शंभर वर्षं पूर्ण झालेल्या गिरगावातल्या वाड्यांपैकी आणखी एक वाडी म्हणजे शेणवी वाडी. या वाडीला १२५ वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. त्याकाळात इथे शेणवी समाजातल्या लोकांची घरं होती आणि त्यावरून या वाडीला 'शेणवी वाडी' असं नाव पडलं, असं इथले रहिवासी सांगतात. या वाडीचा एक प्रवेश खाडिलकर रोडपासून सुरू होतो, तर वाडीच्या दुसऱ्या टोकाला एका बाजूला उरणकरवाडी तर दुसऱ्या बाजूला पिंपळवाडी दिसते.
शेणवी वाडीतल्या इमारती आणि चाळींची एकूण संख्या १८ असून त्यात साधारणतः १७० ते १८० कुटुंबं राहतात. या अठरा चाळी आणि इमारतींमधल्या घरांचे क्षेत्रफळ मात्र वेगवेगळे आहे. अगदी १००-२०० चौरस फुटांपासून ६०० चौरस फुटांपर्यंत क्षेत्रफळाच्या जागा इथे आहेत. काही चाळी खूप जुन्या आहेत, तर काही इमारतींचा पुनर्विकास झाला आहे. काही इमारती चार मजली आहेत. याच शेणवी वाडीत सुप्रसिद्ध अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा बंगला होता आणि दुर्गाबाईंचं बालपण त्या बंगल्यात गेलं होतं. पुढे तो बंगला पाडून तिथे इमारत बांधण्यात आली.
शेणवी वाडीपर्यंत पोहोचताना जो खाडिलकर रोड लागतो आणि ज्यांच्यामुळे त्या रस्त्याला खाडिलकर रोड हे नाव देण्यात आलं, ते सुप्रसिद्ध नाटककार कृ.प्र. खाडिलकर याच वाडीचे रहिवासी होते. नवाकाळ प्रेसची स्थापना त्यांनीच केली होती. पुढे अर्थातच तो वारसा सुप्रसिद्ध पत्रकार नीलकंठ खाडिलकर यांनी जपला. खाडिलकर कुटुंबातल्या जयश्री आणि रोहिणी या कन्यांनी बुद्धिबळाच्या क्षेत्रात ठसा उमटवला. आजही खाडिलकर कुटुंबाचं वास्तव्य इथेच आहे. त्याकाळात गिरगावात लग्न, मुंज यासाठी उपलब्ध असणाऱ्या सभागृहांची संख्या खूप कमी होती. तेव्हा इथे कोकणस्थ वैश्य समाज महाजन वाडी या नावाचं सभागृह बांधण्यात आलं. या वास्तूलासुद्धा १०० वर्षांचा इतिहास आहे. सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी बालपणी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती सुरुवात या सभागृहातल्या रंगमंचावर गणेशोत्सवादरम्यान झाली असं इथले रहिवासी सांगतात. आजही या सभागृहात विविध सोहळे आयोजित केले जातात. या सभागृहात गणेशोत्सवही साजरा होतो. याच वाडीत सारस्वत समाजाचा विष्णुबाग हॉलसुद्धा होता, मात्र हे सभागृह आता बंद झालं आहे. शेणवी वाडीचे सुद्धा एक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ असून त्याला ७५ वर्षं झाली आहेत. या मंडळातर्फे सामाजिक उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबिराचं आयोजन होतं, तसंच १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी महानगरपालिकेतल्या सफाई कामगारांचा सत्कार केला जातो. तसंच काही पोलिस अधिकाऱ्यांना सन्मानित केलं जातं. दक्षिण मुंबई स्तरावर चित्रकला आणि अन्नकोट स्पर्धा घेतली जाते.
ज्यावेळी मुंबई पुनर्रचना इमारत मंडळातर्फे काही इमारती बांधायचं ठरलं, तेव्हा या वाडीत जानकी निवास नावाची एक इमारत उभी राहिली. शेणवी वाडीत राहणारा समाज हा मध्यमवर्गीय मराठी समाज होता. जसजशी कुटुंबं विस्तारत गेली, तशी इथली जागा अपुरी पडू लागली. साहजिकच जागा विकून स्थलांतरित होणं हा एकमेव पर्याय मराठी माणसापुढे उरला आणि त्यामुळे इथली अनेक मराठी कुटुंबं स्थलांतरित झाली. आता इथे केवळ ३० टक्के मराठी कुटुंब आहेत, हे सांगताना रहिवाशांच्या मनातली खंत जाणवत होती. मात्र सामाजिक उपक्रमांमुळे इथले लोक एकत्र येतात, हे वैशिष्ट्य सांगावंसं वाटतं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट