Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

सहयोगी सदस्याचे अधिकार

$
0
0

प्रश्नः
आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील अनेक सदस्य वयोवृद्ध असून ते सोसायटीच्या सभांना हजर राहू शकत नाहीत व कोणत्याही पदावर काम करू शकत नाहीत. काही सदस्य त्यांच्या मुलांना सहयोगी सदस्य (‘असोसिएट मेंबर’) बनवू इच्छितात. हे करण्यासाठी कोणत्या कायदेशीर कार्यवाहीची आवश्यकता आहे? ‘असोसिएट मेंबर’चे अधिकार काय असतात व ते निवडणूक लढवून व्यवस्थापकीय समितीत पदाधिकारी बनू शकतात काय?

- एस. के.

उत्तरः

सदस्याने आवश्यक फॉर्म भरून द्यावा, ज्यात त्याने/तिने ज्या व्यक्तीला आपला ‘असोसिएट मेंबर’ बनवण्याची आपली इच्छा आहे हे नमूद करावे. सदस्याला आपल्या निवडीच्या व्यक्तीला सहयोगी सदस्य बनविण्याचा पूर्ण कायदेशीर हक्क असतो. सदस्याने जर सोसायटीला कळविले की तो सोसायटीच्या कामकाजात सहभागी होऊ शकत नाही आणि त्याचा सहयोगी सदस्य हा सदस्यत्वाची सर्व कार्ये पार पाडील, तर तेवढे पुरेसे असते. मग असा सहयोगी सदस्य सोसायटीच्या सर्वसाधारण सभांना हजर राहू शकतो, निवडणुका लढवू शकतो, व्यवस्थापकीय समितीचा सदस्य बनू शकतो आणि सोसायटीचा पदाधिकारीही बनू शकतो.

प्रश्नः

मुंबई बेटातील महानगरपालिकेच्या मालकीच्या एका भूखंडावर असलेल्या झोपडपट्टीत आम्ही १९७५ पूर्वीपासून राहत आलो व सदर भूखंडावर आमच्या ५६ निवासी व ७ अनिवासी झोपड्या (दुकाने) होत्या. नंतर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत एका विकासकाने आम्हाला सात मजली इमारत बांधून दिली. त्यापूर्वीच, म्हणजे ऑक्टोबर १९९४ मध्ये आम्ही आमची ६३ सदस्यांची सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत करून घेतलेली होती. विकासकाने जुलै २००३ मध्ये भोगवटा प्रमाणपत्रासह (‘ओसी’) प्रत्येकी २२५ चौरस फूट चटईक्षेत्राचे ५६ निवासी गाळे आम्हाला बांधून दिले व बाजूला बांधलेल्या विक्रीसाठीच्या इमारतीत तळमजल्यावर ७ अनिवासी सदस्यांना गाळे (दुकाने) दिले. प्रश्न असाः विकासक आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत मालमत्तेचे अभिहस्तांतर (‘कन्व्हेअन्स’) करून देण्यास तयार नाही व विचारणा करूनही सतत टाळाटाळ करीत आहे. ‘कन्व्हेअन्स’ मिळविण्यासाठी संस्थेने काय करावे? प्रकल्पग्रस्त व्यक्तीसाठी (‘प्रोजेक्ट अॅफेक्टेड पर्सन’) असलेल्या एका निवासी सदनिकेचा ताबा विकासक सोडायला तयार नाही. त्याबाबत काय करावे?

- एक ‘मटा’ वाचक, मुंबई.

उत्तरः

तुमचा प्रश्न हा विकासकाकडून सोसायटीला जमीन व इमारतीच्या अभिहस्तांतराशी (‘कन्व्हेअन्स’) संबधित आहे, असे दिसते. असे ‘कन्व्हेअन्स’ मिळणे हा सदस्य व सोसायटी यांचा कायदेशीर हक्क आहे आणि विकासक तो डावलू शकत नाही. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स अॅक्ट, १९६० मधील तरतुदींअन्वये असे ‘कन्व्हेअन्स’ करून देणे ही विकासकाची जबाबदारी आहे, जर त्याने बांधलेल्या सदनिकापैकी ६० टक्के सदनिका त्याने विकल्या असतील तर. ‘रियल इस्टेट (रेग्युलेशन अॅण्ड डेव्हलपेमन्ट) अॅक्ट, २०१६’ या मुख्य कायद्यातील तरतुदीप्रमाणे विकासकाने ‘ओसी’ मिळाल्यानंतर ३० दिवसांमध्ये ‘कन्व्हेअन्स’ करून दिले पाहिजे. म्हणून हे निर्विवाद आहे की तुमच्या सोसायटीला ‘कन्व्हेअन्स’ मिळण्याचा हक्क आहे. सोसायटीने सक्षम कायदातज्ज्ञाची मदत घ्यावी आणि ‘कन्व्हेअन्स’ मिळविण्यासाठी निश्चित कृती योजना तयार करावी.

‘हाउसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न

‘हाउसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न पाठविताना आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील इमारतींची संख्या, मजले, सदनिकांची संख्या, सदनिकांचे चटईक्षेत्र, प्रश्नाचे नेमके स्वरूप इत्यादी आवश्यक तो तपशील न चुकता नमूद करावा. मजकूर शक्य तो टाइप केलेला, अन्यथा किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावा. पाकिटावर ‘हाउसिंग सोसायटी सदरासाठी’ असे स्पष्ट लिहावे. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स टॉवर, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाउन्ड, लोअर परळ, मुंबई- ४०० ०१३.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>