Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

अतिवृद्ध व्यक्तीने नामनिर्देशन व इच्छापत्र करणे पुरेसे

$
0
0

अॅड. राजीव वाघ, ज्येष्ठ वकील

प्रश्नः ठाणे शहरातील, १९९२ साली स्थापन झालेल्या एका सहकारी गृहनिर्माण संस्थेत माझ्या आईवडिलांच्या संयुक्त नावानी आमची सदनिका असून, तीवर आईचे नाव प्रथम व वडिलांचे नाव दुसरे आहे. आईवडील दोघेही जेव्हा नोकरी करीत होते तेव्हा त्यांनी ही सदनिका स्वकष्टार्जित कमाईतून खरेदी केली होती. १९९४ साली वडिलांचे निधन झाले. आता आईला ही सदनिका तिच्या इच्छेअनुसार मुलाला किंवा नातवाला बक्षीस म्हणून द्यावयाची आहे. प्रश्न असेः बक्षीसपत्रावर ('गिफ्ट डीड') फक्त आईची सही पुरेशी आहे का? वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र गहाळ झालेले असून आईचे वय सध्या ९० आहे आणि ती फारशी हालचाल करू शकत नाही. 'गिफ्ट डीड' फक्त 'नोटराइज' केले तर चालेल की ते महसूल खात्याच्या उपनिबंधकासमोर नोंदणीकृत करावे लागेल? काय करणे अंतिमतः सर्वाच्या हिताचे ठरेल?
— एक 'मटा' वाचक, ठाणे

उत्तरः तुमच्या आईला तुमच्या किंवा कोणत्याही नातवंडाच्या नावाने बक्षीसपत्र करण्याची आवश्यकता नाही. तिने फक्त एक नामनिर्देशन ('नॉमिनेशन') करावे, ज्यात तिच्या कोणत्या वारसाच्या नावाने तो फ्लॅट तिच्यानंतर जावा हे नमूद करावे. त्याचप्रमाणे तिने एक इच्छापत्र करून त्यात हेच नमूद करावे. 'गिफ्ट डीड' हे मुद्रांकित (स्टॅम्प्ड्) आणि नोंदणीकृत (रजिस्टर्ड) करावे लागते, त्यासाठी काही खर्च येतो व शारीरिक दगदगही करावी लागते. म्हणून तुमच्या आईने नामनिर्देशन करणे आणि त्याबरोबरच इच्छापत्र ('विल्') करणे हे अधिक चांगले ठरेल. जिथे 'गिफ्ट डीड' स्टॅम्प्ड्' आणि 'रजिस्टर्ड' करणे बंधनकारक असते तिथे 'विल्'च्या बाबतीत मात्र असे बंधन नसते.

प्रश्नः मुंबई बेटातील आमची सहकारी गृहनिर्माण संस्था २००७ मध्ये नोंदणीकृत करण्यात आली. आमच्या 'सोसायटी'तील काही सदस्य म्हणतात की त्यांनी 'स्टिल्ट पार्किंग'च्या जागा बिल्डरकडून विकत घेतल्या आहेत. माझा प्रश्न अन्य, मोकळ्या जागेबद्दल (जमिनीबद्दल) आहे. 'सोसायटी'तील अनेक सदस्य मोकळ्या जागेत त्यांच्या दोन ते तीन मोटारी ठेवत आहेत, त्यामुळे अन्य काही सदस्यांना आपल्या गाड्या पार्क करण्यासाठी जागा शिल्लक नाही. माझ्या माहितीप्रमाणे सहकारी संस्था कायद्याअनुसार प्रत्येक सदस्याला एक गाडी ठेवण्यासाठी पार्किंगची जागा मिळण्याचा हक्क आहे. पण 'सोसायटी'ची व्यवस्थापकीय समिती हे मान्य करायला तयार नाही. याबाबत न्याय मिळण्यासाठी आम्ही काय करावे? आमच्या एका सदस्याने तो स्वतः राहत असलेली 'सोसायटी'तील सदनिका नुकतीच विकली असून त्यासोबतच 'सोसायटी'तील त्याची पार्किंगची जागाही त्या सदनिका खरेदीदाराला विकली आहे. सदस्याला अशी पार्किंगची जागाही विकता येते का?
— 'सोसायटी' सदस्य, मुंबई.

उत्तरः ही एक दुःखाची पण सत्य बाब आहे की सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सदस्य सहकार चळवळीचे सर्व लाभ उपभोगू इच्छितात, पण जबाबदारी मात्र काडीमात्रही स्वीकारू इच्छित नाहीत. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर 'सोसायटी'च्या उपविधिंमध्ये ('बाय लॉज') आहे. पण, सदस्य 'बाय लॉज'सुद्धा वाचून नेमकी कायदेशीर परिस्थिती समजून घेण्याचा साधा प्रयत्न करीत नाहीत. सदस्यांच्या या अज्ञानामुळेच सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी त्यांना गृहीत धरून मनमानी करतात. तुम्ही याची शहानिशा करणे आवश्यक आहे की काही सदस्यांनी बिल्डरकडून पार्किंगच्या जागा खरेदी केल्या हा दावा खरा आहे की नाही. त्यापुढे हा दावा कायद्याच्या कसोटीवर टिकणारा आहे की नाही हेही पाहणे आवश्यक आहे. इतर सर्व पार्किंगच्या जागा या 'बाय लॉज'प्रमाणे सदस्यांमध्ये वितरित केल्या गेल्या पाहिजेत.
- - -

'हाउसिंग 'सोसायटी' सदरासाठी प्रश्न

'हाउसिंग सोसायटी' सदरासाठी प्रश्न पाठविताना आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील इमारतींची संख्या, मजले, सदनिकांची संख्या, सदनिकांचे चटईक्षेत्र, प्रश्नाचे नेमके स्वरूप इत्यादी आवश्यक तो तपशील न चुकता नमूद करावा. मजकूर शक्य तो टाइप केलेला, अन्यथा किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावा. पाकिटावर 'हाउसिंग सोसायटी' सदरासाठी' असे स्पष्ट लिहावे. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स टॉवर, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाउन्ड, लोअर परळ, मुंबई- ४०० ०१३.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>