ज्या सोसायटीत आपण राहतो त्या सोसायटीच्या कारभारात कर्तव्य म्हणून वेळोवेळी लक्ष घातल्यास सोसायटीत चाललेल्या गैरप्रकारांना आळा बसेल. सोसायटीचा कारभार कोणी तरी पाहतेय ना, मग आपण कशाला लक्ष द्यायचे, असे म्हणून अनेकदा सभासद त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच साफ हेतू नसलेल्या पदाधिकाऱ्यांचं चांगलंच फावतं.
एखाद्या गृहनिर्माण सोसायटीमधल्या सभासदांची कर्तव्यं म्हटलं की फक्त देखभाल खर्च देणं एवढंच अभिप्रेत नसतं. पण त्याहीपेक्षा मोठं कर्तव्य म्हणजे त्या दिलेल्या पैशांचा योग्य वापर, विनिमय होतो आहे किंवा नाही याचा वेळोवेळी आढावा घेणं. मध्य मुंबईतल्या एका सोसायटीच्या सदस्यांनी अकार्यक्षम आणि गैरव्यवहारी सदस्य असलेल्या कार्यकारिणीविरोधात उपनिबंधकांकडे तक्रार करून कार्यकारिणी बरखास्त करवली. असे गैरव्यवहार सभासदांच्या उदासीनतेमुळे अनेक ठिकाणी होत असतात. देखभाल खर्चाच्या पावत्या, सभासदांकडून आलेली पण कार्यकारिणीतल्या काही सदस्यांच्या हितसंबंधांना बाधा ठरणारी पत्रं गहाळ करणं, सोसायटीमधली साफसफाई व इतर दुरुस्तीची कामं व्हाऊचरशिवाय वैयक्तिक देवाणघेवाणीच्या हिशेबात करून घेणं, हे प्रकार अनेक सोसायट्यांमध्ये सर्रास चालू आहेत. बऱ्याच सदनिका असलेली सोसायटी असल्यास भरपूर पैसे हाती येतात, लोभ-मोह वाढतो, पैशांची अफरातफर सुरू होते. अशा वेळी सोसायटी सदस्यांनी जागरूकता दाखवून फक्त ऑडिटरच्या भरवशावर न राहता तपासणी केली पाहिजे. एखादा जागरूक सदस्य असे करू लागला तर बाहेरून गंमत न बघता त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे. सोसायटी कितीही ‘आपली’ म्हटली तरी तिथेही शिस्त, नियम असतात. कार्यकारिणीतल्या काही अपप्रवृत्तीच्या व्यक्तींनी नियम झुगारून गैरव्यवहार सुरू केले तर सभासदांवर नियम पाळण्याचं बंधन राहात नाही.
ज्या सोसायटीत आपण राहतो त्या सोसायटीच्या कारभारात कर्तव्य म्हणून वेळोवेळी लक्ष घातल्यास सोसायटीत चाललेल्या गैरप्रकारांना आळा बसेल. सोसायटीचा कारभार कोणी तरी पाहतेय ना, मग आपण कशाला लक्ष द्यायचे, असे म्हणून अनेकदा सभासद त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच साफ हेतू नसलेल्या पदाधिकाऱ्यांचं चांगलंच फावतं. इतरांना हाताशी धरून ते आपला हेतू साध्य करतात आणि एकमेकांच्या सहकार्याने स्वतःचा उत्कर्ष साधतात. सोसायटीचं काय होणार, याचे त्यांना सोयरंसुतकही नसते. त्यामुळे अशा स्वार्थी पदाधिकाऱ्यांपासून सावध राहणं गरजेचं आहे. यासाठी पदाधिकारी निवडतानाच दक्षता बाळगली पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या व्यक्तींनीही सोसायटीचा कारभार सुधारण्यासाठी सोसायटीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलं पाहिजे. चांगल्या व्यक्ती निवडून आल्या तर सोसायट्यांचा कारभार आपोआपाच सुधारेल आणि अशा पांढरपेशा अपप्रवृत्तींना थारा मिळणार नाही. याचा सर्वांनीच विचार करणं आवश्यक आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट