प्रश्नः मुंबईतील आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेने इमारतीच्या दुरुस्ती, डागडुजीचे काम करवून घेतले, त्याला आता सहाहून अधिक वर्षे झाली. आम्ही सदस्यांनी 'सोसायटी'च्या व्यवस्थापकीय समितीकडे या कामावर झालेल्या खर्चाचा हिशेब अनेक वेळा मागितला. पण व्यवस्थपकीय समितीतील पदाधिकाऱ्यांनी हिशेब देण्याचे नेहमीच टाळले आहे. याबाबत आम्ही कायदेशीररीत्या काय करू शकतो?
— काही 'सोसायटी' सदस्य, मुंबई.
उत्तरः ज्या वर्षात दुरुस्ती, डागडुजीची कामे करून घेण्यात आली त्याच वर्षात सदस्यांनी हिशेबांचा आग्रह धरायला पाहिजे होता. दुरुस्तीच्या कामांवर खर्च झालेल्या रकमांचे तपशील न दिल्याच्या कारणावरून सर्वसाधारण सभेत त्या वर्षाच्या हिशेबांना सदस्यांनी मुळात मंजुरीच द्यायला नको होती. तुम्ही उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे लेखी तक्रार करून त्यांना विनंती करू शकता. 'सोसायटी'ने सर्व हिशेब सादर करावेत असा आदेश देण्याची विनंती तुम्ही उपनिबंधकांना करू शकता.
प्रश्नः मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेत दोन वर्षांपासून माझी सदनिका असून मी 'सोसायटी'चा सदस्य आहे. मला कार पार्किंगसाठी 'सोसायटी'च्या आवारात परवानगी देण्यात आली असून, गेली दोन वर्षे मी कार ठरवून दिलेल्या जागेत ठेवत आलो आहे. अलीकडेच माझ्या कारमध्ये काही बिघाड झाल्यामुळे ती दुरुस्तीसाठी दिली आहे आणि पर्यायी दुसरी कार घेतली आहे. 'सोसायटी'च्या व्यवस्थापकीय समितीने माझी पर्यायी कार (वेगळ्या क्रमांकाची) आवारात ठेवण्यास हरकत घेतली आहे. व्यवस्थापकीय समितीची ही कृती कायद्याला धरून आहे का? या बाबतीत मला कायद्याने काय करता येईल?
—मोरे, मुंबई.
उत्तरः 'सोसायटी'ने घेतलेली भूमिका पूर्णतः चुकीची असून तिला कायद्याचा कसलाही आधार नाही. सदस्याला वाटप करण्यात आलेल्या पार्किंगच्या जागेत कोणती कार तो ठेवतो आहे हा 'सोसायटी'चा प्रश्न नाही. उपलब्ध असलेल्या पार्किंगच्या जागांचे न्याय्य आणि समान पद्धतीने वितरण करणे हे 'सोसायटी'चे कर्तव्य आहे. पार्किंग लॉटमध्ये कोण कोणती कार ठेवतो हे पाहण्याचे नव्हे. अर्थात पार्क केलेली गाडी सदस्य किंवा त्याच्या कुटुंबियाची असली पाहिजे.
* * *
खालील प्रश्न व उत्तर शिलकीत राहिले आहे. जागेअभावी जाऊ शकले नाही.
प्रश्नः मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेचा मी सभासद असून, त्या 'सोसायटी'मधील भूखंडावरील घर माझ्या व पत्नीच्या संयुक्त नावांवर आहे. सदर जागेचे नामनिर्देशन आम्ही 'नॉमिनेशन फॉर्म नंबर १४' भरून आमच्या एकुलत्या एक मुलाच्या नावे केलेले आहे. त्यामुळे सदर जागा आमच्या मृत्युनंतर आमच्या मुलाच्या नावे होणार आहे याबद्दल आमचे दुमत नाही. आम्हाला दोन विवाहित मुली असून त्या आपापल्या संसारात स्थिरावलेल्या आहेत. आम्ही कोणतेही इच्छापत्र, 'सोसायटी'तील प्लॉटसंबंधी अन्य कागदपत्र केलेले नाही. आम्हा दोघांच्या मृत्युनंतर मुलाच्या नावाने झालेला सदर प्लॉट तो त्याची इच्छा असल्यास विकू शकेल काय? सदर विक्रीस आमच्या विवाहित मुली कायदेशीर मनाई करू शकतील काय?
—के. एम. डब्ल्यु., मुंबई.
उत्तरः तुम्ही दोघेही हयात नसाल तेव्हा तुमचा बंगला तुमच्या मुलालाच मिळेल हे तुम्ही केवळ 'नॉमिनेशन' करून निश्चित करू शकत नाही. 'नॉमिनेशन' हे 'सोसायटी'च्या उपयोगी पडणारे साधन आहे ज्याद्वारे 'सोसायटी' संबंधित सदनिकेच्या संदर्भात (हस्तांतरासह) कोणाशी संपर्क साधावा हे ठरवू शकते. 'नॉमिनेशन'मुळे तुमच्या घराचा मालकी हक्क तुमच्या मुलाच्या नावावर हस्तांतरित होणार नाही. 'नॉमिनेशन'मुळे तुमचा मुलगा बंगल्याचा मालक होणार नाही आणि त्यामुळे घर त्याला हवे तेव्हा विकता येणार नाही. जर त्याने घर विकलेच, तर त्यातून येणाऱ्या रकमेतील हिस्सा त्याला बहिणींना द्यावा लागेल, जर त्यांनी मागणी केली तर. म्हणून योग्य सल्ला हाच असेल की तुम्ही दोघांनीही इच्छापत्र ('विल्') करावे आणि त्यामध्ये घर मुलालाच मिळेल अशी स्पष्टपणे नोंद करावी. तुम्ही इच्छापत्र केले तरच तुमचे घर तुमच्या मुलाला कसल्याही समस्यांशिवाय मिळू शकते. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की तुमच्या मुलीही तुमच्या वारस आहेत. केवळ इच्छापत्रच याची हमी देऊ शकेल की तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या घरावर मुली दावा सांगू शकणार नाहीत.
( या सदरातील उत्तरे ही प्रश्नकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिलेली असतात. संबंधितांनी कोणतीही कृति करण्यापूर्वी आपल्या वकिलाचा सल्ला घ्यावा.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट