घराचं घरपण राखायला, त्याला जिवंतपणा यायला तिथे मुलांचं, गृहिणीचं वास्तव्य तर हवंच, पण जोडीला मनाला प्रसन्नता देणारं मोकळं वातावरण हवं.
घराचं घरपण म्हणजे स्वच्छता. सर्व गोष्टी जागच्या जागी असणं आणि त्यांची आवश्यकता असताना त्या गोष्टी वेळीच मिळणं. यासाठीच हवी असते स्वयंशिस्त. घरातल्या प्रत्येकाने याचा अवलंब केला तर छोटं असो वा मोठं, घर टापटिप, सुंदर दिसतं.
आपण आपलं घर सजवतो तेव्हा हौसेने नवनवीन गोष्टी आणतो. पण काही दिवसांनी त्याच गोष्टी आपल्याला नकोशा वाटतात वा गरजेच्या नाहीत म्हणून अडगळीत जातात. दृष्टीआड सृष्टी म्हटलं जातं पण खरोखरच एखादी गोष्ट नजरेआड झाली की विस्मरणात जायला वेळ लागत नाही. अशा अनेक किमती गोष्टी नंतर धूळ खात पडतात. यासाठी प्रत्येक नवीन गोष्टी घेण्यापूर्वी त्याची गरज, पर्यायी गोष्टी आहेत का, या गोष्टीशिवाय काही अडेल का हे सर्व तपासून मगच नवीन खरेदीचा निर्णय घ्यावा.
कोणतीही नवीन वस्तू तिच्या जागेवर गेलीच पाहिजे. खरंतर प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक गोष्ट जागेवर असेल तर वेळेचीही बचत होते. ऑफिसमध्ये वा गोडाऊनमध्ये जसं प्रत्येक फाइल, टेबल, खुर्चीला चक्क नोंदणी क्रमांक किंवा कुठल्या खोलीत ती वस्तू आहे हे एका कोपऱ्यात लिहिलं जातं, तसं केलं तरी चालेल. त्याबरोबरच एका डायरीमध्ये कोणत्या खोलीत काय गोष्टी आहेत व किती सामान आहे याचीही नोंदणी करून ठेवावी. आपल्या घरातल्या फर्निचरपासून, भांडी, कपडे एवढेच कशाला फॅनपासून ते फ्रीजपर्यंत सर्व गोष्टी अशा नोंदवून ठेवल्या तर त्यांची निगा राखणं व त्याचं सातत्य सांभाळणं शक्य होतं.
सर्व कुटुंबाने स्वयंशिस्त म्हणून ज्या वस्तूंच्या जागा असतील त्या ठरवून ती गोष्ट वापरून झाली, काम झालं की पुन्हा तिच्या जागेवर ठेवली की इतरांच्याही सोयीचं होतं. वस्तू शोधण्यात जाणारा वेळ यामुळे पूर्णतः वाचतो.
घरातल्या सर्वांच्या वापरातल्या वस्तूंच्या जागा व त्यांचं स्थान राखलं तर जसं घर व्यवस्थित राहण्यास मदत होते तसंच प्रत्येकाच्या स्वतःच्या गोष्टी ठेवण्यासाठी एखादं कपाट किंवा खण तिथे त्या गोष्टी ठेवल्या जायला हव्यात. आपलं कपाट खूप मोठं नसलं तरी चालेल पण त्यामध्ये विभागवार पुस्तकं, कपडे, आपलं मेकअपचे सामान पर्स, पाकिट, चष्मा या गोष्टींचीही जागा ठरवून ठेवायला हवी म्हणजे आपल्या गोष्टी शोधण्याकरता वेळ जाणार नाही. घरात पाच माणसं असतील तर पाच खण वा कपाटं असायलाच हवीत ज्यामध्ये ज्याचं त्याचं वैयक्तिक सामान ठेवलं जाईल आणि इतरांनाही गरजेप्रमाणे सामान ज्याच्या त्याच्या खणात ठेवलं तर घराला घरपण असेल व व्यवस्थितपणाही असेल. हे नित्यनियमाने सगळ्यांनीच करायचं ठरवलं तर घरामध्ये वेगळा घरकामाचा माणूस नसला तरीही राजवाड्याप्रमाणे रूबाबदार घर आपल्या सर्वांनाही शक्य होईल. गरज आहे फक्त स्वयंशिस्त आणि सातत्याची.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट