प्रश्न
मी राहत असलेला फ्लॅट माझा भाऊ व मी स्वतः अशा दोघांच्या नावावर आहे. सदर फ्लॅट संपूर्णतः माझ्या अथवा माझ्या पत्नीच्या नावे करण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागेल? तसेच किती खर्च येईल?
उत्तर
तुमच्या प्रश्नावरून असे दिसते, की केवळ तुमचे नाव असण्यासाठी तुमचा भाऊ त्याचा अंशतः हिस्सा सोडण्यास तयार आहे. तसे असल्यास तुम्ही त्याच्याकडून गिफ्ट डीड (भेट करार) करून घेऊ शकता. तुम्ही सदर करार नोंदणीकृत आणि मुद्रांकित करून घेणे आवश्यक आहे. हा दोन भावांदरम्यानचा करार असल्याने यावर देय स्टँप ड्युटी (मुद्रांक शुल्क) अत्यंत अत्यल्प आहे. तुमची सोसायटी स्थापन झाली आहे, असे मी गृहित धरतो. तसे असल्यास, तुम्ही सोसायटीकडे अर्ज करून तुमच्या पत्नीला सहयोगी सदस्य बनवून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही आणि तुमची पत्नी सदर फ्लॅटचे संयुक्त मालक व्हाल.
फेडरेशन बनवून अभिहस्तांतरण करणे योग्य
प्रश्न
कांदिवली पश्चिमेला आमची ९४ सदस्यांची म्हाडाची इमारत असून चार वर्षांपूर्वी नोंदणीकृत केलेली आहे. म्हाडाने इमारत उभी करताना आमच्या संकुलात एकूण आठ विंग उभ्या केल्या आहेत. या आठ विंग नोंदणीकृत आहेत. सर्व आठ विंगला सामायिक सुरक्षा भिंत आहे. म्हाडाने प्रत्येक विंगची सीमारेषा निश्चित केलेला आराखडा संस्थेला दिलेला नाही. आमच्या संस्थेने म्हाडाकडे इमारत अभिहस्तांतरणासाठी पत्रव्यवहार केला आहे. म्हाडाने आमच्या संस्थेकडे इमारतीचा आराखडा आर्किटेककडून मोजून, म्हाडामध्ये सदर आराखडा जमा करण्यास सांगितलेला आहे. परंतु आम्हाला आमच्या इमारतीची सीमारेषा माहीत नाहीत. तसेच इतर सात विंग/संस्थांना त्यांच्या सीमारेषा माहीत नाहीत. सर्व आठ विंगच्या मध्यभागी ७५ गुणिले २०० फूटांचा मोकळा भूखंड आहे. त्या भूखंडावर आमची संस्था अभिहस्तांतरण करून घेऊ शकते का? आमच्या संस्थेने मोकळ्या भूखंडाचे अभिहस्तांतरण केल्यास, इतर सात संस्था त्यास विरोध करू शकतात का? तसेच अभिहस्तांतरण केल्यावर संस्थेला म्हाडाला भुईभाडे भरावे लागेल का? आमच्या आठ विंगची मिळून फेडरेशन झालेली नाही.
- संदीप दिवेकर
उत्तर
तुमच्या प्रश्नावरून असे दिसते की, एकाच प्लॉटवर आठ विंग्स आणि आठ सोसायट्या आहेत. या जमीनीची विभागणी केलेली नाही, त्यामुळे प्रत्येक विंगची सीमा आखणे शक्य नाही. अशा स्थितीत, तुम्हाला अविभाजित म्हणजे एक प्लॉटच्या आधारेच आणि सर्व सोसायट्यांसाठी एकत्रितपणे अभिहस्तांतरण करुन घेता येऊ शकते. अशा परिस्थितीत आठ सोसायट्यांचे फेडरेशन बनवून म्हाडाकडून हे अभिहस्तांतरण करुन घेणे योग्य आहे.
लिफ्टचा फायदा नसल्याने खर्च उचलण्याचा प्रश्नच नाही
प्रश्न
मी ठाणे पाचपाखडी येथील सहकारी सोसायटीमध्ये गेली वीस वर्षे रहात आहे. आमची सोसायटी उत्तमच आहे. तळमजला व तीन मजले अशा तीन वेगवेगळ्या इमारती आहेत, जेथे लिफ्ट नाही. याशिवाय तळमजला व सहा मजले अशा तीन इमारती आहेत जेथे लिफ्ट आहे. गेली अनेक वर्षे आम्ही मेंबर्स जे बिना लिफ्टच्या बिल्डिंग मध्ये राहतो, ते सर्व लिफ्टसाठी लागणारा खर्च, जसे वर्षाचा रिपेरिंग AMC खर्च, वर्षात इतर काही लिफ्टची दुरुस्ती केली तर तो खर्च, हे सगळे आमच्याकडून वसूल केले जाते. गेली अनेक वर्षे आमच्याकडून लिफ्टचा रोजचा वापराचा इलेक्ट्रिसिटी खर्चपण वसूल केला जातो. या AGM मध्ये असे सांगण्यात आले की, लिफ्ट साठी १५-१६ लाख रुपये खर्च करायचा आहे. असेही सांगण्यात आले की, लिफ्ट ही सोसायटीची प्रॉपर्टी असल्याने सर्व सभासदांनी हे पैसे काढायचे आहेत. ज्या बिल्डिंग मध्ये लिफ्ट नाही त्या बिल्डिंग मधील सभासदांनी पण पैसे का काढायचे? आम्ही जे लिफ्टच्या बिल्डिंगमध्ये राहत नाही त्यानी पैसे देणे बंद करावे? आत्ता पर्यंतची रिकव्हरी कशी करावी?
उत्तर
लिफ्ट नसलेल्या छोट्या फ्लॅटमध्ये राहणारे मोठ्या इमारतीतील लिफ्टच्या देखभालीचा खर्च कसे काय देणे लागतात, हेच मला स्पष्ट होत नाही. मोठ्या इमारतीतील लिफ्टचा कोणत्याही प्रकारचा फायदा छोट्या इमारतीत राहणाऱ्यांना होत नाही, त्यामुळे त्याचा खर्च उचलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लिफ्टचा कोणताही लाभ होत नसल्याने लिफ्ट ही सोसायटीची मालमत्ता आहे या युक्तिवादाला कोणताही अर्थ नाही. सोसायटीने मागणी केलेली रक्कम भरण्यास तुम्ही नकार देऊ शकता. आतापर्यंत भरलेल्या रकमेचा प्रश्न तितकासा सोपा नाही, त्यामुळे एका निष्णात वकिलाच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला योग्य पावले उचलावी लागतील.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट