जागेत जाताना, आपल्या घरात नक्की काय-काय असेल हे बरोबर माहिती असेल तर त्याबरहुकूम डिझाइन करणं खूपच सोयीचं असतं. नाहीतर बहुतेक ठिकाणी आधी फर्निचर ठरतं अणि नंतर त्या कपाटांच्या मापांनुसार वस्तू मार्गी लावल्या जातात. घरातील माणसांच्या सोयींसाठी वस्तू असतात आणि या वस्तूंसाठी कपाटं. ही कपाटं वस्तूंच्या गरजेनुसार असतील तर आपोआपच माणसांची सोय होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट